दीपावली हा दिव्यांचा उत्सव आहे. एरव्ही लग्न समारंभ, उद्घाटनाच्या कार्यक्रमांत, मिरवणुकांमध्ये आणि राजकीय सभांच्या वेळी आतषबाजी म्हणून फटाके फोडणे एकवेळ मान्य. पण या सर्वांत फटाके वाजवणे कुठेच बसत नाही, मग ही प्रथा दिवाळीत शिरली तरी कुठून?
मुंलांना कोणी सांगितले की, ‘यंदा दिवाळीला कोणीही फटाके नाही फोडायचे’, तर मुले त्याचे ऐकतील का? अजिबात नाही. ‘फटाके दिवाळीला नाही फोडायचे, तर केव्हा फोडायचे?’ असा लागलीच त्यांचा प्रतिप्रश्नही असेल. अर्थात ही चूक लहानग्यांची अजिबात नाही. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त एवढ्या प्रचंड प्रमाणात फटाके फोडले जातात की फटाके हीच दिवाळीची खरी ओळख आहे की काय? असा प्रश्न पडतो.
वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज अशी सहा दिवसांची दिवाळी. या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. त्या प्रत्येक दिवसाला वेगळा इतिहास आहे आणि त्या दिवशीचा सण कसा साजरा करावा यामागील शास्त्रही ठरलेले आहे. अर्थात राज्यपरत्वे, स्थानपरत्वे या सणांच्या मागील वेगवेगळ्या कथा आणि इतिहास ऐकायला मिळतात. मात्र संपूर्ण भारतभरात उत्साहाने साजरी होणाऱ्या दिवाळीतील सामायिक बाब म्हणजे या दिवसांत सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिवे लावले जातात. दीपावली शब्दाचाच अर्थ दीप+आवली अर्थात दिव्यांची रांग असा आहे. दीपावली हा दिव्यांचा उत्सव आहे. तिमिराकडून तेजाकडे म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याची शिकवण दीप आपल्याला देतो. कोणी कितीही गरीब असला तरी त्याच्या घरी दिवाळी दरवर्षी साजरी होतेच. दिवाळीच्या निमित्ताने घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो, घराला रंगरंगोटी केली जाते, या सहा दिवसांत दाराबाहेर आकाशकंदील लावला जातो. दाराजवळ सुबक रांगोळी काढली जाते. दारात आणि तुळशीजवळ तेलाच्या पणत्या लावल्या जातात. घरोघरी लाडू, चकली कारंज्यांचा फराळ बनवला जातो. आप्तेष्टांना, मित्र-मंडळींना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. हीच दिवाळी साजरी करण्याची परंपरागत पद्धत. या सर्वांत फटाके वाजवणे कुठेच बसत नाही, मग ही प्रथा दिवाळीत शिरली तरी कुठून? एरव्ही लग्न समारंभ, उद्घाटनाच्या कार्यक्रमांत, मिरवणुकांमध्ये आणि राजकीय सभांच्या वेळी आतषबाजी म्हणून फटाके फोडणे एकवेळ मान्य. मात्र दिवाळीसारख्या धार्मिक सणाचा आणि फटाके फोडण्याचा काय संबंध?
सुमारे २२०० वर्षांपूर्वी चीनच्या लुईयाँग प्रांतात फटाके फोडल्याचा संदर्भ आढळतो. आगपेटीच्या काडीप्रमाणे काठ्यांच्या टोकाला ज्वालाग्राही पदार्थाची गाठ बनवली जाई आणि ही गाठ आगीत धरल्यावर तिचा आवाज येत असे. ही आतषबाजी पुढे लग्नसमारंभांना होऊ लागली. १९२३ मध्ये भारतातील कोलकात्यामध्ये नाडर बंधूंनी आगपेटीच्या कारखान्यांमध्ये सर्वप्रथम फटाक्यांची निर्मिती केली. १९४० मध्ये तामिळनाडूतील शिवकाशी येथे फटाक्यांचा पहिला कारखाना सुरू झाला. तेव्हापासून आजतागायत शिवकाशीमध्ये अविरतपणे फटाक्यांची निर्मिती सुरू आहे. आजमितीला शिवकाशी येथे फटाक्यांचे मोठमोठे कारखाने तयार झाले आहेत. येथून संपूर्ण भारतात फटाके पुरवले जातात. शिवकाशी येथे तयार केल्या जाणाऱ्या फटाक्यांना भारतभरातून विशेष मागणी आहे. दिवाळी सणाला सहस्रो वर्षांचा इतिहास आहे आणि फटाके बनवणारा पहिला कारखाना भारतात ८३ वर्षांपूर्वी तयार झाला आहे, याचाच अर्थ दिवाळीत फटाके फोडण्याच्या प्रथेला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पूर्वीचे राजे महाराजे आनंदाच्या क्षणी आतषबाजी करत असल्याचे दाखले इतिहासात सापडतात. ही आतषबाजी आता फटाक्यांच्या रूपाने दिवाळीत सर्वत्र होऊ लागली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या किंवा सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांत आतषबाजी करण्याची प्रथा पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा आहे. मात्र ही आतषबाजी केवळ शोभेच्या फटाक्यांपुरती सीमित असते. आपल्याकडे मात्र शोभेपेक्षा अधिकाधिक आवाजाच्या फटाक्यांचीच स्पर्धा प्रतिवर्षी पाहायला मिळते.
दिवाळीच्या तोंडावर दरवर्षी प्रशासनाकडून फटाके फोडण्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली जाते, ज्यामध्ये आवाजाच्या मर्यादेपासून फटाके फोडण्यासाठीची निषध्द क्षेत्रेही नमूद केलेली असतात. मात्र शहरासारख्या ठिकाणी या नियमावलीला सर्रासपणे हरताळ फासला जातो. सर्वत्रच फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्याने कारवाई तरी कोणावर करणार, असा यक्षप्रश्न प्रशासनासमोर असतो. २०२१ साली भारतभरात सुमारे १५०० कोटी रुपयांचे फटाके केवळ दिवाळीच्या दिवसांत फोडले गेले. यंदा हा आकडा याहून अधिक असेल. आजमितीला लोकसंख्येत अव्वल असलेल्या भारतातील बराचसा भाग दारिद्र्यरेषेखाली जीवन कंठत आहे, ज्यांना दोन वेळेचे पोटभर अन्न मिळणेही दुरापास्त आहे. देशातील कित्येक गावे कुपोषित आहेत. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. अशा परिस्थितीत केवळ क्षणिक मौजेखातर फटाक्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची राख-रांगोळी करणे कितपत योग्य आहे?
शिवकाशी हे ठिकाण अव्वल दर्जाचे फटाके बनविण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. मात्र याच शिवकाशीमध्ये दरवर्षी फटाक्यांच्या कारखान्यांना आगी लागून जीवित आणि वित्तहानी होण्याच्या अनेक घटना घडत असतात. या कारखान्यांतील दारूच्या प्रभावामुळे कारखान्यांत काम करणाऱ्या कितीतरी लहान मुलांना, कामगारांना असाध्य आजार जडतात, कायमचे अपंगत्व येते. याशिवाय दिवाळीच्या दरम्यान फटाक्यांच्या गोदामांना, दुकानांना आगी लागल्याच्या अनेक बातम्या दरवर्षी वाचनात येतात. फटाके फोडताना कित्येक जण भाजतात, जळके फटाके इतरत्र उडाल्यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. ज्यामध्ये दरवर्षी शेकडो जण मृत्युमुखी पडतात, तर हजारो जण जखमी होतात. याकाळात अग्निशमन दलावर प्रचंड ताण असतो. याशिवाय केवळ फटाक्यांच्या कारणावरून अनेक ठिकाणी भांडणे, मारामाऱ्या होतात त्या वेगळ्या.
वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याकडे दरवर्षी अधिकाधिक आवाजाच्या फटाक्यांची स्पर्धा लागलेली पाहायला मिळते. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे इमारतींना तडे जातात, खिडक्यांच्या काचा फुटतात तसेच सिलिंगचे प्लास्टरिंग सैल होण्याचाही धोका असतो. विजेचे काचेचे बल्बही फटाक्यांच्या आवाजामुळे फुटतात.
दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे लोकांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो. कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांमुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. अतिआवाजामुळे कान बधीर होतात. श्रवणयंत्रणातील पेशी एकदा मृत झाल्या की, त्या पुन्हा नव्याने निर्माण होत नाहीत. गर्भवती महिला, दीर्घ आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण आणि नवजात बालके यांच्यावर फटाक्यांच्या आवाजाचा भयंकर परिणाम होतो. मायग्रेन, रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या त्रासामध्ये फटाक्यांच्या अतिआवाजामुळे अधिक वाढ होण्याची शक्यता असते. फटाके फोडल्यावर निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे प्रचंड वायुप्रदूषण होते, ज्याचा त्रास लहान मुलांसह अस्थमा आणि फुप्फुसाचा आजार असलेल्यांना अधिक होत असतो.
अमेरिकेसारख्या विकसित देशात मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. न्यूझीलंड, इटली, फ्रान्स, बेल्जियम या देशांत केवळ प्रौढ व्यक्तींनाच फटाके विकत घेण्यास आणि फोडण्यास अनुमती आहे. आपल्याकडे मात्र असे कोणतेही धोरण प्रशासनाने आखलेले नाही. उलट इथे घरातील प्रौढच फटाके आणून ती लहानांना फोडण्यासाठी उपलब्ध करून देतात.
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांत श्री महालक्ष्मी आणि श्री कुबेराचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही धनाची देवता आहे, तर कुबेर हा धनसंचयाचा देव आहे. एकीकडे योग्य मार्गाने धन प्राप्ती होण्यासाठी देवी लक्ष्मीची आणि आलेले धन टिकून राहावे यासाठी कुबेराची पूजा करायची आणि दुसरीकडे लक्ष्मीच्या कृपेने मिळालेले धन फटाक्यांच्या माध्यमातून विनाकारण व्यय करायचे हा विरोधाभास नव्हे काय?
प्राचीन युगात राक्षस नागरिकांना त्रास देऊन असुरी आनंद मिळवायचे. आताच्या काळी फटाके फोडून इतरांना त्रास देऊन साजरा केल्या जाणाऱ्या आनंदाला असुरी आनंदच म्हणावे लागेल. आपल्याला एखादा आजार झाला कि त्यावर वेळीच उपचार घेऊन आपण त्याचे निराकरण करतो. फटाक्यांच्या रूपाने आपल्या हिंदू संस्कृतीतील दीपावलीसारख्या व्यापक आणि सात्त्विक सणाला एकप्रकारचा आजारच जडला आहे. तो दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दीपावलीच्या तेजाला लागलेली फटाक्यांची काजळी दूर करून तिला पुनर्तेज प्राप्त करून द्यायचे असेल, तर सुरुवात आपल्या घरापासूनच करावी लागेल.
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…