एसीबीचे गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु : विश्वास नांगरे पाटील
नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक कौशिक यांच्या मार्गदर्शनात यंदा राज्यभरात सातशेहून अधिक सापळा कारवाया होऊन लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या ७०० पैकी १४० सापळे यशस्वी करून १९९ आरोपींना अटक करून नाशिक लाचलुचपत विभाग राज्यात अव्वल ठरला असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे अतिरिक्त महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात दक्षता जागरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने विश्वास नांगरे पाटील नाशिकमध्ये वार्तालाप करीत होते. लाच देणे आणि घेणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. याबाबत समाज आणि प्रशासकीय पातळीवर जनजागृती करणे हा या सप्ताहचा मुख्य उद्देश असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.
पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते म्हणाले की, गुन्हे सिद्ध होऊन लाचखोरांना सजा होण्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र खूपच मागे आहे. गुजरात, उत्तराखंड या राज्यातील प्रकरणांचा अभ्यास सुरु आहे. गुजरातमध्ये जवळपास साठ टक्के प्रकरणात सजा होते. महाराष्ट्रात हीच टक्केवारी एक आकड्यात आहे.
नांगरे पाटील म्हणाले की, या मुद्द्यावर काम सुरु आहे. यासाठी एक कमिटी गठीत झाली असून त्या कमिटीचे ते स्वतः अध्यक्ष आहेत. या कमिटीमार्फत महत्वाच्या शिफारशी दिल्या जाणार आहेत. साक्षीदार फितूर होणे, फिर्यादीने माघार घेणे यामुळे खटला न्यायालयात टिकत नाही. या त्रुटी दूर केल्या जात असून गुन्हा दाखल होत असतानाच सन्माननीय न्यायालयासमोर १६४ चा जबाब नोंदवने, ऑडियो सोबत व्हिडीओ रेकॉर्डिंगला ग्राह्य धरणे यांसारख्या शिफारशीमुळे प्रकरणातील पारदर्शकता वाढेल. व्हिडीओ रेकॉर्डिंगमुळे गैरसमज, अर्धवट माहितीवर आधारित चुकीच्या कारवाया होणार नाहीत, असे ते म्हणाले.
महाष्ट्रातील सर्वात मोठे लाचेचे प्रकरण समोर आले आहे. ही लाच लाखोंमध्ये नाही तर कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. लाच घेणारा अधिकारी कोणी सचिव दर्जाचा नाही तर केवळ अभियंता आहे. शासकीय ठेकेदाराचे काम केले म्हणून त्याने ही लाच मागितली आहे. लाचेच्या या प्रकारामुळे सर्वांना धक्का बसला आहे. लाच घेणार आणि लाच देणारा यांच्यामधील संभाषण समोर आले आहे. त्यात ‘तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळाले आहे’, असे म्हटले गेले आहे. या प्रकरणात अभियंत्यासह आणखी एका व्यक्तीचा महत्वाचा रोल असल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी दोघांमध्ये झालेले शेवटचे संभाषणही पोलिसांनी सांगितले. त्यात तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळाले आहे, असे म्हटले गेले आहे.
वर्षभरात सातशेच्या वर कारवाई
राज्यात सध्या भ्रष्टाचार विरोधी जनजागृती दक्षता सप्ताह सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील लाचेचा सर्वात मोठा प्रकार समोर आला आहे. वर्षभरात राज्यात ७०० च्या वर सापळा कारवाई एसीबीने केली आहे. राज्यात १४० कारवाई करून नाशिक विभाग अव्वल ठरला आहे. १९८८ चा कायद्यात बदल झाला आहे. त्यानंतर २०१८ मध्ये नवीन कायदा आला. त्यानंतर कारवाया वाढल्या आहेत. अनेक अधिकाऱ्यांची संपत्ती एसीबीकडून तपासली जात आहे.