Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीNashik Bribing : नाशिक पथकाची नगरमध्ये मोठी कारवाई; एक कोटीच्या लाच प्रकरणाने...

Nashik Bribing : नाशिक पथकाची नगरमध्ये मोठी कारवाई; एक कोटीच्या लाच प्रकरणाने राज्यभरात खळबळ

एमआयडीसीच्या दोन उपविभागांचे सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने अहमदनगर शहराजवळ सापळा रचून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाच्या सहा.अभियंता (वर्ग २) याला तब्बल एक कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अमित किशोर गायकवाड (वय ३२ रा.प्लॉट नं २ आनंदविहार नागापुर, अहमदनगर, मुळ रा. चिंचोली ता.राहुरी) असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.एक कोटीची लाच प्रकरणामुळे जिल्ह्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्याने सदरची लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या करीता स्वीकारली असल्याचे सिद्ध झाले आहे.

दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली गेली होती. याची खबर नगरच्या लाचलुचपत विभागाला सुद्धा लागली नाही. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे म्हणून सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्या करीता या बिलाचे कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी करून लाच स्विकारण्याचे मान्य केले. तशी तक्रार शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

नाशिक पथकाने शुक्रवारी दुपारी नगर – संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिंल्डिंग जवळ सापळा लावला होता. त्यावेळी मागणी केलेली लाचेची एक कोटी रूपयांची रक्कम गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्विकारली. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हिस्स्याची 50 टक्के कोठे पोहचवावी बाबत विचारले असता वाघ याने सांगीतले की, ‘राहु दे तुझ्याकडे बोलतो मी तुला ते तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी, सांगतो नंतर सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवुन दे’, असे म्हणुन वाघ याने गायकवाड याच्या लाच मागणीस व स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परीक्षेत्राच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक, पोलिस उपाधीक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी स्वप्निल राजपूत ,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक पो.ना.प्रभाकर गवळी, पो. ना. संदीप हांडगे, पो. ना. किरण धुळे ,पो.ना.सुरेश चव्हाण यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -