Wednesday, October 9, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSwami Samartha : ‘अंगठी फेकून दे!’

Swami Samartha : ‘अंगठी फेकून दे!’

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

ऑफिसर माधवराव दादासाहेब विंचूरकर हे अक्कलकोट संस्थानात होते. त्यांची भक्ती श्री स्वामी चरणी फार होती. पुढे दादासाहेबांच्या मांडीवर एक श्वेतकुष्ठाचा डाग उत्पन्न झाला. त्यामुळे दादासाहेबांस काळजी वाटू लागली की, हा श्वेतकुष्ठ रोग जास्ती फैलावतो की काय?

एके दिवशी ते श्री स्वामी महाराजांचे दर्शनास गेले. श्री स्वामींची सुप्रसन्न मर्जी पाहून त्यांनी मांडीवरील डाग बरा होण्याविषयी प्रार्थना केली. श्री स्वामी महाराज त्यांना म्हणाले, “त्यांचे नाव काय?” दादासाहेबाने उत्तर दिले, “लोक त्यास श्वेतकुष्ठ म्हणतात.” त्यानंतर महाराजांनी विचारले, “तुझ्या हातातील बोटात काय आहे?” त्यांनी उत्तर दिले, “अंगठी.” “अंगठीत खडा कसला आहे?” “महाराज पांढरा आहे.” दादासाहेबाने उत्तर दिले. “तो फेकून दे” म्हणून श्री स्वामी महाजांनी दादासाहेबांस सांगितले. हे ऐकून दादासाहेबांनी मनात विचार केला की, तीनशे रुपये किमतीची अंगठी फेकून कशी द्यावी? त्यापेक्षा श्री स्वामी महाराजांच्या हातात घालावी.

मग ते त्या अंगठीचे त्यांना पाहिजे ते करोत. श्री स्वामींनी ती अंगठी चोळाप्पास दिली. त्याने ती विकून महाराजांच्या देवळाचे काम चालविले. पुढे विंचूरकरांच्या मांडीवरील श्वेतकुष्ठाचा डाग संपूर्ण नाहीसा झाला. (बखर ७७/१)

अक्कलकोट संस्थेत असलेल्या दादासाहेब विंचूरकरांची श्री स्वामी समर्थांवर दृढ भक्ती होती. पुढे विंचूरकरांच्या मांडीवर श्वेतकुष्ठाचा डाग दिसू लागताच तो पुढे संपूर्ण शरीरभर पसरेल, याची त्यांना काळजी व भीती वाटू लागली. त्यांनी त्यांची ही व्यथा सद्गुरू श्री स्वामींना सांगितली.

तेव्हा त्यांनी विंचूरकरांच्या हातातल्या अंगठीची, अंगठीतल्या खड्याची, त्याच्या रंगाची चौकशी केली. “तो खडा फेकून दे म्हणजे श्वेतकुष्ठाचा डाग जाईल”, असे सांगितले.

विंचूरकरांच्या श्वेतकुष्ठ डागाचा, अंगठीतील खड्याशी व त्याच्या पांढऱ्या रंगाशी कसा संबंध लावला? हे आपण सर्वांनाच वरकरणी कोड्यात टाकणारे असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव होता हे नक्की. अन्यथा श्री स्वामी “तो फेकून दे!” असे म्हटले नसते. पण मौल्यवान हिऱ्याची अंगठी फेकून कशी द्यायची, असा विंचूरकरांस प्रश्न पडला. त्या अंगठीचा मोह क्षणभर त्यांच्या मनातून जाईना, अंगठी फेकून देण्यापेक्षा त्यांनी ती श्री स्वामी समर्थांच्या बोटात घातली. अंगठीचे काय करायचे ते त्यांनी श्री स्वामींवर सोपविले. परिणामी त्यांच्या मांडीवरील श्वेतकुष्ठाचा डाग लवकरच म्हणजे तीन दिवसांतच संपूर्ण नाहीसा झाला. स्वामी समर्थ प्रसन्न झाले की, आयुष्यातले अनेक प्रश्न चटकन सुटतात, अशी भक्तांची भावना आहे.

जेथे जेथे कमी, तेथे उभे राहती स्वामी…

आली आली स्वामींची पालखी
आली हो दत्ताची पालखी॥१॥
स्वामी माझा श्रीकृष्ण सखा
स्वामींचा मी सुदामा सखा॥२॥
स्वामी नाम घ्या मंजुळ
वाटा गोड तीळगूळ॥३॥
स्वामी दर्शनाची हो आवडी
वाढवा स्वामी नामाची गोडी॥४॥
गरीब, श्रीमंत भक्त कोणी
सर्व भक्तांनी साधावी पर्वणी॥५॥
स्वामीचे ईश्वरी दर्शन
साक्षात दत्तप्रभूचे दर्शन॥६॥
ब्रह्मा विष्णू महेश देती हो दर्शन
सर्व संकटाचे होई विसर्जन॥७॥
फुले, फळे, गुलाल अर्चन
राहू केतूचे होई मर्दन॥८॥
साक्षात दत्तअवधुताचे दर्शन
घ्या विश्वरूप स्वामींचे दर्शन॥९॥
मिळेल शतवर्षे आयुष्य
स्वामीच उचलतील इंद्रधनुष्य॥१०॥
स्वामी माझे महाकृपाळू
स्वामी माझे महादयाळू॥११॥
जेथे जेथे जे जे कमी
तेथे उभे राहती स्वामी॥१२॥
प्रकटदिनी हजर स्वामी
देवळा-देवळांत स्वामी॥१३॥
घरा-घरांत स्वामी
मना-मनांत स्वामी॥१४॥
काश्मीर ते कन्याकुमारी
स्वामी फिरती जगभर॥१५॥
गिरगांव ते गोरेगांव
अक्कलकोट ते गुरगांव॥१६॥
प्रत्येक प्रसन्न गाव
स्वामीचे गुण गाव॥१७॥
डोंबिवलीचे झाले कल्याण
उल्हासनगरचे स्वामींमुळे कल्याण॥१८॥
हिमालय नेपाळात पोहोचले स्वामी
अमेरिकेतही प्रकटले स्वामी॥१९॥
स्वामी प्रकट दिनी
स्वामींची प्रचिती सातासमुद्रगामी॥२०॥

vilaskhanolkardo@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -