Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेShrikant Shinde : व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही; आमची नाहक बदनामी...

Shrikant Shinde : व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही; आमची नाहक बदनामी केली…

ठाणे पोलिसांवर श्रीकांत शिंदे भडकले… नेमकं झालं काय?

ठाणे : ठाणे पोलिसांच्या (Thane Police) वाहतूक शाखेने मुख्यमंत्र्यांचे ठाण्यातील निवासस्थान असलेल्या चे शुभदिप या ठिकाणी लुईसवाडी परिसरातील वाहतूक बदलांसाठीचे एक परिपत्रक काल जारी केले. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या अथवा शिफारस केली नव्हती. त्यामुळे त्रीकांत शिंदे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ‘पोलिसांची चूक असताना खापर आमच्या माथी फोडले जात आहे’, असं या पत्रातून म्हणत त्यांनी नापसंती दर्शवली आहे.

ठाणे लुईसवाडी परिसरात राहणार्‍या नागरिकांना त्रास देण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. सर्विस रोड वाहतूक पोलिसांनी परस्पर बंद केली आहे. परंतु त्या पत्रकात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसाठी म्हणजे आमच्यासाठी वाहतूक बदल प्रस्तावित केल्याचा उल्लेख आहे. त्यात माझ्या नावाचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच, अशा पद्धतीने पत्रक जारी करण्यापूर्वी आम्हाला पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती. व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही. आम्ही कोणतीही मागणी न करता आपल्या वाहतूक विभागाने नावासह काढलेल्या परिपत्रकामुळे आमची नाहक बदनामी झाली आहे, असं श्रीकांत शिंदे या पत्रात म्हणाले आहेत.

श्रीकांत शिंदे म्हणाले, वाहतूक विभागाचे अतिउत्साही पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी परस्पर काढलेल्या या पत्रामुळे प्रसिध्दी माध्यमे आणि सोशल मीडियावर आमच्या कुटुंबियांची नाहक बदनामी केली जात आहे. चूक पोलिसांची आणि खापर आमच्या माथी अशी अत्यंत संतापजनक परिस्थिती त्यामुळे उद्भवली आहे. आमचे येणे- जाणे सुकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही.

पोलिसांनी उत्साहाच्या भरात केलेला प्रताप

तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव अशा पद्धतीने वाहतूक बदल करून ठाणेकरांना त्रास होत असेल तर पोलिसांचे हे प्रयत्नही अनाकलनीय आहेत. लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणे हे लोकप्रतिनिधींचे आणि पोलिसांचेही कर्तव्य असते. त्यांच्या जगण्यात अडथळे निर्माण करणे आपल्याला निश्चितच शोभणारे नाही. आमच्या सुरक्षेसाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. परंतु, पोलिसांनी उत्साहाच्या भरात अशा पद्धतीने वाहतूक बदल करण्याचा जो प्रताप केला आहे तो निश्चितच योग्य नसल्याचे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

आमच्या मनस्तापाची अधिकाऱ्यांना कल्पना नाही

पोलिसांच्या या पत्रकबाजीमुळे आमच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागला याची कल्पना पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचित नसावी. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नसताना परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणारे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्यावर आपण तातडीने कठोर कारवाई करावी. तसेच, यापुढे अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढले जाणार नाही याबाबतची समज संबंधित अधिकाऱ्यांना आपण द्यावी, अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -