Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखबहुविकलांग मुलांचे सबलीकरण करणारे ‘झेप पुनर्वसन केंद्र’

बहुविकलांग मुलांचे सबलीकरण करणारे ‘झेप पुनर्वसन केंद्र’

सेवाव्रती: शिबानी जोशी

पिंपरी – चिंचवड भागात बहुविकलांग  व ऑटीस्टिक मुलांसाठी काम करणारी ‘झेप पुनर्वसन केंद्र’ नावाची एक संस्था आहे, अशी माहिती ‘झेप’ संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पवार-तावडे यांच्याकडून मला मिळाली आणि त्याविषयी जाणून घ्यायचे ठरवले. संस्थेच्या संस्थापक सेक्रेटरी असलेल्या नेत्रा पाटकर यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी सांगितले की, १९९० साली नेत्रा  यांना एक गोंडस बाळ झाले; परंतु ते बाळ सेरेब्रल पालसी  आहे आणि ते इतर नॉर्मल मुलांसारखे वागत नाहीये असे लक्षात आल्यावर त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला. असे कसे होऊ शकते? आता पुढे काय? असे विचार मनात आले. पुढे काय? असा विचार येऊन त्याच्या विकासासाठीचा शोध सुरू झाला. पण असे लक्षात आले की, पिंपरी-चिंचवड भागात अशा मुलांसाठी एकही शाळा नाही. म्हणून मग त्यांच्या मनात स्वतःच्या मुलाला प्रशिक्षण देता देता इतर मुलांसाठी काहीतरी करावं अशी इच्छा उत्पन्न झाली. त्यांनी स्वतः अशा मुलांना शिकविण्याचे प्रशिक्षण घेतले. काही  संस्थांमध्ये कामही केले आणि मग स्वतःची संस्था उभारणी  करायची असे पक्के ठरवले.

स्वतः एक पालक असल्यामुळे अशा पालकांशी संपर्क  हा हवा होताच. सुरुवातीला अगदी कमी साधन आणि अगदी कमी उपकरणांत शाळा सुरू झाली. शाळेच्या जागा शोधण्याला तर खूपच अडचणी आल्या होत्या. एनआईएमएच (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटली हँडीकॅप्ड), येथे विशेष शिक्षक प्रशिक्षण प्राप्त केले. पुण्यात डॉक्टर प्रिया भिडे यांच्या क्लिनिकमध्ये बाल चिकित्सा फिजियो थेरेपिस्ट सेंटरबरोबर काम करायला सुरुवात केली. काम सुरू केल्यानंतर फक्त स्वतःचा मुलगा नाही तर त्यांना इतरही मुलांसाठी काही करावं असं वाटू लागलं आणि त्यातूनच निर्माण झालं “झेप पुनर्वसन केंद्र”. २००८ मध्ये  एकाच छताखाली शिक्षण आणि उपचार सुविधा देण्यासाठी त्यांचे अनेक संघ विचारी मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांची मदत घेऊन पुनर्वसन केंद्र स्थापन करावे असा हेतू बाळगून कामाची सुरुवात केली. प्रारंभी केवळ आठ मुले होती.

आज प्रशिक्षित शिक्षक आणि सहकारी कर्मचारी यांची टीम यांच्या मदतीने १०१ मुलांना पुनर्वसन शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करत आहेत. संस्थेचा पहिल्यापासून हाच उद्देश होता की, बहु विकलांग व ऑटीस्टिक असलेल्या विशेष मुलांना एकाच छत्राखाली शिक्षण, उपचार देणे. या विशेष मुलांना ‘घरापासून दूर एक घर देणे’ हा एक दृष्टिकोन संस्थेने पहिल्यापासून ठेवला होता.  त्यांच्या कौशल्यामध्ये सुधारणा करणे, प्रत्येक मुलाला त्याच्या कुवतीनुसार सबल करणे, सामाजिक जीवनासह व्यावसायिक जीवनासाठी स्वतंत्र होण्यासाठी मदत करणे हा हेतूही आहेच. त्यासाठी वेगवेगळ्या अद्ययावत माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. वैद्यकीय उपचार, वैद्यकीय औषध, शिबीर,  पालकांचे प्रशिक्षण, समुपदेशन अशा सर्वांगीण प्रयत्नांमधून या मुलांच्या  सबलीकरणासाठी प्रयत्न केले  जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्रैमासिक रात्री शिबीर, सामाजिक कौशल्य विकसित होण्यासाठी सहल, सण-उत्सव साजरे करणे, वार्षिक संमेलन साजरे करणे इत्यादी उपक्रम घेतले जातात. आता कॉम्प्युटरच्या माध्यमातून दृश्य शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. कार्यशाळांतून टीम वर्क निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पालकांची मदत व सहकार्य लागत आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी  विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष मुलांसाठी  अतिरिक्त पाठ्यक्रम मूल केंद्रित इंडिव्हिज्युल एज्युकेशनल प्रोग्रॅम राबवला जातो.

संस्थेमध्ये आरोग्य तपासणी, व्यावसायिक चिकित्सा, फिजियो थेरेपी, स्पीच थेरपी, वाक्उपचार, व्यवहार थेरेपी, दृष्टी चिकित्सा, ग्राऊंड थेरेपी, संगीतीय उपचार, मोशन सेंसर गेम (आभासी वास्तविकता गेम), संवर्धित वास्तविकता (एआर), बहु-संवेदी कक्ष  असे विविध प्रकारचे उपचार तसेच पद्धती इथे येणाऱ्या मुलांसाठी वापरल्या जातात. पाटकर मॅडमचे संस्थेकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष असते आणि त्यांना त्यांच्या कार्यकारी मंडळाचीही मोठी साथ असते. सध्या मंडळात वर्षा पवार-तावडे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तर नेत्रा पाटकर, अर्पिता देशमुख, संजय खानोलकर, समीर  गाजरे, अनुराधा  दाभोलकर, सीमा कांबळे, निवेदिता ढेकणे असे राष्ट्रीय विचाराचे सदस्य लाभले आहेत. जे समाजातल्या या विशेष घटकाचा अतिशय संवेदनशील मनाने विचार करून योजना आखत असतात. अशा मुलांना प्रशिक्षण देणं हे एक खूप मोठ आव्हान असते. इथे ते प्रशिक्षित शिक्षक निष्ठेने करत आहेत. सर्व शिक्षकांनी या क्षेत्रातील  प्रशिक्षण घेतलं असून अन्य व्यावसायिक डॉक्टर इथे सेवा द्यायला येत असतात. स्पीच थेरेपिस्ट, विजन थेरेपिस्ट इतर  विशेषज्ञ नियमित स्वरूपात घेऊन मुलांच्या चाचण्या घेत असतात. सर्वच क्षेत्रात नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे, या नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी याकरिता शिक्षकांना विविध कार्यशाळात पाठवलं जात.

समाजातील अशा घटकांसाठी काम करणं हे खूप कठीण काम आहे; परंतु ते सातत्यपूर्ण आणि प्रामाणिकपणे केलं तर समाजाकडून भरभरून प्रतिसाद त्याला मिळतो. त्यामुळे संस्थेला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. २०१० साली फुले, शाहू, अंबेडकर पुरस्कार, लोकमान्य व्याख्यान मालाचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, सरस्वती पुरस्कार पुणे २०११, २०११ मध्ये सकल मधुरांगनद्वारे कर्तृत्ववान महिला सन्मान, २०१२ साली सुशीला माधव न्यास पुणेकडून भक्ती सेवा पुरस्कार, निर्माण कृतज्ञता पुरस्कार- २०१२, २०१२ मध्येच पुणे विभागतिल कुडलदेशकर समाजाकडून ऋणानुबंध पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ निगडी-वोकेशनल सर्विस ॲवाॅर्ड २०१२, गौड ब्राह्मण समाज सन्मानपत्र. मार्च २०१५ मध्ये अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, प्रेरणा पुरस्कार, २०१५मध्ये स्त्री शक्ती गौरव पुरस्कार, २०१६ ला जय भवानी तरुण मंडळाकडून कर्तृत्ववान महिला (जिजाऊ पुरस्कार) असे अनेक पुरस्कार संस्थेला आणि पाटकर मॅडमना मिळाले आहेत.
मुलांची सर्व प्रकारची कौशल्ये विकसित करताना, त्यांचा सर्वांगीण विकास करताना अठरा वर्षांवरील मुलांना काही  व्यवसायोपयोगी त्यांची आवड व पालकांची इच्छा बघून प्रशिक्षण दिले जाते. त्यातून ही मुले कशी स्वतःच्या पायावर उभी राहतील यासाठी प्रयत्न केले जातात. ‘झेप’मधील दोन मुले सध्या बाहेर काम करत आहेत. एक मुलगा गॅरेजमध्ये स्वतंत्रपणे काम करत आहे. तर दुसरा मुलगा हॉटेलमध्ये काम करत आहे. ‘झेप’च्या छताखाली  पाच विशेष मुलांना जॉब दिलेला आहे. झेपमधील काही मुले नॉर्मल शाळेत इंटिग्रेट झालेली आहेत, ज्यांची बौद्धिक क्षमता असते त्यांना नॉर्मल शाळेत इंटिग्रेट केले जाते व परीक्षा देऊन त्यांना पुढे अंडर गायडन्स कसा जॉब मिळेल यासाठी ट्रेनिंग दिले जाते. विशेष  मुलांसाठी करिअर कौन्सलिंग व कॉन्फिडन्स बिल्डिंगचा प्रकल्प राबविला जातो. विशेष मुलांना पाकक्रियेमध्ये विशेष रस असल्यामुळे ‘झेप कॅफे’ हा एक उपक्रम राबवला जातो, त्यासाठी खूप छान प्रतिसादही मिळतो.

मुलं आहे तसे लवकरात लवकर स्वीकारून त्याला विशेष शाळेची मदत घेऊन जर प्रशिक्षित केले, तर ते मूल लवकरात लवकर  समाजाने स्वीकारून स्वावलंबी बनण्यास मदत होते. अशी काही उदाहरणे आहेत की पालकांचा पहिल्यांदा स्वीकार नव्हता. त्याची चार एक वर्षे वाया गेल्यानंतर त्या मुलाच्या पालकांनी त्याला स्वीकारले व आता तो मुलगा विशेष शाळेच्या मदतीने ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहे. काही मुले जरी शैक्षणिकदृष्ट्या काही करू शकले नाही, तरी हॉटेल इंडस्ट्री किंवा कॉम्प्युटर टायपिंग करू शकतात व त्यांचे तसे पुनर्वसन केलेले आहे. चांगले काम असले की सर्व बाजूने नेहमीच मदत उभी राहत असते. पण तरीही काही वेळा असे काम सर्व लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्याबद्दल विश्वास निर्माण करणे गरजेचे असते. या पुरस्काराच्या प्रोत्साहनामुळे संस्थेचे कार्य सर्वदूर पोहोचले आहे.

विशेष मुलांची ही कायमस्वरूपी जबाबदारी असल्यामुळे प्रत्येक पालकाला आपल्यानंतर काय? ही एक समस्या भेडसावत असते. त्यासाठी विशेष मुलांना त्यांच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनवून त्यांना जमते त्या व्यवसायात अथवा काही कार्यात बिझी करणे हे गरजेचे असते. तसे स्किल डेव्हलपमेंट सेंटर व या मुलांची निवासी व्यवस्था करणे  असा पुढचा उद्देश संस्थेचा आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्नही चालू आहेत. अशा बहुविकलांग मुलांसाठी घेतलेली ‘झेप’ यशस्वी झाली आहे. यापुढेही संस्था बहुविकलांग मुलांच्या सबलीकरणासाठी पाटकर मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीतून अशाच उंच उंच भराऱ्या घेईल यात शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -