२६/११ चा दहशतवादी हल्ला मुंबईकर आजही विसरू शकलेले नाहीत. कामा रुग्णालयात दहशतवाद्यांकडून हल्ला सुरू असताना अनेक जीव सुरक्षित राहण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या कामा इस्पितळातील परिचारिका अंजली कुलथे यांनी दै. प्रहार आयोजित गजाली कार्यक्रमात प्रहारच्या टीमबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा धडकी भरवणारा तो प्रसंग कथन केला. हे सांगत असताना त्यांचे डोळे पाणावले होते. दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनीष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर, प्रशासन व लेखा विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.
‘कामा’तील भयाण रात्र…
तेजस वाघमारे
माझे वडील पुरोगामी विचारांचे. त्यामुळे त्यांना मुलांनी शिकले पाहिजे असे वाटायचे. याउलट माझे काका होते. मुलींना का शिकवायचे असे त्यांचे मत होते. आई अशिक्षित होती, तरीही ती आम्हा बहीण- भावंडांना अभ्यासाला बसवत असे. आई-वडिलांच्या आचार-विचारांमुळे आम्ही सर्वांनी चांगले शिक्षण घेतले. मी नर्सिंगला जाण्याचा हट्ट धरला. तेव्हा घरातून विरोध झाला. पण माझा हट्ट पाहून वडिलांनी मला नर्सिंगला पाठवले. तेव्हा मला वाटते होते की, नर्सिंग म्हणजे पेशंटला सेवा देणे आहे; परंतु नर्सिंगचा अभ्यास जवळजवळ डॉक्टरांसारखाच असतो. अभ्यासाकडे कल कमी असतानाही परिचारिका व्हायचे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच मी जॉबचा विचार करू लागले. मात्र घरच्या लोकांनी जॉब ऐवजी माझ्या लग्नाला प्राधान्य दिले. घेतलेले शिक्षण वाया जाऊ नये यासाठी लग्नानंतर ही माझा जॉबचा शोध सुरूच होता. माझ्या इच्छेखातर पती आणि सासूबाई यांनी नोकरी करण्यास मला परवानगी दिली. कामा रुग्णालयात मला नोकरी मिळाली. आज २३ वर्षे तिथे सेवा देत आहे.
कामावर जाताना मुलांवर आपण अन्याय तर करत नाही ना, असा प्रश्न पडत असे. पण दुसरीकडे असेही वाटायचे की, आपण त्यांच्या भवितव्यासाठीच काम करत आहोत. या दरम्यान आई-वडील, पती, सासू यांचे मला सहकार्य लाभले. त्यामुळे मी इथपर्यंतचा टप्पा गाठू शकले.
२६/११च्या त्या दिवशी माझी नाईट ड्युटी होती. रात्री पेशंटच्या फाइल चेक करण्याचे काम सुरू असताना सीएसटी स्टेशनवर फायरिंग सुरू असल्याचे समजले. जखमी रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयारी करत असताना कल्पनाही नव्हती की, अतिरेकी कामा रुग्णालयापर्यंत येतील. प्रथम गोळीबाराचा आवाज ऐकू आला. आवाज आलेल्या खिडकीच्या दिशेने मी धावत गेले. माझ्यासोबत दोन सर्व्हट होत्या. त्याही माझ्या दिशेने धावल्या. दोन दहशतवादी पुढे पळत होते आणि त्यामागून पोलीस गोळीबार करत असल्याचे मी पाहिले. कामा हॉस्पिटलचे गेट लहान असल्याने त्यावरून उडी मारून आत येणे दहशतवाद्यांना सहज शक्य झाले. आमचा आवाज ऐकून त्यांनी आमच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. पहिल्या फायरिंगमध्ये लाईट गेली, तर दुसऱ्या फायरिंगने माझ्यासोबत असलेल्या हिरा जाधव यांच्या अंगठ्याला जखम झाली. अधिक रक्तस्राव होऊ लागल्याने मी माझ्यासोबत असलेल्या एका सर्व्हटला त्यांना अतिदक्षता विभागात नेण्यास सांगितले. मात्र प्रचंड घाबरल्याने तिने नकार दिला.
हिराबाई यांच्या अंगठ्यातून अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांना चक्कर येऊ लागली, कसाबसा त्यांना धीर देत मी जिन्याने त्यांना तळमजल्यावरील अतिदक्षता विभागात नेले. यावेळी तेथील सिस्टर्सनी मावशीला काय झाले, अशी विचारणा केली. यावेळी मी त्यांना दहशतवादी हॉस्पिटलमध्ये आल्याचे सांगत त्यांच्या गोळीबारात मावशीच्या बोटाला जखम झाल्याचे सांगितले. हे ऐकल्याबरोबर सगळी धावपळ सुरू झाली. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावू लागले. अतिदक्षता विभागात ऑन ड्युटी सीएमओ गरुड मॅडम होत्या. त्यांना दहशतवादी हॉस्पिटलमध्ये आल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. तेथून मी वॉर्डमधील पेशंटच्या काळजीपोटी वॉर्डमध्ये जाण्यास निघाले. जिन्या जवळ आले असता अतिरेक्यांनी दोन्ही सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. ते रक्तबंबाळ होऊन खाली पडले. हे बघून घाबरून माझा थरकाप उडाला. कशी तरी धावत मी वॉर्डच्या दिशेने गेले. मेन लोखंडी गेट बंद करून घेतला आणि २० पेशंटना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे ठरवले. प्रसूतीपूर्व महिलांना अॅडमिट करून घेतात त्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती. एका सर्व्हटच्या मदतीने सर्व महिलांना मी पॅन्ट्रीमध्ये शिफ्ट केले. ती रूम १० बाय १०ची होती. पेशंट खूप घाबरल्या होत्या, रडत होत्या. नातेवाइकांचे फोन येत होते, महिला फोन करत होत्या. या प्रेग्नंट महिला घाबरल्या आणि त्यांना प्रसव वेदना सुरू झाल्या, तर असा प्रसंग सांभाळणे खूप मुश्कील होईल, म्हणून मी त्यांना धीर दिला. घाबरू नका, मी असेपर्यंत तुम्हाला काही होणार नाही, असे सांगितले. मी घाबरले होतेच, पण ते त्यांना दिसू दिले नाही. या महिला जास्त दिवस आमच्या संपर्कात असल्याने त्यांना विश्वास वाटला. त्यांना मोबाइल बंद करण्यास सांगितले. सर्व लाइट्स बंद केल्या. त्या दहा बाय दहाच्या खोलीत आम्हाला एकमेकांचे श्वास ऐकू येत होते. देवाचा धावा करत दुसरीकडे पेशंटना धीर देत होते. पोलीस रुग्णालयात आले होते, गोळीबार सुरू होता, हँड ग्रेनेड फेकले जात होते. समोर मृत्यू होता, भीतीचे वातावरण होते. माझ्या मुलाचा, कुटुंबाचा चेहरा समोर दिसत होता. मरायचेच आहे तर काही तरी करून मरायचे हे मी ठरवले. मला जी भीती होती तेच झाले. एका पेशंटला लेबर पेन सुरू झाला. मी तातडीने डॉक्टरांना फोन करून पेशंटला बघण्यास बोलवले. पण फायरिंग सुरू असल्याने त्यांनी तेथे येण्यास नकार दिला. गोळीबार, हँड ग्रेनेड फेकणे सुरूच होते. हँड ग्रेनेडमुळे इमारतीला हादरे बसत होते. पेशंटची प्रसूती नॉर्मल होणार नसल्याने आणखी टेन्शन वाढले. लगेच डॉक्टरांना फोन करून मी पेशंटला घेऊन येत असल्याचे कळवले. माझे कर्तव्य आणि युनिफॉर्मची शक्ती मला गप्प बसू देत नव्हती. पेशंट आणि बाळाच्या जीवाला धोका असल्याने पेशंटला विश्वासात घेऊन आम्ही वॉर्डमधून बाहेर पडलो.
गोळ्या झाडल्याने लिफ्टची चाळण झालेली होती. लिफ्ट खाली- वर व्हायची. त्यामुळे पोलिसांना वाटायचे यात दहशतवादी आहेत, त्यामुळे ते गोळीबार करायचे. अखेर जिन्याने भिंतीला खेटून मी वॉर्डपर्यंत गेलो, तिथे पेशंटला डॉक्टरांच्या स्वाधीन केले. पेशंटला मुलगी झाली, आणि तिच्या कुटुंबीयांनी घटनेच्या स्मरणार्थ तिचे नाव “गोली” ठेवले. पुन्हा मी माझ्या वॉर्डमध्ये आले. सकाळी ७.३० वाजेपर्यंत आम्ही एकमेकींना धीर देत १० बाय १०च्या खोलीत बसलो होतो. पोलिसांनी गेट उघडण्यास सांगितल्यानंतर आम्ही वॉर्डचा गेट उघडला. तेव्हा नातेवाईक आतमध्ये आले, सर्व जण रडत होते. नातेवाईक माझ्या पाया पडत होते. तुमच्यामुळे आमचा पेशंट वाचला. त्यावेळी काहीतरी केल्याचे समाधान मला वाटले.
सुन्न मनाने घरी गेले. घरातील सर्वांना प्रसंग सांगितला. या घटनेचा परिणाम माझ्या मनावर खोलवर झाला. वर्षभर मी झोपू शकले नाही. त्यासाठी मला उपचार घ्यावे लागले. कसाबच्या ओळख परेडसाठी जाण्यास मला घरच्यांचा विरोध होता. बेछूट गोळीबार करणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, या हेतूने मी घरच्यांचा विरोध पत्करला. आम्हाला सांगितले होते की, तुम्हाला कसाबच्या जवळ घेऊन जाणार नाही, लांबूनच त्याला दाखवू. पण मला अगदी जवळ घेऊन गेले, त्याच्याच उंचीचे पाच जण होते, त्यामधून कसाबला ओळखायचे होते. मी त्याला ओळखताच, तो कुचितपणे हसून बोलला “मॅडम आपने सही पेहचाना मै ही अजमल कसब हूं”.
धाडसी परिचारिका: अंजली कुलथे
वैष्णवी भोगले
२६/११च्या हल्ल्यादरम्यान कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवादी घुसलेले असताना परिचारिका अंजली कुलथे यांनी धाडसाने २० प्रसूतीपूर्व महिलांचे प्राण वाचविले. कामा हॉस्पिटलमध्ये २३ वर्षे त्या परिचारिका म्हणून काम करत आहेत. लहानपणापासून परिचारिका व्हायची त्यांनी जिद्द ठेवली होती. जातीने सोनार, जुनाट विचारसरणी असल्यामुळे मुलींना जास्त न शिकवता त्यांचे लग्न लावून देणे असे त्यांच्या काकांचे म्हणणे होते. तरीही त्या शिकल्या. माझ्या यशामागे आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. वडील हे पुरोगामी विचारांचे असल्यामुळे आम्ही पाचही भावंडे शिकलो. आई-वडिलांच्या आचार-विचारांमुळेच आम्ही सुरक्षित झाल्याचे अंजली कुलथे म्हणाल्या.
१८८७ मध्ये अंजली यांचा नर्सिंगचा डिप्लोमा पूर्ण होताच विजय कुलथे यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांचे संपूर्ण कुटुंब हे समाजसेवेशी जोडलेले आहे. पती विजय कुलथे हे नौदलामध्ये नोकरीला, तर मुलगा पायलट आहे. मुलगा लहान असल्यापासून त्याला आई-वडिलांकडे ठेऊन त्या आपले काम सांभाळत होत्या. घर आणि ड्युटी यांचा ताळमेळ सांभाळत असताना मुलाकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना असा विचार त्यांच्या मनात घोळत असे. पण आपण जे काम करत आहोत ते त्याच्याच भविष्यासाठी करत आहोत असा धीर देऊन त्या आपले काम नेमाने करत असत. २६/११ला कामा हॉस्पिटलमध्ये झालेला दहशतवादी हल्ला मन विषण्ण करणारा होता. तो प्रसंग सांगताना अंजली कुलथे यांचे डोळे पाणावले होते. २६/११च्या हल्ल्यावेळी त्या प्रसूती कक्षाच्या इन्चार्ज होत्या. त्या दिवशी त्यांना रात्रपाळी होती. त्यांच्याकडे प्रसूतीपूर्व २० महिलांची जबाबदारी होती. त्या रात्री अजमल कसाबने त्याच्या सहकाऱ्यांसोबत कामा हॉस्पिटलमध्ये शिरून अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. या हल्ल्यात हॉस्पिटलचे दोन सिक्युरिटी गार्ड गोळ्या लागून जागीच ठार झाले होते. हा प्रसंग अंजली पहिल्या मजल्यावरून पाहत होत्या. धाडसाने त्यांनी कर्तव्य बजावायला सुरुवात केली. माझे कर्तव्य आणि युनिफॉर्मची पॉवर मला गप्प बसू देत नव्हती असे त्या म्हणाल्या.
जीवाच्या आकांताने अंजली यांनी आपल्या वॉर्डचा दरवाजा बंद केला व २० प्रसूतीपूर्व महिलांना आत्मविश्वास देऊन त्यांना पॅन्ट्रीमध्ये हलवले. याचवेळी पॅन्ट्रीमधल्या एका महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यावेळी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणे हे कोणाच्याही जीवाला बेतू शकले असते. पण त्या महिलेला सुखरूप, धीर देत डॉक्टरांपर्यंत नेण्याचे काम अंजली कुलथे यांनी धाडसाने केले. दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर सकाळी हॉस्पिटलच्या गेटवर आलेल्या अनेक कुटुंबांनी आपल्या नातेवाइकांना भेटून सुटकेचा श्वास सोडला. या घटनेनंतर त्या अनेक रात्र झोपू शकल्या नाहीत. तो प्रसंग आठवताच त्या खडबडून उठत असत. एवढा मनाला हादरवून सोडणारा तो प्रसंग होता. कसाबला जेव्हा जिवंत पकडण्यात आले, तेव्हा अंजली यांना कसाबची ओळख पटवण्यासाठी बोलावले होते. जेव्हा त्याची ओळख पटली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाची जराही लकेर नव्हती. तो नजरेला नजर देऊन बोलला की, मॅडम तुम्ही अचूक ओळखलंत मला. याची मला अजूनही चीड आहे. ती रात्र जरी वैऱ्याची असली, तरी माझ्याकडे लढण्यासाठी जे बळ निर्माण झाले ते फक्त माझ्या युनीफॉर्ममुळेच.