पुणे: भारताच्या यजमानपदाखाली खेळवल्या जात असलेल्या वनडे विश्वचषक २०२३ मध्ये(world cup 2023) अफगाणिस्तान संघ(afganistan) जबरदस्त फॉर्मात दिसत आहे. संघाने एक, दोन नव्हे तर तीन वेळा धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. पहिल्यांदा अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवले, त्यानंतर पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर आता श्रीलंकेला चारीमुंड्या चीत केले.
हा सामना सोमवारी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. यात अफगाणिस्तानने श्रीलंकेला ७ विकेटनी हरवले. सामन्यात अफगाणिस्तानला २४२ धावांचे आव्हान दिले होते.
अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांनी झळकावली अर्धशतके
श्रीलंकेने दिलेले २४२ धावांचे आव्हान अफगाणिस्तानच्या संघाने ३ विकेट गमावताना पूर्ण केले. तसेच ४५.२ षटकांतच त्यांनी हे आव्हान पूर्ण केले. संघाकडून तीन जणांनी अर्धशतके ठोकली. अजमतुल्लाह उमरजईने नाबाद ७३ आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर रहमत शाहने ६२ धावांची तुफानी खेळी केली.
सामन्यात रहमत शाह आणि कर्णधार शाहिदीने सलग दुसरे अर्धशतक ठोकले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. रहमत बाद झाल्यानंतर शाहिदीने उमरजईसोबत नाबाद १११ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २४१ धावा केल्या. त्यांची सुरूवात खराब झाली. त्यांनी २२ धावांवर दिमुथ करूणारत्नेची विकेट गमावली. यानंतर पथुम निसंका आणि कर्णधार कुसल मेंडिस यांच्यात ६२ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर मेंडिसने सदीरासोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी ५० धावा केल्या.