काव्यरंग

कोजागिरी


पिंपळाखाली जमली
जंगलातील प्राणी सारी
सर्वानुमते ठरविले
साजरी करायची कोजागिरी

सायंकाळ होताच
माकड दूध घेऊन आला
रागावून हत्ती म्हणाला
किती उशीर केला?

मोठे भगोने घेऊन
गाढव धावत आले
साखर आणण्याचे काम
अखेर सशानेच केले

मॅह मॅह करीत
आली धावत शेळी
तिने पण आणली
दूध घोटायला पळी

नुसत्या दुधाकडे पाहूनच
सारे प्राणी जिभल्या चाटे
सर्व दूध आपल्यालाच मिळावे
असे प्रत्येकाला वाटे

कोल्ह्याने केली चूल
तीन दगड मांडून
पण गाढवाच्या धक्क्याने
दूध गेले सांडून

भीतीने गाढव
पळाले आपल्या घरी
कोजागिरी न झाल्याने
सर्वांना दुःख झाले भारी

- रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ


बंदिस्त सारे


तो स्वयंप्रकाशित
दानशूर अभिमानी
दिवसाचा दूत तो
फकीर असा निर्मोही
गुरुत्वाकर्षण तिच्यातलं
आसाभोवती फिरत राही

दरवळलेली सांज
त्या दोघांनाही मोहीत करते
कळ्या फुलांचा साज
मिठीत त्याच्या उधळून देते

निर्मोहीच तो...
वळून कुठे मागे पाहतो
हुरहुर तिच्या काळजाची
शशी दुरून न्याहाळतो

अंगोपांगी चंद्रबिंब मग
पांघरुनी ती घेते
श्वासात गुंफता श्वास
रातराणी दरवळून येते

तटस्थ उभी किनाऱ्यावर
तेजोवलय न्याहाळते
सोन पावलांचे ठसे
गोंदवून हृदयी घेते

स्वयंप्रकाशी जरी तो
प्रियेविना अधुरा
जाणतो तोही अंतर्मनी
कर्मयोगाचा पसारा

विधात्याच्या आधीन सारे
सुटका कोणाचीच नाही
युगानुयुगाच्या चक्रामध्ये
बंदिस्त ते तिघंही राही

- लता गुठे, मुंबई


स्केल पट्टी


कंपासमधली स्केल पट्टी
म्हणे मुलांनो झाली सुट्टी...

रबर, पेन्शील झाले खूश
घेऊ म्हणाले मधुर ज्यूस...

कोनमापक बसले रुतून
करकटकचा पाय गुंतून...

तेवढ्यात वर्गात आले सर
म्हणती भूमिती काढा वर...

भूमितीचा पहिलाच धडा
आदेश आला रेषा ओढा...

रेषा ओढायला घेतली पट्टी
तेव्हा तिने काढली थुट्टी...

कंपासमध्ये बसली जाऊन
आतून कुलूप घेतले लावून...
- भानुदास धोत्रे, परभणी


पहिल्या प्रेमाचे ‘माझे गुपित’!


पहिल्या ‘भेटीचा’ पहिला ‘आनंद’.
लुटायला आधार झालो होतो!
कधी येईल ‘ती’ मी,
तिची ‘आतुरतेने वाट’ पाहात होतो!

‘हृदय’ माझे ‘धड‌धडत’ होते!
श्वास ‘रोखून रोखून’ घेत होतो!
एकदा ‘या’ एकदा ‘त्या’ अशा
पायांवर मी नाच करीत होतो!

‘येत जात’ बरेच होते पण
‘ती माझीच’ फक्त येत नव्हती!
मनांत ‘विसरल्याची’ धास्ती,
‘सारखी’ मला वाटत होती!

‘वेळ’ जसजसा जात होता,
‘उत्सुकता’ शिगेवर पोहोचली होती!
इतक्यात एक ‘मर्सिडीज’ गाडी,
माझ्यासमोर येऊन उभी राहिली!

हळूच ‘काच’ वर ‘सरकली’
‘ड्रायव्हर’ने मला पाहिले!
सदर ‘Hello’ देशपांडे म्हणून मला
‘प्रेमाने’ आपल्याजवळ बोलविले!

‘Sorry’ देशपांडे म्हणून त्याने,
मला ‘जे काही’ सांगितले!
‘गुपित’ माझ्या ‘पहिल्या प्रेमाचे’
मी न ‘अजून’ कोणा ‘सांगितले!’

- अनिलकुमार विष्णू जोशी, नौपाडा, ठाणे (पश्चिम)
Comments
Add Comment

‘अलिन’ आशेचा एक दीप !

“केरळमधील दहा महिन्यांची अलिन वयाने सगळ्यात लहान असलेली डोनर आहे. आपलं मूल हे आईचं काळीज असतं. मुलीच्या

‘ना समझे वो अनाडी हैं!’·

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे दोबिघा जमीन’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वयाच्या ३१व्या वर्षी करिअर सुरू

चिरेबंदी वाड्यातले बालपण

स्मृतीगंध : लता गुठे आमचं साधारण पाच हजार लोकवस्तीचं गाव. नगर जिल्ह्यातल्या बॉर्डरवर असलेलं, नाव भालगाव. अतिशय

माणसातला देव, देवातला माणूस

मनस्वीनी : पूर्णिमा शिंदे अमरावती जिल्ह्यातील शेणगाव हे बाबांचे जन्मगाव. २३ फेब्रुवारी १८७६ या दिवशी ईश्वराने

चैतन्य

जीवनगंध : पूनम राणे गावात देवीचा वार्षिक उत्सव होता. या उत्सवाच्या निमित्ताने गावातून शहराकडे गेलेल्या अनेक

लग्नाला होकार आणि आयुष्य नरकासमान...

क्राइम : अॅड. रिया करंजकर प्राचीन काळामध्ये बालविवाह हा विवाहाचा प्रकार चालत होता. मुलं सज्ञान होण्याच्या आतच