Saturday, November 1, 2025
Happy Diwali

Kojagiri Pournima : कोजागिरी पौर्णिमा...

Kojagiri Pournima : कोजागिरी पौर्णिमा...
  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

नवरात्रीच्या उत्सवानंतर वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. कोजागिरी पौर्णिमेला पूर्ण चंद्राचे दर्शन सोबतच त्याची शीतलता वेगळीच अनुभूती देऊन जाते. चंद्राचं चांदणं रात्रीच्या उत्तरार्धात अधिकाधिक खुलून दिसतं म्हणूनच तो अनुभव घेण्यासाठी सर्वजण रात्री जागतात. कोजागिरी पौर्णिमा ते साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येते म्हणजेच अश्विनी पौर्णिमेला येते. को-जागृती म्हणजेच कोण जागे आहे? देवी लक्ष्मी पृथ्वीतलावर येते आणि कोण जागे? हे पाहते व जो जागा आहे त्याला ती प्रसन्न होते, अशी आख्यायिका आहे.

भारतात साधारण सर्वच ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हिंदू प्रथेनुसार कोजागिरी पौर्णिमेला दुधात जायफळ, केसर, सुकामेवा, दूध मसाला टाकून आटवलं जातं. तीन तास दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून मग ते प्राशन केले जाते. त्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. चंद्राच्या चांदण्यात दुधावर योग्य तो परिणाम होऊन ते दूध पिण्यासाठी आरोग्याला उत्तम औषध असतं. या दिवशी काही भागात तांदळाची खीरही बनवली जाते. तांदूळ, दूध व चंद्राचं चांदणं त्यामुळे सर्व आवश्यक अशी तत्त्व आपल्या आरोग्याला हितकारक ठरतात. तसेच हा प्रसाद सर्वांना मिळावा, यासाठी काही ठिकाणी जत्रा भरते. स्त्रिया नटून-थटून सण साजरा करतात. गोड पदार्थ बनवतात तसेच देवाला वेगवेगळे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. दिवसभर व्रत म्हणून उपास धरला जातो आणि रात्री या दुधाने हा पूर्ण होतो. अनेक ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला फेर धरून नृत्य केले जाते. एकंदरीतच सर्व एकत्र येऊन आनंदाने नाचतात आणि उत्साह निर्माण करतात.

कोजागिरी पौर्णिमेपासून थंडीला सुरुवात होऊन या चंद्राच्या चांदण्यात नृत्य, गाणी, गप्पांचा फड रंगतो. इतर कोणत्याही दिवशी दिसणार नाही, असं आकाश निरभ्र आणि स्वच्छ कोजागिरी पौर्णिमेलाच दिसतं. माझ्यासाठी कोजागिरी पौर्णिमा एक वेगळेच महत्त्व आहे, कारण या दिवशी माझ्या बाबांचा तिथीनुसार वाढदिवस असतो. आम्ही बाबांना म्हणत असू की, “तुमचेच कसे दोन वाढदिवस.” आजी म्हणत असे, “तुझा बाबा ना चंद्र आहे कोजागिरीचा!” आम्ही त्यावर हसत असू. बाबांचा वाढदिवशी आई तांदूळ खीर, बटाटे वडे याचा बेत आवर्जून करत असे. आजी-बाबांना आणि त्यानंतर चंद्रालाही ओवाळत असे आणि त्यांना शुभाशीर्वाद देत असे. चंद्राचं व बाबांचा औक्षण हा क्षण दरवेळी मला कोजागिरी पौर्णिमेला आठवतोच. आजही चंद्रात मला माझ्या बाबांचे दर्शन होते. म्हणून कोजागिरी पौर्णिमा मला खूप आवडते.

बऱ्याच ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला नवीन कपडे, धान्य, नवीन वस्तू घेण्याची प्रथा आहे. कारण ही पौर्णिमा शुभ संकेत देणारी आहे. शेतकरी शेतात नवीन धान्य निर्माण करतो. कामाची नव्याने सुरुवात करतो. या दिवशी नवीन दागिने बनवले जातात. ते परिधान करून सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. अशी ही कोजागिरी पौर्णिमा सर्वांना सुजलाम सुफलाम व एकतेचा संदेश देते.

Comments
Add Comment