Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीMumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे सरकारची विशेष पावले

Mumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे सरकारची विशेष पावले

जाणून घ्या सरकारचे नवे नियम

मुंबई : मुंबईत सध्या प्रदूषणाचे (Mumbai Pollution) प्रमाण प्रचंड वाढले आहे. हवेची गुणवत्ता (Air Quality) अत्यंत खालावली असल्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे विकार (Breathing diseases) उद्भवत आहेत. वांद्रेसारख्या ठिकाणी तर हवेचे गुणवत्ता प्रमाण १८६ इतक्या निर्देशांकाने खालावले आहे. दिल्लीलाही मागे टाकत मुंबई हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. सलग दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (एक्यूआय) ३०० ची पातळी गाठली. ही धोकादायक पातळी आहे. तर, दुसरीकडे दिल्लीत सकाळी १० वाजेपर्यंत ही पातळी २४९ इतकी होती.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून केवळ मुंबई, पुणेच नव्हे तर राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन राज्य सरकारने काही नवे नियम तयार केले आहेत. त्यानुसार हे नियम पाळणे सर्वांना बंधनकारक असणार आहे, अन्यथा कडक पावले उचलण्यात येणार आहेत.

मुंबईत अनेक ठिकाणी बांधकामांचे प्रकल्प सुरु आहेत. शिवाय लोकसंख्यावाढीमुळे वाहनांची संख्या वाढली असून त्यातून निघणार्‍या धुराचे प्रमाण प्रचंड आहे. अनेक कंपन्या, उद्योगधंदे यांच्या कारखान्यांतून बाहेर पडणारा धूर ही मुंबईतील प्रदूषणाची काही मुख्य कारणे आहेत. याच बाबींचा विचार करुन राज्य सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

काय आहेत मार्गदर्शक तत्त्वे?

१. पालिका क्षेत्रातील बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवती किमान २५ फूट उंच पत्रे उभारत कामे करावीत. सोबतच पालिका बाहेरील क्षेत्रात किमान २० फूट उंच पत्रे उभारत कामे होतील याची खात्री करावी.

२. निर्माणाधीन सर्व इमारतींना सर्व बाजूंनी ओल्या हिरव्या कापडाने बंदिस्त करुन कामं करावीत.

३. पाडकाम होत असलेल्या सर्व बांधकामांना ओल्या कपड्याने झाकावे, सोबतच पाडकामादरम्यान सतत पाण्याची फवारणी करावी, जेणेकरुन धुळीवर नियंत्रण राहील.

४. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग दरम्यान वॉटर फॉगिंग केले जाईल याची खात्री करावी.

५. बांधकाम सुरु असलेल्या साईट्सवर धुलीकण उडत असल्याने मलब्यांवर पाण्याची फवारणी करत राहावी.

६. बांधकाम साहित्य किंवा भंगार वाहतुकीदरम्यान धुलीकण हवेत जाऊ नयेत यासाठी हे सामान वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकली जावीत. सोबतच वाहनातून कोणतीही गळती टाळण्यासाठी वाहने ओव्हरलोड करु नयेत.

७. सर्व बांधकाम साइट्सने कामाच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू प्रदूषण मॉनिटर्स लावणे गरजेचे आहे. मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण पातळी असेल तर त्यावर त्वरित कारवाई करावी. सोबत हे मनपा अधिकार्‍यांना देखरेखीसाठी उपलब्ध करून द्यावे.

८. सर्व कामाच्या ठिकाणी ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग आणि ट्रिमिंगची कामं बंदिस्त ठिकाणी करावी, हवेत धुलिकण उडाल्यानंतर त्यावर पाण्याची फवारणी करत राहावी.

९. सर्व बांधकाम कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकांनी गॉगल्स, हेल्मेट उपलब्ध करुन द्यावे.

१०. पूल आणि उड्डाणपूल यांसारख्या सर्व कामाच्या ठिकाणी किमान २० फुटांचे बॅरिकेडिंग असावे.

११. जमिनीवरील मेट्रोची सर्व कामे २० फूट उंचीच्या बॅरिकेडिंगने झाकली जावीत. बांधकामाची जागा ताडपत्री / ओल्या हिरव्या कापडाने / ओल्या पाटाने झाकलेली असावी. स्मॉग गन/वॉटर स्प्रिंकलर्सचा वापर बांधकामाच्या दरम्यान केलं जावा.

१२. जिल्हाधिकारी / आयुक्तांनी रात्री उशिरा अवैध सी आणि डी डम्पिंग रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करावीत.

१३. जिल्हाधिकारी / आयुक्तांनी वायू प्रदूषण कमी करण्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके तैनात करावीत. पथकाचे नेतृत्व प्रभाग/तालुक्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे असेल.

१४. अंमलबजावणी पथक परिसराला भेट देईल आणि कार्यस्थळाची व्हिडिओग्राफी करेल. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

१५. परिपत्रक जारी केल्यापासून स्प्रिंकलरच्या खरेदीसाठी १५ दिवसांची आणि स्मॉग गनच्या खरेदीसाठी ३० दिवसांची मुदत असेल. सर्व प्रकल्प प्रस्तावक/कंत्राटदारांना न चुकता वेळेचे पालन करावे लागेल.

१६. बांधकाम साहित्य किंवा C & D साहित्य वाहून नेणार्‍या वाहनांवर वाहन ट्रॅकिंग यंत्रणा बसवलेली असेल व ती नियमांचे पालन करत नसेल तर, RTO/पोलीस विभागाकडून जप्त करण्यात येईल.

१७. परिवहन विभाग ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करेल. उघडी वाहने, रस्त्यांवर बांधकाम साहित्य सांडणारी वाहने यांवरही कारवाई करण्यात येईल.

१८. साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध PUC प्रमाणपत्रे असतील आणि ती अधिकार्‍यांच्या मागणीनुसार सादर केली जातील याची खात्री करण्यात येईल.

१९. MPCB महामंडळ क्षेत्रात असलेल्या उद्योगांमधून उत्सर्जित होणाऱ्या वायू प्रदूषणावर लक्ष ठेवेल.

२०. वाहनांचे टायर धुण्याची सुविधा सर्व बांधकाम स्थळांच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी पुरवली जाईल. व्हॅक्यूम स्वीपिंग किंवा पाणी शिंपडणे या कृती धूळ काढण्यासाठी, प्रमुख रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी कराव्यात.

२१. कोठेही कचरा उघड्यावर जाळण्यावर पूर्णपणे बंदी असेल, विशेषतः कचरा डंपिंग ग्राउंड आणि कचरा जाळण्याची संभाव्य ठिकाणे.

२२. महानगरपालिका/नगरपरिषद क्षेत्रांतर्गत सर्व रस्त्यांना पक्के फूटपाथ दिले जातील.

२३. बेकरीमध्ये इलेक्ट्रिक ओव्हन, पीएनजी किंवा इतर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी दिशानिर्देश जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

२४. स्मशानभूमीच्या सुविधांचे इलेक्ट्रिक किंवा इतर ठिकाणी संक्रमण करण्यासाठी सक्रिय पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणास अनुकूल अंत्यसंस्कार पद्धती वापरली जावी.

२५. एमपीसी बोर्डाने स्थापित केलेली हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे वाढवण्यात येतील.

२६. नियमित जनजागृती मोहिमा राबवल्या जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -