Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखहमास व हवाई हल्ल्याचा मास्टरमाइंड

हमास व हवाई हल्ल्याचा मास्टरमाइंड

भालचंद्र ठोंबरे

‘याह्या सिनवर’चे भवितव्य
इस्रायलच्या जगप्रसिद्ध गुप्तहेर संघटना मोसादला थोडीही कुणकुण लागू न देता ७ ऑक्टोबर रोजी सकाळी आतंकी घुसखोरांनी ईस्रायलवर जमीन, हवा व पाणी या तीनही मार्गाद्वारे हल्ला केला. तसेच वीस मिनिटांत पाच हजारांच्या वर रॉकेटद्वारे हल्ला करून ईस्रायल तसेच सर्व जगाला हादरवून टाकले. सीमेवरील कुंपण तोडून आतंकींनी दुचाकीवर स्वार होऊन शहरात दिसेल त्याला गोळ्या घातल्या. तसेच घरात शिरूर घरातील लहान बालकांसह सर्वांना ठार केले. या अचानक हल्ल्याने गोंधळलेल्या नागरिकांपैकी काही तसेच काही सैनिकांनाही कैद करून ताब्यात घेतले. याप्रसंगी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराचे टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या व्हीडिओची दृष्ये थरकाप उडविणारे, बिभत्स व विकृतीपूर्ण होते, असा बर्बरतापूर्ण हल्ला करणारे हल्लेखोर होते पॅलेस्टिनी, आतंकी संघटना हमासचे.

पूर्वपीठिका
स्थापनेपासूनच शेजारील अरब शत्रू राष्ट्रांच्या आक्रमणाचा सामना कराव्या लागणाऱ्या ईस्रायलने प्रत्येकवेळी त्याचेवर मात केली. १९६७ साली सभोवतालच्या इजिप्त, जॉर्डन, सीरिया यांचेसोबत सहा दिवस चाललेल्या युद्धात ईस्रायलने इजिप्तपासून गाझा पट्टी व सिनाई प्रायद्विप, जॉर्डनपासून वेस्ट बँक (जॉर्डन नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याने या प्रदेशाला वेस्ट बँक म्हणतात.) पूर्व जेरुसलेम व सिरियापासून गोलाईन टेकड्या आदी प्रदेश जिंकून घेतले. यापैकी १९८२ साली कॅप डेव्हिड करारानुसार सिनाई प्रायद्वीप इजिप्तला
परत केले.

हमासची स्थापना
१९४८ च्या स्थापनेपासूनच ईस्रायल आपल्या सभोवतालील शत्रू राष्ट्रांच्या डोळ्यांत खुपू लागला होता. तर ईस्रायलने आपली भूमी बळकावली असा पॅलेस्टिनींचा दावा आहे. त्यामुळे ईस्रायलने जिंकलेल्या प्रदेशातून तसेच निर्वासित होऊन शेजारच्या राष्ट्रात शरणार्थी म्हणून राहणाऱ्या अनेक पॅलेस्टिनीयांनी आपली भूमी परत घेण्यासाठी विविध संघटना करून आंदोलने केली. १९८७ साली गाझाच्या एका चेकपोस्टवर त्यांचे आंदोलन सुरू असताना ईस्रायली सैनिकांनी केलेल्या गोळीबारात चार पॅलेस्टिनी ठार झाले. याच घटनेमुळे ईस्रायल विरोधात सशस्त्र आंदोलन करण्याच्या इराद्याने हमासचा जन्म झाला. हमास म्हणजे हरकत अल मुकवामा अल इस्लामिया. अर्थात इस्लामिक रेजिमेंट मुव्हमेंट. म्हणजेच इस्लामिक प्रतिशोध आंदोलन. ही एक इजिप्शियन व पॅलेस्टिनीयन सुन्नी मुसलमानांची संघटना आहे. इस्माइल हनियेह हा सध्या संघटनेचा प्रमुख आहे.

हमासचा उद्देश
संघर्ष करून ईस्रायलजवळून पॅलेस्टिनी भूमी परत घेणे व त्याठिकाणी इस्लामीक राज्याची स्थापना करणे हा हमासचा उद्देश आहे.

संघर्ष
ईजिप्तची राजधानी कैरो येथे राहणाऱ्या पॅलेस्टिनी शरणार्थी शेख अहमद यासीन यांनी हमासची स्थापना केली. यासीन पॅलेस्टिनीयन मौलवी होता. वयाच्या बाराव्या वर्षीच एका खेळातील अपघातामुळे तो दोन्ही पायाने अपंग झाला. त्यामुळे तो नेहमी व्हीलचेअरचा वापर करीत असे. १९६० च्या दरम्यान तो गाझा व वेस्ट बँकमध्ये धर्मप्रसार करीत होता. सुरुवातीला ईस्रायलची त्याच्याकडे वक्रदृष्टी नव्हती. उलट यासीर अराफतच्या पीएलओला पर्याय म्हणून हमासला नजरेआड केले होते. १९७३ मध्ये यासीनने गाझामध्ये स्थापन केलेल्या एका धर्मदाय संस्थेला ईस्रायलने मान्यताही दिली होती. पण १९८४ मध्ये त्याला व त्याच्या काही सहकाऱ्यांना गुप्तपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली व तो पोलिसांच्या नजरेत आला. १९९१ मध्ये त्याला लोकांना ईस्रायल सैनिकांचे अपहरण करून हत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली व जन्मठेप व पंधरा वर्षांची शिक्षा झाली.

१९९२ मध्ये हमासच्या सैनिकी शाखेची स्थापना करण्यात आली व एप्रिल १९९३ मध्ये हमासने ईस्रायलवर पहिला आत्मघातकी हल्ला केला. दरम्यान पीएलओच्या यासीर अराफत यांना ईस्रायलला समूळ नष्ट करणे शक्य नसल्याची जाणीव झाल्याने अमेरिकेच्या मध्यस्थीने ईस्रायल व पॅलेस्टिनीयन राष्ट्रपती यासीर अराफत यांच्यात १९९४ ला ओस्लो करार झाला. त्यानुसार पीएलओने ईस्रायलला मान्यता दिली व बदल्यात गाझा व वेस्ट बॅकमध्ये पॅलेस्टीनच्या स्वशासनाबाबत तजोड झाली व त्यानुसार सत्ता स्थापण्याच्या दृष्टीने पॅलेस्टिनी अथॉरिटीची (PA) स्थापना करण्यात आली. हमासने मात्र ईस्रायलविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या. गर्दीची ठिकाणे, बस, कार यांच्याद्वारे आत्मघातकी कारवाया सुरूच होत्या. १९९७ मध्ये जॉर्डनच्या कैदेत असणाऱ्या मासोदच्या दोन गुप्तहेरांच्या बदल्यात त्याची सुटका करण्यात आली. त्याला ईस्रायलला मान्यता देण्याची बाब मान्य नव्हती. मात्र मर्यादित स्वरूपात का होईना पॅलेस्टिनीयनचे लोकप्रतिनिधित्व करणारा अधिकार मिळतो म्हणून त्याचा पॅलेस्टिनी प्राधिकरणाला पाठिंबा होता. मात्र २२ मार्च २००४ रोजी ईस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात तो ठार झाला. त्याचवर्षी यासीर अराफतचाही मृत्यू झाला. अराफतची जागा महमूद अब्बासने घेतली. ते पी. ए.चा चेहरा बनले. मात्र तो एवढा प्रभावी नसल्याने हमासचा प्रभाव वाढला. २००५ मध्ये ईस्रायलने गाझामधून आपले सैन्य व वस्त्या (नागरिक) वापस घेतल्या. तेव्हा हमासने राजकारणात उडी घेतली. २००६ मध्ये निवडणुका होऊन गाझामध्ये हमासचा विजय होऊन इस्साम अल-दाअलीस पंतप्रधान झाले. वेस्ट बँकमध्ये पी.एल.ओ.च्या “फतह”ने विजय मिळवून मोहम्मद अब्बास हे अध्यक्ष झाले.

आजमितीस हमासच्या एकंदर तेरा शाखा असून पोलीट ब्युरो ही १५ सदस्यवाली प्रमुख शाखा आहे. पो.ब्यूरो हमासची रणनिती ठरवते. शाखेचा प्रमुख इस्माइल हनियेह असून तो कतारमध्ये असतो.

पोलीट ब्युरोच्या १) डेलिगेशन अब्रॉड व २) शुरा काऊंसिल या दोन शाखा आहेत. शुरा कौन्सिल ही सल्लागार समिती असून पोलीट ब्युरोच्या सदस्य निवडीत महत्त्वाची भूमिका बजावते. शुरा कौंसीलच्या १) वेस्ट बँक अफेयर्स (प्रमुख सालेह अरोरी) २) इम्प्रिझंड मेंबर्स अफेयर्स (प्रमुख सलमेह कतवई) ३) पॅलेस्टिनीयन डायस्पोरिक अफेयर्स (प्रमुख खालीद मिशाल) व ४) गाझन अफेयर्स (प्रमुख याह्या सिनवर) हे भाग आहेत. सिनवर हमास संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे.

गाझन अफेअर्सच्या १) सोशल वेल्फेअर्स, २) सैनिकी शाखा-इज्ज-अल-दीन अल कासम ब्रिगेड (प्रमुख मरवान इस्सा व मोहम्मद दायफ.) मो. दायफ हा सुरंग निर्मिती व बॉम्ब निर्मिती तज्ज्ञ गणल्या जातो. ३) इंडिपेंडेंट डेली अफेयर्स सेल, ४) हमास गव्हर्मेंट (प्रमुख इस्साम-अल-दाअलीस) या शाखा आहेत. हमास गव्हर्मेंटमध्ये मंत्रालय आणि लोकल ॲथोरिटी व सुरक्षा दल असे दोन भाग आहेत.

काही देश हमासला आतंकवादी संघटना मानतात तर काही देश हमासच्या केवळ सैनिकी शाखा कासम ब्रिगेडलाच आतंकवादी मानतात. इराण हमासला आर्थिक मदत करतो, तर टर्की, कतार हे देश त्यांच्या नेत्यांना आश्रय देतात असा ईस्रायल व अमेरिकेचा दावा. गाझावर हमासची सत्ता येताच ईस्रायलने गाझाची नाकेबंदी करून निर्बध लादले. तेव्हा हमासने सुरुंग खोदून त्याद्वारे आपल्या दळणवळणाचा उपाय शोधला. हे सुरुंग उत्तर गाझा मधे अधिक प्रमाणात आहेत. यांची सुरुवात अगर शेवट एखाद्या इमारतीत हाॅस्पिटल धार्मिक स्थळे यामधे होतो. जेणेकरून शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण होऊ शकेल. या भुयारात राहण्यासाठी तसेच स्फोटक पदार्थ साठविण्याच्या सुविधा आहेत. यांचा उपयोग कमांड सेंटरसारखाही केला जातो.

हमासच्या सैनिकी शाखेने ईस्रायल वर राॅकेट हल्ले सुरू केले. तेव्हा हे हल्ले बंद पाडण्यासाठी ईस्रायलने गाझावर हल्ला केला. २००८ मध्ये ईस्रायलने केलेल्या कारवाईत अंदाजे १२०० हून अधिक पॅलेस्टिनी व १२ ईस्रायल नागरिक मरण पावले तर२०१२ मधील कारवाईत १७० पॅलेस्टिनी व ७ ईस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. २०१४ च्या ईस्रायल हमासच्या संघर्षात २५०० पॅलेस्टिनी व ८० ईस्रायल नागरिक ठार झाले २०२१ च्या अल अलास्का मस्जिद प्रकरणात शेकडो पॅलेस्टिनी मारले गेले. त्यानंतर काहीकाळ शांततेचे वातावरण होते मात्र ही वादळा पूर्वीची शांतता होती हे ७ आक्टोबरच्या थरारक व क्रूर
हल्ल्यावरून दिसते.

७ आक्टोबरच्या हल्ल्याची कारणे
या हल्ल्याबाबत सांगताना हमासाचा एक नेता बराकाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही हल्ल्याची तयारी दोन वर्षांपासून केली आहे व ईस्रायलने गाझाची केलेली नाकाबंदी, वेस्ट बँकमधील हमास कार्यकर्त्यावर ईस्रायल सैनिकांचे हल्ले; वेस्ट बँकमध्ये ईस्रायलने निर्माण केलेल्या अवैध वसाहती व अल अलस्का मस्जिद संबंधित घटना या सर्व कारणामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे, तर काहींच्या मते सौदी अरेबिया व ईस्रायलमध्ये सुरळीत होऊ पाहणाऱ्या संबंधाला मोडता घालण्यासाठी हमासला हल्ला करण्यासाठी प्रेरित करण्यात आले.

ईस्राायलसाठी मोस्ट वॉन्टेड ‘‘याह्या सिनवर’’
कारण कोणतेही असो, मात्र या क्रूर हल्ल्याने संतप्त झालेल्या ईस्रायलने हमासला नेहमीसाठी अद्दल घडविण्याची प्रतिज्ञा केली आहे. या हल्ल्यासाठी त्यांनी गाजन प्रमुख याह्या सिनवर याला जबाबदार धरले असून तो ईस्रायलचा मोस्ट वॉन्टेड आहे. याह्या सिनवर हमासमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे. त्याचा जन्म २९ ऑक्टोबर १९६२ रोजी गाजामधील खान यूनस या शहरी झाला. तो गाझाच्या इस्लामिक विश्वविद्यालयाचा पदवीधर आहे. १९८९ मध्ये ईस्रायल सैनिक व आपलेच काही सहयोगी यांच्या हत्तेप्रकरणी त्याला आजीवन कारावास झाला. मात्र २०११ मध्ये ईस्रायल सैनिक गिलाद शालीतच्या बदल्यात त्याला सोडण्यात आले. ईस्रायल संदर्भातील कोणत्याही चुकीसाठी तो आपल्या सहकाऱ्यांना तो ठार करीत असल्याने “खान यूनसचा कसाई” म्हणूनही ओळखला जातो. त्याने हमासमध्ये आतंकी गटासाठी आंतरिक सुरक्षा दल निर्माण केले. २०१५ मध्ये अमेरिकेने त्याला खुंखार आतंकी म्हणून घोषित केले व तेव्हापासून तो प्रसिद्धीला आला. २०१७ मध्ये तो गाझामधील हमासचा प्रमुख झाला. ईस्रायलच्या सुरक्षा दलाचे प्रवक्ता लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेचटनुसार याह्या हा सैतानाचा चेहरा असून इस्राइलवरील हवाई हल्ल्याचा तो मास्टर माईंड आहे.

कठीण काळ
या हल्ल्याने सततच्या सावध वृत्तीला छेद गेल्याने संतप्त ईस्रायलने गाझाला सर्व बाजूने सैन्याने वेढून हमासला पूर्णपणे नष्ट करण्याची धमकी दिली आहे. ईस्रायल आपल्या शत्रूला संपविण्यासाठी कोणतेही धाडस करतो हे मागील इतिहास दर्शवितो व हीच बाब हमास व त्याच्या नेत्यांसाठी धोकादायक ठरू शकते. वेळ आहे तो केवळ हमासच्या ताब्यातील
बंधकांच्या सुटण्याची.

गाझावर सतत होणारे हल्ले आम्ही सहन करू शकणार नाही, अशी गर्भित धमकी इराणने दिली आहे. तर ईस्रायलला कारवाईचा हक्क असल्याचे सांगून व भूमध्य सागरात आपल्या दोन युद्धनौका पाठवून अमेरिकेने ईस्रायलची पाठराखण केली आहे. अमेरिकेच्या या कृतीने युद्धाच्या विस्ताराला मर्यादा पडतील की युद्ध अधिक विस्तारेल हे येणारा काळच ठरवेल. पण ईस्रायलची जिद्द व बदल्याचा इतिहास पाहता याह्या सिनवर, हमास व गाझा पट्टीसाठी येता काळ कठीण राहील हे निश्चित.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -