Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमहुआ मोइत्रा वादाच्या भोवऱ्यात...

महुआ मोइत्रा वादाच्या भोवऱ्यात…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर

महुआ मोइत्रा या तृणमूल काँग्रेसच्या तेज तर्रार खासदार म्हणून ओळखल्या जातात. लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदार म्हणून त्या नेहमीच मोदी सरकारवर आक्रमक हल्ला करण्यात आघाडीवर असतात. पण आपण आरोप करताना स्वत: स्वच्छ आहोत का, याचे त्या भान विसरल्या. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मुंबईच्या एक बड्या उद्योजकाकडून त्या पैसे घेत होत्या, असा भाजपाच्या खासदाराने आरोप केल्यापासून त्यांच्याभोवती संशयाची सुई वेगाने फिरू लागली आहे.

महुआ यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. कुणाची त्या सुपारी घेऊन संसदेत प्रश्न विचारीत आहेत, या प्रश्नाने सर्वांनाच भंडावून सोडले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस या विषयावर काहीच बोलत नाही. पक्षाचे महासचिव कुणाल घोष यांनी म्हटले आहे की, या मुद्द्यावर पक्ष काही बोलणार नाही. त्याचे उत्तर संबंधित व्यक्तीच देऊ शकेल… महुआ मोइत्रा यांनी २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील करीमनगरमधून विधानसभा निवडणूक जिंकली होती. २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार म्हणून त्या कृष्णनगरमधून लोकसभेवर निवडून गेल्या. महुआ या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यावर तृणमूल काँग्रेसने त्यांच्यापासून अंतर राखले आहे. त्यांनी संसदेत अदानी समूहावर प्रश्न विचारण्यासाठी मुंबईचे बडे उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आरोप जरी महुआवर असला तरी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकू शकत नाही.

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महुआने केलेल्या भ्रष्टाचाराचा स्फोट केला. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तसेच लोकपाल यांच्याकडे रितसर तक्रार नोंदवली आहे. पैशाच्या लोभापायी तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने देशाची सुरक्षा व्यवस्थाच धोक्यात आणली आहे. या खासदाराच्या आयडीचा वापर त्यांचा पीए व अन्य एकजण दुबईत करीत होते, त्याचवेळी या खासदार भारतात होत्या, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. भाजपाने केलेल्या आरोपांना उत्तर देताना महुआ यांनी म्हटले आहे, मला ठाऊक आहे की, सीबीआय माझ्या घरी छापा मारणार आहे. ईडी माझ्या घरी येऊ शकते. पण त्या अगोदर ज्यांनी १३ हजार कोटींचा कोळसा घोटाळा केला, त्यांच्यावर एफआयआर दाखल करावा… हिरानंदानी यांना सीबीआय किंवा संसदेच्या एथिक्स समितीने बोलाविलेले नाही, मग त्यांनी प्रतिज्ञापत्र कुणासाठी सादर केले? केवळ माझी बदनामी करण्यासाठी काहींच्या मदतीने त्यांनी तयार केले असावे…, असेही त्यांनी म्हटले आहे. हिरानंदानी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, महुआ माझ्याकडून अत्यंत महागड्या वस्तूंची मागणी करीत होत्या. जे काम मी करू इच्छित नव्हतो, ते काम करण्यासाठी त्या माझ्यावर दबाव आणत होत्या. पण माझ्याकडे काही पर्यायच उरला नव्हता.
महुआ मोइत्रा यांनी म्हटले आहे की, मला ते घाबरत होते, म्हणून दर्शन माझ्या मागण्या म्हणे मान्य करीत होते. दर्शन व त्यांचे वडील हे देशातील मोठ्या उद्योग समूहाशी संबंधित आहेत, की ज्यांच्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये झाले. ज्याचा एवढा मोठा संपर्क आहे, ते मला कशाला घाबरू शकतील? हिरानंदानी यांनी म्हटले आहे की, अदानींवर प्रश्न विचारण्यासाठीच महुआ यांनी माझ्याकडे मदत मागितली होती. मी त्यांना थेट प्रश्न पाठवू शकेन यासाठीच त्यांनी त्यांचा आयडी ईमेल दिला होता.

दि. १४ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहाडराय यांनी महुआ यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार दिली. हीच तक्रार १५ ऑक्टोबर रोजी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. १७ ऑक्टोबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महुआ विरोधातील तक्रार एथिक्स समितीकडे सोपवली. त्याच दिवशी महुआ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आपली मानहानी झाल्याचा दावा केला. दर्शन यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांना आपल्या विरोधात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप महुआ यांनी सरकारवर केला. संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारले जातात, या सर्व प्रकरणाची सुनावणी लोकसभा एथिक्स कमिटीपुढे २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
या प्रकरणात समितीने निशिकांत दुबे व लोकसभा उपसचिव बाला गुरू यांना नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलावले. ‘कॅश फॉर क्वेरी’ या प्रकरणातील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा या मुळात बँकर आहेत. त्यांचे उच्च शिक्षण अमेरिकेत झाले. लंडनमधील एका प्रतिष्ठित बँकेत त्या नोकरी करीत होत्या. नोकरी सोडून त्या राजकारणात आल्या. २०१६ मध्ये आमदार व २०१९ मध्ये खासदार झाल्या.

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी २००९ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी ते एस्सार ग्रुपचे कॉर्पोरेट हेड होते. २००९ मध्ये झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. नंतर २०१४, २०१९ मध्येही लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. दर्शन हिरानंदानी रिअल इस्टेट कंपनी हिरानंदानी ग्रुपचे सीइओ आहेत. त्यांचे वडील निरंजन हिरानंदानी यांचे रिअल इस्टेट क्षेत्रात फार मोठे नाव आहे. ४२ वर्षांच्या दर्शन हिरानंदानी यांनी महुआ यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. दर्शन हे डेटा सेंटर, क्लाऊड काम्युटिंग, तेल व गॅस, लॉजिस्टिक, वेअर हाऊस आदी कंपन्यांचे प्रेसिडेंट आहेत. दर्शन यांनी न्यूयॉर्क येथील रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून एमबीएची पदवी मिळवली. जय अनंत देहाडराय हे सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत.

जय अनंत देहाडराय व महुआ मोइत्रा यांचे अगोदर चांगले संबंध होते. नंतर त्यांच्यात बिनसले. गेल्या सहा महिन्यांत महुआ यांनी देहाडराय यांच्याविरोधात अतिक्रमण, चोरी, असभ्य संदेश, दुर्व्यवहार केल्याबद्दल पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. दुसरीकडे देहाडराय यांनी महुआ विरोधात सीबीआयकडे तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार नोंदवली. गेल्या सहा महिन्यांत महुआ मोइत्रा यांनी संसदेत विविध २८ केंद्रीय मंत्रालयांच्या संदर्भात ६२ प्रश्न विचारले, पैकी ९ प्रश्न हे अदानी समूहाच्या संबंधित आहेत, असे समजले. त्यातले काही प्रश्न हे पेट्रोलियम, अर्थ, नागरी उड्डाण, कोळसा मंत्रालयाशी संबंधित आहेत. जेव्हा संसदेत खासदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, तेव्हा त्या खासदाराला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. समितीकडून ज्यांनी आरोप केले, त्यांचेही जबाब घेतले जातात. कोणाच्या वैयक्तिक हितासाठी किंवा कोणत्याही उद्योग समूहाच्या हितासाठी प्रश्न विचारले गेले असतील, तर त्याची चौकशी होऊन त्याचा अहवाल एथिक्स कमिटी लोकसभा अध्यक्षांना पाठवते. तो अहवाल संसदेत माडला जातो व त्यावर आधारित आरोप असलेल्या खासदारांवर कारवाई केली जाते.

लोकसभा एथिक्स कमिटीवर एक अध्यक्ष व १४ सदस्य आहेत. भाजपाचे विनोद सोनकर (खासदार, कोशाम्बी, उत्तर प्रदेश) हे समितीचे अध्यक्ष आहेत. विष्णुदत्त शर्मा (खजुराहो, मध्य प्रदेश), सुमेधानंद सरस्वती (सीकर, राजस्थान), अपराजिता सारंगी (भुवनेश्वर, ओरिसा), डॉ. राजदीप रॉय (सिलचर, आसाम), सुनीता दुग्गल (सिरसा, हरियाणा), सुभाष भामरे (धुळे, महाराष्ट्र) हे भाजपाचे खासदार समितीवर सदस्य आहेत. तसेच वैठीलिंगम (पुडुचेरी), ए. उत्तमकुमार रेड्डी (तेलंगणा), बालशौरी वल्लभनेनी (आंध्र प्रदेश), परनीत कौर (पंजाब) हे काँग्रेसचे खासदार समितीवर सदस्य आहेत. हेमंत गोडसे (शिवसेना), गिरिधारी यादव (जनता दल यू), पीआर नटराजन (सीपीएम), कुंवर दानिश अली (बसप) हेही समितीचे सदस्य आहेत. जर महुआ मोइत्रा दोषी ठरल्या, तर त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते…

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -