प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवणाऱ्या ‘रामायण’ या नावाजलेल्या मालिकेसह अनेक प्रसिद्ध सीरियल, चित्रपट यांना कॅमेऱ्यातून कैद करणारे दिग्गज कॅमेरामन अजित नाईक यांनी दैनिक प्रहारच्या गजाली कार्यक्रमात सहभागी होत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
वयाची ७६ वर्षे पूर्ण करून अजूनही चित्रीकरणाची हौस ओसंडून वाहणारा चिरतरुण असे अजित नाईकांचे वर्णन केल्यास ते वावगे ठरू नये. दूरदर्शनवरील जवळपास चित्रीकरणाचे सर्व प्रकार हाताळणारे “अजित नाईक” नावाचे विद्यापीठ जेव्हा बोलतं होतं, तेव्हा ते सांगत असलेल्या अनुभवांचा खजिना आपण अचंबित होऊन ऐकू लागतो.
छायाचित्रण कला वडिलोपार्जित असल्याने कुठल्याही प्रकारचे शास्त्रोक्त शिक्षण न घेता चुका-शिका पद्धतीने नाईकांनी छायाचित्रणाचे धडे गिरवले. जाहिरात क्षेत्रातील गौतम राजाध्यक्ष आणि विलास भेंडे हे त्यांचे गुरू. छायाचित्रणासाठी लागणाऱ्या प्रकाश योजनेपासून ते मेकअप किंवा कपड्यांच्या रंगसंगतीचा मेळ कसा साधावा याचे मूलभूत शिक्षण या दिग्गजांकडून त्यांनी आत्मसात केले. फिल्मचा वापर नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे हळूहळू कमी होत जाणार याचा अंदाज आल्याने त्यांनी इलेक्रॉनिक कॅमेरावर आपली पकड घट्ट केली आणि दूरदर्शनची नोकरी स्वीकारली. दूरदर्शन ८०च्या दशकात अत्यंत बाल्ल्यावस्थेत होते. एकतर कृष्णधवल माध्यम असल्याने आतासारखी रंगांची उधळण न करणारी फोटोग्राफी अत्यंत जिकिरीची आणि बुद्धिमत्तेचा कस लावणारी ठरत असे. चित्रपट, साहित्य, राजकारण, स्पोर्ट्स असे सर्व विषय हाताळायला मिळाल्याने अजित नाईक हे नाव दूरदर्शनवरील प्रत्येक निर्मात्यास जवळचे वाटे. अत्यंत मृदू स्वभाव व कोणत्याही जबाबदारीस सदैव तत्पर असणारा हा कॅमेरामन क्रिकेटच्या मॅचचेही चित्रीकरण करायला तयार असे. आता एक मॅच चित्रित करायची झाल्यास चाळीस कॅमेरांचा ताफा जणू स्टेडियम व्यापून टाकतो; परंतु तेव्हा इनमिन चार-पाच कॅमेऱ्याने लाईव्ह चित्रणाची किमया साधणे अत्यंत अवघड काम होते. नाईकांचा कॅमेरा सीमापार वेगाने जाणाऱ्या चेंडूला फॉलो करताना दर्शक स्टेडियममध्ये मॅच बघितल्याचा आनंद लुटत असत.
हा व्यापक अनुभव प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रामानंद सागर यांनी हेरला आणि नाईकांना रामायणाची ऑफर मिळाली. रामायण मालिका चित्रित करायची म्हटल्यावर दूरदर्शनची नोकरी सोडणे भाग होते. आयुष्यात रिस्क घेतल्याशिवाय असाध्य ते साध्य करताच येत नाही, या मतावर ते ठाम होते. आयुष्याची सात वर्षे सलगपणे या मालिकेसाठी दिल्यामुळे आणि सतत सोळा ते अठरा तास काम केल्याने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणेही कठीण झाले होते; परंतु “रामायण” ही जवळपास प्रत्येकाची पॅशन झाल्याने, मालिकेचा दर्जा संपूर्ण जगात वाखाणला गेला. अरुण गोविल, अरविंद त्रिवेदी हे नाईकांचे रामायणातील आवडते नट. दिग्दर्शकीय सूचनांव्यतिरिक्त कॅमेरामनच्याही सूचनांचे पालन ही नट मंडळी काटेकोरपणे करत. रामायणाचे पूर्ण शूटिंग उंबरगाव येथील स्टुडियोत झाल्याने जगाशी प्रत्येकाचा संपर्क तुटल्यागत होता; परंतु नाईकांचा मनमिळावू स्वभाव आणि जिद्द यामुळे सात वर्षांचा प्रदीर्घ कालावधी सुसह्य झाला होता. रामायणाचे ते दिवस मंतरलेले होते याचा उल्लेख त्यांच्याशी झालेल्या संभाषणात वाक्यागणिक स्पष्ट होत होता. रामायणानंतर अजित नाईकांनी अनेक चित्रपट, हमलोग, अपना उत्सव सारखा राष्ट्रीय लोककला इव्हेंट चित्रित करण्याचे श्रेय त्यांचेच होय. प्रहारसाठी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से संपादकीय विभागास सांगितले. स्मिता पाटील ही त्यांची दूरदर्शनवरील अत्यंत आवडती निवेदिका होती. पुढे न्यूज रिडर म्हणून काम करताना तिच्या जिद्दीचे आणि अभिनयातील पॅशनचे किस्से सांगताना “आज ती असायला हवी होती” ही खंतही त्यांनी बोलून दाखवली. के. वैकुंठ ते मनमोहनसिंह यांच्या समावेत सिनेमॅटोग्राफी करता करता जे ज्ञानभंडार त्यांच्या जवळ जमा झालेय, ते आता काळाची गरज म्हणून स्थापन झालेल्या विविध चित्रणाच्या अभ्यासक्रमांसाठी उपयोगात आणत असतात. आजही वयाची पंच्च्याहत्तरी ओलांडूनही तोच जोश, तीच पॅशन आणि छायाचित्रणावरील नितांत प्रेम अजूनही काही प्रोजेक्ट्समध्ये पाहायला मिळेल यात शंका नाही.
हम कथा सुनाते है राम
सकल गुण धाम की,
ये रामायण है, पुण्य कथा श्रीराम की…
या गाण्यातून रामायणाचे सार आपल्याला समजते. रामायणाचा प्रभाव भारतीय मनावर फार मोठा आहे. यामुळेच ९०च्या दशकात दूरदर्शनवर झळकलेल्या ‘रामायण’ मालिकेचे गारुड आजही लोकांच्या मनावर किती बसलेले आहे हे कोरोना काळात या मालिकेच्या पुनर्प्रसारणाने दाखवून दिले. प्रहार गजालीच्या कार्यक्रमात या मालिकेचे कॅमेरामन अजित नाईक यांच्याशी झालेल्या गप्पांमुळे या मालिकेसोबतच त्यांच्या एकूणच छायाचित्रणाचा प्रवास उलगडत गेला. अजित नाईक म्हणतात, रामानंद सागर यांनी ‘रामायण’ ही मालिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर आणली तेव्हा दूरदर्शनवर फार मालिका नव्हत्या. तेव्हा सर्व जाती-धर्माचे लोक श्रद्धापूर्वक ही मालिका पाहायचे. पण आता मालिकांचा आणि एवढ्या वाहिन्यांचा रतिब असताना कोरोना काळात सगळेच लोक घरी डअसल्यामुळे दूरदर्शनवरील सर्व प्रेक्षकांना भावणारी मालिका म्हणजे ‘रामायण’ ठरली. त्यावेळेस लोकांच्या मनावर रामायण मालिकेचा इतका प्रभाव पडला की, लोक सकाळ, संध्याकाळी टीव्हीची पूजा करून सहकुटुंब रामायण पाहायला बसायचे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम पार केले असेही म्हटले गेले. अजित नाईक यांनी सीएनएन, बीबीसी, एलएनटी, बिर्ला हाऊसिंग, रॉयटर्स यांच्यासाठी काम तर केलेच तसेच त्यांनी विक्रम वेताळ, आभाळमाया, डॉन नं. १ अशा अनेक मालिका, चित्रपटांचे त्यांनी चित्रीकरण केले.
त्यांचे वडील म्हणजेच पांडुरंग नाईक हे जुन्या काळातील छायाचित्रणात कल्पकता दाखविणारे, विविध प्रकारचे प्रयोग साकारणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांनी १९४२ साली बाबूराव पेंढारकर यांच्यासोबत ‘न्यू हंस’ या चित्रपट संस्थेची स्थापना केली. रामशास्त्री, लाखाराणी, दूर की आवाज हे त्यांनी चित्रित केलेले काही चित्रपट आहेत. अजित नाईक यांचा जन्म गोवा म्हार्दोळ या ठिकाणी झाला. वडील कॅमेरामन असल्यामुळे त्यांच्याकडून हा वारसा मला मिळाला असला तरी मी सर्व निरीक्षण करतच शिकत गेलो असे अजित नाईक यांनी सांगितले. ते म्हणतात, इंडस्ट्रीमध्ये काम करायचे असेल, तर त्या क्षेत्रात आधीपासूनच काम करण्याची जिद्द आणि त्यातील कसब असायला हवे. मीही या क्षेत्रात काम करताना अनेक गोष्टी शिकत गेलो. त्या गोष्टींचे अनुभव येत गेले. या क्षेत्रातील दिग्गजांशी ओळख झाली.
आजच्यासारखं तंत्रज्ञान तेव्हा विकसित झाले नव्हते. त्यामुळे पूर्वी मालिका किंवा सिनेमे बनवताना वेगवेगळ्या युक्त्या वापरून स्पेशल इफेक्ट केले जायचे. रामायणातील दोन्ही दिशांनी येणारे बाण हे आम्ही अक्षरश: दोन दोरांवरून सोडायचो, असे अजित नाईक यांनी सांगितले. एक सेट उभारताना एखादी चूक झाल्यास तो सेट पुन्हा पुन्हा तोडून उभारावा लागत असे. मालिका, चित्रपटाचे शूटिंग करताना बऱ्याच वेळा बाहेरचे दौरेसुद्धा असायचे. आता काळानुरूप इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे बदल होत आहेत. आता त्यांचा मुलगा सुद्धा याच क्षेत्रात आहे, म्हणजेच नाईक यांच्या तीन पिढ्यांची नाळ या क्षेत्राशी जोडलेली आहे. अजित नाईक यांच्या मेहनत आणि जिद्दीमुळेच आज त्यांच्याकडे अनुभवांचा खजिना जमा झाला आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवलं की, मनापासून प्रयत्न केल्यास त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…