Friday, October 11, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनपहिले मत राष्ट्रासाठी, भाजपासाठी आणि मोदींसाठी...

पहिले मत राष्ट्रासाठी, भाजपासाठी आणि मोदींसाठी…

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर

सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील एकूण मतदारांची संख्या ९० कोटी होती. सन २०२४ मध्ये या संख्येत १५ कोटी नवमतदारांची भर पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच देशातील १५ कोटी मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांची संख्या ८ कोटी होती. २०२४ च्या निवडणुकीत नवमतदारांची संख्या नेमकी किती असेल ते निवडणूक आयोगाने जाहीर केलेले नाही, पण ती १५ कोटींपेक्षा जास्त असावी असा अंदाज आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची एकूण संख्या १०० कोटींचा आकडा पार करील असा अंदाज आहे.

१५ कोटी नवमतदारांची संख्या ही लक्षणीय आहे. या मतदारांकडे कोणत्याच राजकीय पक्षाला दुर्लक्ष करून चालणार नाही. व्होट बँकेच्या नजरेतूनही प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या महत्त्वाची ठरू शकते. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने फर्स्ट टाइम व्होटरला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विशेष रणनिती अंगीकारली आहे. भाजपाने राज्याराज्यांतील युवा मोर्चा व महिला मोर्चा यांच्यावर नवमतदारांशी संपर्क करण्याची जबाबदारी सोपवली आहे. देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सध्या मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या तीन राज्यांत नवमतदारांशी संपर्क अभियान राबिवण्यात येत आहे. माय फर्स्ट व्होट फॉर नेशन, माय फर्स्ट व्होट फॉर भाजपा, माय फर्स्ट व्होट फॉर मोदी असे अभियान राबविले जात आहे. मेरा पहला व्होट राष्ट्र के लिए, मेरा पहला व्होट भाजपा के लिए, मेरा पहला व्होट मोदी के लिए अशी या मोहिमेची टॅगलाइन आहे.

राजस्थानात २०१८ मध्ये भाजपाचा पराभव झाला. तेव्हापासून गेली पाच वर्षे भाजपा विरोधी पक्षात आहे. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळविण्याचा भाजपाने चंग बांधला आहे. गेल्या महिन्यात चितौडगढ येथे भाजपाने नवमतदाता संगम या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ५० हजार नवमतदार सहभागी झाले असा पक्षाने दावा केला. राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पक्षाने यशस्वी करून दाखवला. या कार्यक्रमासाठी युवकांना विशेषत: नवमतदारांना निमंत्रित करण्याचे काम योजनाबद्ध आखण्यात आले होते. चित्तोडगढ व शेजारी असलेल्या अन्य जिल्ह्यांतील नवमतदारांशी संपर्क करण्याचे काम महिनाभर चालू होते. या कार्यक्रमात पक्षाचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली होती.

नवमतदार संपर्क मोहिमेची आखणी करणारे सी. पी. जोशी यांनी म्हटले आहे की, देशात जेव्हा परिवर्तन झाले, तेव्हा युवकांच्या शक्तीच्या माध्यमातूनच घडले आहे. लोकशाहीच्या महायज्ञात नवमतदार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. देशहित व विकासासाठी भाजपाने काय केले व उज्ज्वल भविष्यासाठी आपले पहिले मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच का दिले पाहिजे, हे नव मतदारांना संगम कार्यक्रमात आवर्जून सांगितले जाते. नवमतदार संगम कार्यक्रमात चित्तोडगढच्या इंदिरा गांधी स्टेडियमध्ये चंद्रायान ३ ची प्रतिकृती बनवली होती व तिचे लँडिंग सर्वांसमक्ष केले गेले. चंद्रायान विषयी तरुण वर्गाला मोठे आकर्षण आहे व मोठी उत्सुकताही आहे. चंद्रायानचे लँडिंग होत असताना युवावर्गात जोश होताच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने ही ध्येयपूर्ती केली आहे, याची जाणीवही युवकांना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रत्येक युवकाच्या मनात किती आदर आहे हेच यानिमित्ताने बघायला मिळाले. राजस्थानात नवमतदार संगम अभियानात रक्षाबंधनाचा कार्यक्रमही साजरा झाला. भाजपाच्या महिला मोर्चाने यात पुढाकार घेतला होता. नवमतदारांना भाजपाच्या महिला सदस्यांनी राखी बांधून अनेकांना भाजपाचे सदस्य करून घेतले. नवमतदारांना पक्षाचे सदस्य करून घेण्यासाठी राजस्थानात गेले दोन महिने विविध उपक्रम राबविले जात आहेत. सदस्यता अभियानात मिस्ड कॉल व वेबसाइट लिंक यांचा वापर केला जातो आहे. नवमतदाराचे नाव, वय, संपर्क नंबर, पत्ता, ई-मेल आदी माहिती नोंदवली जाते. नवमतदारांचे व्हॉट्सॲप ग्रुप करून त्यांना वेळोवेळी मेसेजेस करणे तसेच त्यांचे वॉट्सअॅप ग्रुप अन्य समूहांना जोडणे सहज शक्य होते व पक्षाची माहिती, सूचना, सदस्यांशी संपर्क साधणे सोपे जाते. अशा उपक्रमाचा पक्षाला निवडणुकीत लाभ होत असतो. असेच कार्यक्रम व उपक्रम भाजपाच्या वतीने मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्ये राबिवले जात आहेत.

मध्य प्रदेशात भाजपा सत्तेत आहे. दीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराज सिंह चौहान यांना अँटी इनकम्बन्सीचा फटका बसू शकतो, अशी एक भीती आहेच. म्हणूनच या राज्यात नवमतदारांना पक्षाशी जोडण्यावर भाजपाने भर दिला आहे. मध्य प्रदेशातही नव मतदारांना आकर्षित करण्याचे काम युवा मोर्चा व महिला मोर्चा यांच्यावर सोपविण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनी म्हटले आहे की, युवा मार्चाने प्रत्येक स्तरावर एक समिती तयार केली आहे. राज्यात एकूण २३ हजार पंचायती आहेत. शहरातील वॉर्डची संख्या हजारोंच्या घरात आहे. युवा मोर्चाने स्थानिक समिती स्थापन केली असून प्रत्येक समितीत ११ सदस्य आहेत. हे सर्व जण युवा मतदारांशी संपर्क साधत आहेत. नवमतदारांचे पहिले मत देशासाठी, भाजपासाठी व नरेंद्र मोदींसाठी असले पाहिजे, असे त्यांच्या मनावर बिंबवले जात आहे.

मध्य प्रदेश के मन में मोदी, या नावाने भाजपाच्या वतीने आणखी एक अभियान राबवले जात आहे. पक्षाच्या ज्येष्ठ व लोकप्रिय नेत्यांबरोबर युवा मतदारांची भेट घडवून दिली जाते. राज्यातील १०३४ मंडलमध्ये हे अभियान चालवले जात आहे. युवा मोर्चाच्या वतीने ज्यांनी आपल्या क्षेत्रात चांगले काम केले आहे, अशा १०० नवमतदारांचा प्रत्येक मंडलमध्ये सन्मान केला जातो आहे. शिक्षणात व खेळात ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे, अशा युवकांचा सत्कार केला जातो. पक्षाच्या व्यासपीठावर युवकांची जेवढी सक्रियता वाढेल, तेवढे जास्त मतदार युवा कार्यकर्ते मतदानाला आणू शकतील, असा युवा मोर्चाला विश्वास वाटतो. युवा मोर्चाने युवा चौपाल व हराभरा मध्य प्रदेश असे अभियान चालवून नवमतदारांची व्होट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांसाठी छत्तीसगढ राज्यातही युवा मोर्चाने गेल्या काही महिन्यांपासून नवमतदार संपर्क अभियान अशी मोहीम चालवली आहे. छत्तीसगढ प्रदेश भाजपाचे अध्यक्ष अरुण कुमार साव यांनी म्हटले आहे की, नवमतदारांच्या आशा-आकांक्षा समजून घेण्यासाठी व त्यांचे पहिले मतदान हे प्रथम राष्ट्रासाठी, प्रथम भाजपासाठी व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कसे आवश्यक आहे, हे समजावून देण्यासाठी युवा मोर्चाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी नवमतदारांबरोबर युवा मोर्चा व महिला मोर्चा विविध स्तरावर संवाद करीत आहेत. मध्य प्रदेशात तर त्यांचा सन्मान करणे, त्यांना सदस्य करून घेणे, असेही उपक्रम राबविले जात आहेत. नवमतदारांशी संवाद ही मोहीम भाजपाला केवळ विधानसभा निवडणुकींसाठी नव्हे तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीही उपयुक्त ठरणार आहे. देशातून सर्वाधिक ८० खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये ‘माय फर्स्ट व्होट फॉर मोदी’ हे अभियान जून महिन्यापासूनच सुरू झाले आहे. युवा मोर्चाच्या वतीने गावपातळीवर नव मतदारांची नोंदणी शिबिरे भरविली जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान ५० कार्यकर्त्यांची टीम याच कामासाठी उभी करण्यात आली आहे. कॉलेजेस, कोचिंग क्लासेस, खेळांची मैदाने, आदी ठिकाणी ही टीम स्वत:हून नवमतदारांशी संपर्क साधते व मोदी सरकारने देशासाठी कोणते कल्याणकारी कार्यक्रम व योजना राबवल्या याची माहिती देते. नवमतदारांची संख्या मोठी आहे, हीच व्होट बँक भाजपाला निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळवून देईल, अशी योजनाबद्ध आखणी पक्षाने केली आहे.

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -