Aai Ekvira : आदिशक्ती – एकवीरा देवी

Share
  • कोकणी बाणा : सतीश पाटणकर

आई एकविरेच्या यात्रा काळात महाराष्ट्रातील अनेक या भागांतून लाखो कोळी बांधवांसह अन्य भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. आई एकवीरा कोळी बांधवांचे एक महत्त्वाचे दैवत आहे. देवी आपल्या भक्तांना विविध रूपांत दर्शन देत आज वर्षांनुवर्षे उभी आहे. अनेक लोककथा, लोकगीते यातून ती वारंवार प्रकट होत असते. प्रत्यक्ष आई असेच तिला संबोधन असल्यामुळे सामान्य जनतेला ती अत्यंत जवळची वाटणारी देवता आहे.

देवींच्या जागृत स्थानास शक्तिपीठे म्हटले जाते. महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी होय. पुराणांमध्ये देवीच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत. या कथांवरून साकारलेली शिल्पकला विविध मंदिरांवर बघायला मिळते.

वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकी नावलौकिक मिळविलेल्या परशुराम या वीरपुत्राची जननी म्हणून आदिशक्ती एकवीरा देवी ओळखली जाते. एकवीरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्याची धारणा आहे. जमदग्नी ऋषींची पत्नी असलेल्या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीर पुत्र असल्याने या देवीस ‘एक वीरा’ असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकवीरा म्हणून रूढ झाले.

इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणीकलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील कार्ला लेणी. या लेण्यांमध्ये ऐश्वर्य आहे. मात्र त्यात डामडौल नसून अभिजात कला आहे. पर्यटन व वर्षाविहारासाठी नावलौकिक असलेल्या लोणावळ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर कार्ला गडावर एकवीरा देवीचे स्थान आहे. पुणे-मुंबई या महानगरांच्या मध्यभागी वसलेली कार्ला लेणी आणि एकवीरा मातेचे मंदिर म्हणजे विपुल निसर्गसंपदा, प्राचीन लेणी, गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे आहे. १८६६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते.

या परिसरात देवीला वेहरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असे म्हटले जाते. एकवीरा देवी ही महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, ब्राह्मण, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची कुलस्वामिनी आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत एकवीरा मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक रांगा लावून दर्शन घेतात. यात्रा काळात महाराष्ट्रातून, विशेषतः कोकण, मुंबई, ठाणे या भागांतून लाखो कोळी बांधवांसह अन्य भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.

एकवीरा देवीचे मंदिरही खूपच जुने आहे व रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या कोळी मंडळींचे हे एक महत्त्वाचे दैवत आहे. देवी आपल्या भक्तांना विविध रूपांत दर्शन देत आज वर्षांनुवर्षे उभी आहे. देवी अज्ञानाचा अंधकार दूर करून भक्तांच्या आयुष्यात उजेड आणणारी देवता आहे. देवी या संकल्पनेची व्याप्ती खूप मोठी आहे. अनेक लोककथा, लोकगीते यातून ती वारंवार प्रकट होत असते. सर्वसामान्य जनतेला ती अत्यंत जवळची वाटणारी देवता आहे.

चैत्र महिन्यात भरणारी यात्रा मोठी असते. चैत्र शुद्ध षष्ठीस प्रारंभ झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत असते. एकविरा देवीच्या यात्रेचा समारंभ तीन दिवस साजरा करण्यात येतो. श्री एकविरा आईचा भाऊ भैरवनाथ निवास करत असलेल्या म्हणजेच एकविरा आईचं माहेर समजल्या जाणाऱ्या ‘देवघर’ (माहेरघर) या गावात भाविक मोठ्या संख्येने भैरवनाथाच्या पालखीसाठी सज्ज होतात.

कोळी महिलांच्या पारंपरिक गाण्याने मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. अभिषेक पूर्ण झाल्यावर आईला सजवले जाते. नंतर आईची घंटा, टाळ, मृदंग, ढोलकी व चौघड्यांच्या जल्लोषात आईची आरती केली जाते. त्यानंतर आलेले भाविक आईचं दर्शन घेतात. अष्टमीचा दिवस मानाचा बलिदानाचा दिवस होय. या दिवशी भक्त नवस पूर्ण करण्यासाठी येथे जमतात. नवसात ठरल्याप्रमाणे कोंबडा, बोकड किंवा मेंढा यांपैकी बळी दिला जातो. देवीला प्रसाद म्हणून तिरापणी देवीसमोर ठेवली जाते. (तिरापणी) कोंबडा, बकरा किंवा मेंढ्याची काळजी भाजून विड्यावर ठेवून देवीला प्रसाद दाखवला जातो. त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लहान मुलांचे जावळ (केस काढणे) केले जातात. मूल होण्यासाठी भाविक नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्याकारणाने लहान मुलांचे जायवळ इथे केले जाते. लहान मुलाला वाजत-गाजत आईच्या दर्शनाला आणतात. त्याच्या गळ्यात हार व कपाळावर आईचे कुंकू लावतात. मंदिराच्या शेजारी बायांचे स्थान आहे तेथे त्या मुलाला दर्शन देतात. नंतर मंदिराच्या बाहेर त्याचे केस काढतात व काढलेले केस गडाच्या मागच्या बाजूस विहिरीत विसर्जन करतात, अशा पद्धतीने आई एकविरेची चैत्र यात्रा सोहळा संपन्न होतो.

चैत्रातील यात्रेनंतर आठ दिवसांनी पौर्णिमेच्या दिवशी कार्ल्यास भरणाऱ्या यात्रेस ‘काठीची यात्रा’ म्हणतात. देवीचे माहेरघर असलेल्या देवघर या गावातून देवीची काठी वाजत-गाजत कार्ला गडावर आणली जाते. या यात्रेला स्थानिक आणि परिसरातील गावांतील भक्त आवर्जून उपस्थित राहतात. आईच्या मंदिरासमोर काठी उभी करून सर्व भाविक आई एकविरेचे दर्शन घेतात.

श्री एकविरा आई मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्री उत्सव चालतो. पृथ्वीची प्रतीकात्मक पूजा म्हणून घटस्थापना केली जाते. नऊ प्रकारची धान्य पेरून उगवली जातात. सृष्टीच्या सृजनशक्तीची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवातील प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व आहे. ट्रस्टच्या माध्यमातून नऊ दिवस मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. दुर्गा स्तोत्र पठण, भजन, जागरण, कीर्तन, प्रवचन, शिबीर, आईचा अभिषेक व इतर या दरम्यान यात्रेच्या निमित्ताने अनेक राजकीय नेते, सामाजिक नेते, कलाकार आईच्या दर्शनासाठी न चुकता कार्ला गडावर येतात. मंदिरात नऊ दिवस चौघडा झडतो, नगारा वाजविला जातो. घंटा नादाच्या तालावर पंचारती होते. नवमीच्या मध्यरात्री होम हवन होते. या होमाला ‘नवचंडी होम’ म्हणतात. या होमाला विशेष महत्त्व आहे. होमाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक गडावर येतात. आईचं दर्शन घेऊन, नंतर रांगेत उभे राहून होमाचे दर्शन घेऊन होमातील राख कपाळी लावून होमात नारळ, कोल्हा (भोपळा), लाकूड, कारवी, फळं, अगरबत्ती, कापूर, लिंबू अर्पण करतात. होम सुरू असतानाच पहाटे शेवटी बोकडं बळी दिला जातो. त्याच्या (काळजीची) तिरापणी करून सर्व भक्तांना त्याचा प्रसाद वाटला जातो.

दशमीच्या शुभमुहूर्तावर दसरा सण भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. मंदिरात झेंडू व आंब्याच्या पानांची तोरणं बनवून पूर्ण मंदिराभोवती लावतात. देवीच्या चरणी आपट्याची पाने, झेंडूंची फुले वाहून सर्व भक्तगण सोने लुटतात. दसऱ्याच्या निमित्ताने भक्त दानधर्म करतात.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

रेणुका माता छात्रावास, चिपळूण

सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…

2 hours ago

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…

5 hours ago

रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…

6 hours ago

देशात ११३ वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यास मान्यता

महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…

6 hours ago

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

7 hours ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

7 hours ago