वेडीवाकडी वळणे घेऊन तयार झालेल्या कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुद्दा हा येनकेन कारणाने चर्चेत येत असतो. चिपळूण येथील बहादूरशेख इथल्या गर्डरला तडा गेलेला पूल लाँचरच्या यंत्रणेसह सोमवारी दुपारी कोसळला आणि पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाची नव्याने चर्चा सुरू झाली. मुंबई ते नागपूरला जोडणारा समुद्धी मार्ग वाहतुकीला मोकळा झाला तेव्हाही असा प्रश्न विचारला जात होता. आता चर्चा झाली ती गर्डर कोसळलेल्या घटनेची. मात्र यावेळी कोकणवासीयांकडून मोठा संताप व्यक्त करताना दिसला. एक तर कामाला उशीर, त्यात गर्डर कोसळल्याच्या घटनेमुळे कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे, हे नव्याने सांगायला नको. त्यात तांत्रिक चुका, शहराच्या बाहेरून जाणारे ओव्हरब्रीज आणि नदीवरील पुलाचे काम आजही संथपणे सुरू असल्याचे दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गातील नदीवरील पुलांचा विचार केला तर जगबुडी आणि वशिष्ठ नदीवरील पुलांची काय अवस्था झाली आहे हे पाहण्याची गरज आहे. तसेच महामार्गावरील खड्ड्यांची वारंवार चर्चा केली जाते. या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करताना दिसतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे देखील पाहायला मिळते. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की, मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा ठसठशीतपणे समोर येतो. मग आंदोलने सुरू होतात, पाहणी दौरे होतात. गणपती बाप्पा गावाला जातात आणि महामार्गाचे काम मात्र ‘जैसे थे’च राहते. दीड दशक उलटले पण यात तसूभरही फरक पडलेला नाही. त्यात आता मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख इथल्या गर्डरला तडा गेलेला पूल कोसळला. पूल सोमवारी दुपारी कोसळल्याने मोठी धावपळ झाली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी पूल कोसळल्याने मोठा आवाज झाल्याने नागरिक हादरले. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहनांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणीच गर्डर कोसळल्याने उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणाची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी पहाटे चार वाजता पाहणी केली. यावेळी मंत्री चव्हाण यांनी त्रिसदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देतील, असे स्पष्ट केले. या प्रकरणी कोणीही दोषी आढळले, तरी कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे. या पुलाच्या डिझाईनमध्ये काही चूक झाली होती का?, आता काम करत असताना त्याच्या बांधणीत काही चूक झाली होती, हे आता सांगणे फार कठीण आहे. पण हे कशामुळे झाले आहे याचा तपास करणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तज्ज्ञांमार्फत याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे त्यातून खरे कारण पुढे येईलच. मात्र यानंतरच्या काळात यामध्ये असे होऊ नये, म्हणून नक्की काय करावे लागेल, या सर्व गोष्टींसाठी पुलांच्या कामातील तज्ज्ञ त्रिसदस्यीय समिती ही दुर्घटना कशामुळे झाली याची तपासणी करणार आहेत. काम करत असताना अधिक काळजी घेतली जाईल. दरम्यान तपासात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
बहादूरशेख नाक्याजवळ मुंबई-गोवा महामार्ग आणि चिपळूण-कराड मार्ग असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी चौपदरीकरणात एकूण ४५ पिलरचा मोठा ब्रिज आहे. त्यासाठी सुमारे २३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नऊ वर्षांपासून या पुलाचे काम सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र संथगतीने सुरू असलेल्या पुलाचे काम सुरू आहे. या पीलरवर बसवलेल्या गर्डरला मध्येच तडे गेल्याने कामाचा दर्जा पुन्हा एकदा पुढे आला आहे. गणपतीनंतर येथे या पीलरवर गर्डर उभारला गेला होता. अवघ्या दोन आठवड्यांतच त्याला तडे गेले आणि तो कोसळला. यामुळे ठेकेदारांच्या कामाचे पुन्हा एकदा मूल्यमापन करण्याची कोकणवासीयांनी मागणी होत आहे.