नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(jo biden) आज इस्त्रायलचे(israel) समर्थन करण्यासाठी तेथे पोहोचणार होते. याशिवाय जॉर्डनच्या अम्मानमध्ये अरब नेत्यांशी ते बातचीत करणार आहे. मात्र ही शिखर परिषद रुग्णालयावरील हवाई हल्ल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. गाझामधील रुग्णालयावर झालेल्या हवाई हल्ल्यात ५००हून अधिक जण मृत्यूमुखी पडले. या घटनेसाठी हमास आणि इस्त्रायल एकमेकांना दोषी ठरवत आहेत.
गाझाच्या रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यानंतर जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान सफादी यांनी घोषणा केली की अम्मानमध्ये जॉर्डनचे राजा अब्दुल्ला, इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी आणि पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यासोबत बायडेन यांची होणार शिखर परिषद रद्द करण्यात आली आहे.
व्हाईट हाऊसकडूनही जॉर्डनमध्ये बायडेन यांच्यासह होणाऱ्या या शिखर परिषदेला रद्द केल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. व्हाईट हाऊसच्या विधानानुसार सांगितले की जॉर्डन, इजिप्त आणि पॅलेस्टाईनच्या नेत्यांसोबत अम्मानमध्ये एक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती मात्र आता जॉर्डनने घोषणा केली आहे की गाझाच्या रुग्णालयात झालेल्या बॉम्बहल्ल्यानंतर ही बैठक रद्द करण्यात आली आहे. या बॉम्ब हल्ल्यात शेकडो लोकांचे प्राण गेले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला शोक
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विटरवर म्हटले की, मी गाझाच्या अल अहली अरब रुग्णालयात झालेला स्फोट आणि त्यात झालेल्या जिवितहानीमुळे खूप दु:खी आहे. ही घटना ऐकल्यानंतर मी जॉर्डनचे राजा अब्दुल्ला आणि इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी बातचीत केली. तसेच नेमके काय घडले होते याची माहिती मिळवण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी टीमला आदेश दिले आहेत.
I am outraged and deeply saddened by the explosion at the Al Ahli Arab hospital in Gaza, and the terrible loss of life that resulted. Immediately upon hearing this news, I spoke with King Abdullah II of Jordan, and Prime Minister Netanyahu of Israel and have directed my national…
— President Biden (@POTUS) October 17, 2023
हमास आणि इस्त्रायलचा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
अरब देशांनी या रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यासाठी इस्त्रायलला दोषी ठरवले आहे तर इस्त्रायलच्या लष्कराने हे आरोप फेटाळून लावले आहेत. इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी या स्फोटासाठी पॅलेस्टाईम इस्लामिक जिहादच्या रॉकेटला जबाबदार ठरवले आहे.