Friday, October 11, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखदुष्टशक्तींचे संहारक होऊ या!

दुष्टशक्तींचे संहारक होऊ या!

नवरात्रोत्सव विशेष: उर्मिला राजोपाध्ये

असुरांचा संहार करण्यासाठी सज्ज झालेल्या महाकालीचं सामर्थ्य वाढवण्यासाठी सर्व देवतांनी आपापल्या तेजाचे अंश तिला अर्पण केले, असा उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहे. असे असताना नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने समाजाच्या सर्व घटकांनी आपापली शक्ती-बुद्धी वाईट गोष्टींचे निर्दालन करण्यासाठी सुजाण नेतृत्वाला अर्पण करणे अपेक्षित आहे. बेफिकीरपणे किंवा चिंताक्रांत होऊन अनर्थ बघत राहणे मुळीच क्षम्य नाही. सणांच्या रेलचेलीतील एक महत्त्वपूर्ण काळ म्हणजे नवरात्र… स्त्रीमधील सर्जनशीलतेला वंदन करत, समाजातील तिच्या स्थानाचा यथोचित सन्मान करत या शक्तीची आराधना करण्याचा काळ विविध व्रतवैकल्ये, उपचार, मंत्रपठन, होम-हवन आदी मार्गांनी संपन्न होतो. बदलत्या काळात साजरीकरणाच्या पद्धतींमध्ये बरेच बदलही बघायला मिळत आहेत. या निमित्ताने खेळला जाणारा गरबा, भोंडला वा हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजशक्ती एकत्र आणण्याच्या, गरजू स्त्रियांना मदत करण्याच्या, स्त्री शक्तीला चालना देण्यासाठी नवनवीन उपक्रम आखण्याच्या प्रयत्नांना समाजाची चांगली साथ मिळत आहे. एकूणच हा नवरात्रोत्सव श्रद्धा, भक्तीप्रमाणेच सामाजिक भाव जागृत करण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत पृथ्वीवर आदिमायेचे अधिष्ठान असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या आणि विजयादशमीला संपन्न होणाऱ्या शारदीय नवरात्राचे नऊ दिवस श्रद्धापूर्वक पार पडतात. या नऊ दिवसांत नवरसांची, नवरंगांची, नवउत्साहाची उधळण बघायला मिळते. जवळपास तीन हजार वर्षांपूर्वीची परंपरा असणारा हा सण स्त्री शक्तीचे प्रतीक आहे, हे आपण जाणतो. आदिमायेने आसुरांचा नाश करण्यासाठी कालीचे रौद्ररूप धारण केले आणि उन्मादी महिषासुराचा पाडाव केला. हे घनघोर युद्ध सलग नऊ दिवस, नऊ रात्र सुरू होते. म्हणूनच या घटनेच्या स्मरणार्थ नऊ रात्रींचा जागर दिला जातो. नवरात्र साजरे केले जाते.

कोणाच्या दृष्टीने नवरात्र म्हणजे घटस्थापना असते. हा कर्मकांडाचा, कूळधर्माचा विषय असतो. तबकामध्ये देवीचे टाक ठेवून त्याभोवती मातीचे रिंगण करणे, कुंभातील पाण्याने जलसिंचन करून मातीत पेरलेले बी उगवणे, फुलोरा बांधणे, सप्तशतीचे पाठ करणे, घरामध्ये जागरणादी कार्यक्रम घडवून आणणे, कुंकूमार्चन करणे, अंगणामध्ये हादग्याचे खेळ रंगणे आदी पद्धतींनी देवीची आराधरा केली जाते. श्रद्धाळू या भक्तीमार्गाने देवीला प्रसन्न करून घेऊ इच्छितात. प्रौढांसाठी नवरात्रीचे हे महत्त्व असताना तरुणाई मात्र या दिवसांमध्ये रंगणाऱ्या गरब्याकडे आकर्षित होताना दिसते. त्यांच्या दृष्टीने हा उत्सव श्रद्धेबरोबर उत्साह वृद्धिंगत करणारा ठरतो. काही सामाजिक संस्था नवरात्रीचे औचित्य साधत समाजातील दुर्लक्षित स्त्री शक्तीच्या उद्धाराचं उपक्रम हाती घेताना दिसतात. नवदुर्गांचा सन्मान होताना दिसतो. स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने या नऊ दिवसांचा यथोचित उपयोग करून घेतला जातो. म्हणजेच आधी उल्लेख केल्याप्रमाणे काळ बदलतोय तसे या सणाचे संदर्भ बदलताहेत. साजरीकरणामध्ये वैविध्य दिसून येत आहे. पण मूळ प्रेरणा हरवलेली नाही.

नवरात्रीमध्ये देवीची नऊ रूपं पुजली जातात. शैलीपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुश्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धयत्री या नऊ रूपांमध्ये दडलेल्या स्त्री शक्तीचं या निमित्ताने पूजन होतं. संपूर्ण भारतामध्ये ५१ शक्तिपीठं आहेत. महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहुरगडची रेणुका ही तीन पूर्ण पीठे आणि वणीची सप्तश्रृंगीदेवी हे अर्ध पीठ आहे. आदिमायेच्या या एकत्रित शक्तीने संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. नवरात्रात ब्रह्मांडातील सर्व शक्ती जागृत होतात. याच शक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून दैत्यांचा संहार केला. वाढत्या सामर्थ्याबरोबर येणारा अहंकार आणि वाढत्या अहंकारातून येणारा उन्मत्तपणा हे आसुरी वृत्तीचे मूळ आहे. रावण काय, दुर्योधन काय आणि शुंभ-निशुंभ काय, वृत्तीच्या दृष्टीने पाहिले तर सर्वांची जातकुळी एकच! मग दशग्रंथी, परमशिवभक्त, संगीतप्रेमी, तपस्वी रावण परदारा पहरणाला सज्ज होतो.

एकछत्री साम्राज्य लाभलेला दुर्योधन सख्ख्या चुलत भावांना पाच गावांची जहागिरीही नाकारतो, श्रीकृष्णासारख्या विश्वसख्याचा शांतिप्रस्ताव धुडकावून लावतो. वेळोवेळी उफाळून येणाऱ्या अशा असुरी वृत्तींचे दमन करण्यासाठी दैवी शक्ती पुढे सरसावणे ही मानवी इतिहासातली एक अपरिहार्य प्रक्रिया आहे. अशा घटनांची स्मृती नरकचतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा आणि नवरात्र यासारख्या उत्सवांनी जतन करून ठेवल्याचे आपण पाहतो. गतकालीन घटनांची आठवण म्हणून काही सण-व्रते-उत्सव समाजात रुढ होतात, तेव्हा त्यातील खरे मर्म पुष्कळदा डोळ्याआड होते आणि उत्सवी रूप किंवा कर्मकांड टिकून राहते. ‘नवरात्र’ उत्सवाचेही तसेच झाले आहे.

धार्मिकदृष्ट्या कुळाचार म्हणून घरोघरी आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. मातीच्या ढिगावर गहू पेरून त्यावर मातीचा घट आणि त्यावर ताम्हणात देवीची प्रतिमा स्थापन करायची, नऊ दिवस रोज सर्व उपचारांनी पूजा करायची, वरच्या बाजूला रोज नवी पुष्पमाला बांधायची, आरती करायची हा पूजेचा भाग झाला. याशिवाय कुमारीपूजन, सुवासिनी भोजन असे लौकिक उपक्रम, उपवास, अखंडदीप यासारखे नेमधर्म आणि सप्तशती पाठासारखे उपक्रम अशा स्वरूपात सामान्यत: घरोघरचे नवरात्र पार पडते. देवीच्या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सव मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. अनेक मंडळेही नवरात्रोत्सव साजरा करतात. त्यासाठी मंडपात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. रोज देवीची विधिवत पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम, जागर याद्वारे हा उत्सव साजरा केला जातो. सामाजिकदृष्ट्या नवरात्राचे स्वरूप उत्सवाचे आहे. विविध प्रांतात तिथल्या पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा होतो.

या उत्सवाचा कालावधी सामान्यत: सगळीकडे सारखाच म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचा असतो. काही भागात त्याची सुरुवात लवकर म्हणजे भाद्रपद वद्य नवमीपासूनही होते. बंगालमध्ये दुर्गापूजेला फार महत्त्व आहे. नेपाळ, आसाममध्ये आणि एकंदरीत उत्तर भारतामध्ये नवरात्रोत्सव हा दुर्गोत्सव म्हणूनच उत्साहाने साजरा होतो. यात क्वचित पशुबली देण्याचा प्रकारही आढळतो. सुदैवाने अशा अमानुष प्रथा आता लोप पावत चालल्या आहेत. आपल्याकडे पशुवधाऐवजी कोहळा कापण्याची प्रथा सुरू करणे समाजधुरिणांच्या डोळस चातुर्याची साक्ष देणारी आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गोत्सवानेही आता अनेक ठिकाणी सार्वजनिक रूप धारण केले आहे. त्यानिमित्त काही कार्यक्रम योजले जातात. पण सर्व उत्सवांचे ‘जल्लोषा’कडे झुकणे ही थोडी चिंतेची बाब आहे, हे नाकारता येणार नाही. स्थानिक नेतृत्व सुजाण आणि सुबुद्ध होण्यावर किती तरी चांगल्या गोष्टी अवलंबून असतात आणि विधायक नेतृत्व नेहमी कठीण गोष्ट असते.

कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी माणसांनी एकत्र येणे ही प्राथमिक गरज आहे. माणसे जमण्यासाठी काही तरी आकर्षण असावे लागते. पण ते गुणात्मक असावे. कुठेही काही कार्यक्रम असला की त्याच्या मागे-पुढे तासनतास कर्कश्श ध्वनिमुद्रिका लावून ठेवणे ही काही गुणात्मकता नव्हे. माणसांच्या अभिरुचीला वळण लावणे हे खरे तर अशा उपक्रमांचे कार्य असते. त्याऐवजी त्यातून अशांतता, ध्वनिप्रदूषण यांचीच निर्मिती होऊ लागली, तर कठीण परिस्थिती निर्माण होईल. म्हणून सद्भावना जोपासणारे, विचाराला चालना देणारे, अभ्यास करायला लावणारे, परिश्रमावर आधारलेली स्पर्धा असलेले उपक्रम या उत्सवात योजले जायला हवेत. जबर वर्गण्या वसूल करून अमाप उधळपट्टी करणे, हा अशा उत्सवांचा स्थायीभाव होऊ पाहतो आहे. हे बरे नव्हे! त्या ऐवजी अशा उत्सवांच्या निमित्ताने सामूहिक पठण-वाचन, पाठांतर चातुर्य, चापल्य, कलाविष्कार यावर आधारित स्पर्धा असे अनेक उपक्रम योजता येण्यासारखे आहेत.

युगमान बदलते तसे युद्धाचे स्वरुपही बदलते. पण ‘परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्’ हा परमेश्वरी अवतारकार्याचा गाभा कायम राहतो. सत् विरुद्ध ‘दुष्कृत’ लोक शत्रुराष्ट्राच्या रूपाने सीमेवर उभे असतील, अतिरेकी दहशतवाद्यांच्या रूपाने घुसखोरी आणि अत्याचार करत असतील, टोळीयुद्धात सामाजिक जीवनात अशांतता माजवत असतील, तर त्यांच्या पातळीवर त्यांचे पारिपत्य करण्यासाठी सत्प्रवृत्ती समर्थ आणि संघटित होण्याची गरज आहे. राष्ट्र म्हणून शत्रूंशी आणि समाज म्हणून समाजकंटकांशी लढत देणे अपरिहार्य आहे. ‘चांगले’ काय या विषयीच्या कल्पना बालपणापासून मनावर ठसायला हव्यात. वाईटाविषयीची चीड मनात रुजायला हवी. देवादिकांच्या, वीरपुरुषांच्या पराक्रमगाथा त्यासाठीच आहेत. आसुरांचा संहार करण्यासाठी सज्ज झालेल्या महाकालीचे सामर्थ्य वाढवण्यासाठी सर्व देवतांनी आपापल्या तेजाचे अंश तिला अर्पण केले, असा उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहे. समाजाच्या सर्व घटकांनी आपापली शक्ती-बुद्धी वाईट गोष्टींचे निर्दालन करण्यासाठी सुजाण नेतृत्वाला अर्पण करणे अपेक्षित आहे. बेफिकिरीने किंवा चिंताक्रांत होऊन सुरू असलेेला अनर्थ पाहात बसणे मुळीच क्षम्य नाही. शांती, अहिंसेचे आणि विश्वबंधुत्वाचे ब्रीद मिरवत असतानासुद्धा दुष्टांनी लादलेले युद्ध अपरिहार्यपणे देशाच्या किंवा तुमच्या-आमच्या दाराशी ठाकलेलेच आहे. अशा परिस्थितीत शुंभ-निशुंभांना आणि महिषासुरांना संपवायची ऊर्जा या नवरात्रोत्सवातून मिळावी, हीच अपेक्षा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -