
काय आहे या दिवसाचे महत्त्व? पाहा याचा खास व्हिडीओ...
मुंबई : जागतिक सफेद छडी दिन (World white cane day) दरवर्षी १५ ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. हा दिवस दृष्टीबाधित आणि मंद दृष्टी व्यक्तींचे स्वातंत्र्य आणि संधी तसेच त्यांच्या सामाजिक हक्कांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. सफेद काठी ही फक्त मंद दृष्टी आणि केवळ एक साधन नसून ती आपणास सर्वांसाठी अशी एक निशाणी आहे. जी आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नांची जाणीव करून देते. म्हणून या दिवसाला 'जागतिक सफेद छडी दिन' असे संबोधले आहे.
दादरच्या कमला मेहता अंधशाळेने आज विद्यार्थ्यांसमवेत हा दिवस साजरा केला. दृष्टीहीन व्यक्तीच्या मानवी अधिकारांचे रक्षण झालेच पाहिजे, असा संदेश आजच्या त्यांच्या कार्यक्रमात देण्यात आला. सकाळी ९:३० वाजता परेल येथील भारत माता टॉकीज समोरील चौकातून या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीमध्ये 'सहानुभूती नको सहकार्य हवे', असे बॅनर्स हातात घेऊन ही मुले उभी होती. सहकार्याच्या माध्यमातून ही मुले आपल्या पुढील आयुष्यात आत्मविश्वासाने आणि निर्धाराने चालू शकतात आसा मोलाचा संदेश यातून देण्यात आला. या रॅलीमधील काही खास क्षण प्रहारच्या वाचकांसाठी टिपले आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी...