देशातील सर्वात जुना पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या काँग्रेस पक्षाची दिवसेंदिवस वाताहत होत चाललेली दिसत आहे. एवढ्या जुन्या पक्षाची नाव आता डुबत चालली असून तिला कोणी माईचा लाल वाचवू शकेल असे सध्या तरी दिसत नाही. या पक्षाची केंद्रीय पातळीवर आणि इतर अनेक राज्यांमधील स्थिती अत्यंत केविलवाणी असून हा पक्ष पार रसातळाला गेला आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात या पक्षाची थोडी धुगधुगी बाकी होती. या राज्यातून पक्षाला थोडाबहुत पाठिंबा मिळू शकेल, असा कयास केला जात होता. पण राज्यात उरल्या-सुरल्या काँग्रेसमध्ये काही जान उरली आहे, असे दिसत नाही. इतकेच नव्हे तर या पक्षातील नेत्यांची तोंडे दाही दिशांना वळलेली आहेत आणि त्या नेत्यांप्रमाणे कार्यकर्तेही पूर्णत: विभागलेले आहेत. असा हा पक्ष आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाकाय अशा भाजप समोर कितपत टिकाव धरू शकेल हा संशोधनाचाच प्रश्न आहे.
आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भाजपने आपल्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊन पुढे मार्गक्रमण सुरू केले आहे, तर काँग्रेससह उरल्या-सुरल्या विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना करून भाजपशी दोन हात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेष म्हणजे या ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचा सर्वमान्य असा नेताच नसल्याने येथे सर्वजण स्वयंभू नेते आहेत. त्यामुळे ते कोणा एकाचे नेतृत्व मान्य करतील, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. अशा सर्व परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून राज्यातील काँग्रेसकडून पूर्व विदर्भातील जिल्हानिहाय आढावा बैठक नुकतीच नागपूरच्या महाकाळकर सभागृहात ठेवण्यात आली होती. मात्र या बैठकीत पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा जोरदार उफाळून आला. नरेंद्र जिचकार आणि विकास ठाकरे या दोन नेत्यांमध्ये जोरदार वादावादी आणि राडा झाला. या बैठकीतच, आपला घातपात करण्याचा डाव होता, असा धक्कादायक आरोप जिचकार यांनी केला, तर विकास ठाकरे यांनी जिचकार हे मानसिक रुग्ण असून कुटुंबाने किंवा पक्षाने त्यांची वैद्यकीय चाचणी करावी असे प्रत्युत्तर ठाकरे यांनी दिले आहे.
काँग्रेसच्या बैठकीत ज्या दोन नेत्यांमध्ये वाद होऊन प्रचंड गोंधळ झाला, त्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या नरेंद्र जिचकार यांनी आमदार आणि शहराध्यक्ष ठाकरेंवर गंभीर आरोप करत विकास ठाकरे यांनी आधीच पक्षाच्या बैठकीत गुंड बोलावले होते. त्यांच्याकडे हत्यार होते आणि याच बैठकीत माझा घात करण्याचा कट होता, असा आरोप केला आहे. विकास ठाकरे हे गेली दहा वर्षे नागपूर शहर अध्यक्ष असून केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी ‘एक व्यक्ती एक पद’ असे निर्देश दिल्यानंतरही त्यांनी दुसरे पद सोडलेले नाही. प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेतेही त्यांच्या जागी दुसऱ्याची नेमणूक करण्यास धजावत नाहीत. विदर्भ हाही एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. पण आता हा किल्ला पूर्ण जर्जर झाला आहे. विदर्भातील पक्षाचे अनेक ज्येष्ठ – श्रेष्ठ नेते नागपूरमधील या बैठकीला उपस्थित होते. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह इतर स्थानिक नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा राडा घातला गेला.
नागपूर शहर काँग्रेसच्या आढावा बैठकीची सुरुवात नाना पाटोले यांच्या संबोधनाने झाली. बैठकीचा उद्देश आणि पुढील निवडणुकींच्या दृष्टीने तयारीवर पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी शहर कार्यकारिणीची माहिती दिली व त्यांनी राबविलेल्या उपक्रमाचा आढावा दिला. त्यांनी बैठकीत समारोपीय मत मांडले आणि बैठक संपली अशी घोषणा केली. त्यातच प्रदेश महासचिव नरेंद्र जिचकार हे माईक जवळ आले आणि त्यांनी ठाकरे यांचा माईक घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ठाकरेंनी माईक दिला नाही. यावेळी झालेल्या झटापटीत विकास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जिचकार यांना व्यासपीठावरून खाली खेचले व धक्काबुक्की केली. त्यात जिचकारांसह काही कार्यकर्त्यांचे कपडे फाटले. खुर्च्यांची फेकाफेक झाली. या गोंधळातच जिचकार यांना बाजूच्या खोलीत नेण्यात आले. त्यानंतर साधारण एक तास सभागृहात गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे नंतर नाना पटोलेंसह, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत, विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी या सर्व नेत्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. नागपूर शहर काँग्रेसमध्ये आधीपासूनच दोन गटांमध्ये पक्ष विभागला गेला आहे. माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि दुसरा राऊत-चतुर्वेदी गट आहे. काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद आज पुन्हा एकदा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यासमोरच नागपुरात पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्यावर पटोलेंनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांच्या शब्दाला न जुमानता पदाधिकारी एकमेकांना मारत, तुडवत सुटले. पटोलेंच्या समोरच पदाधिकारी त्यांचे ऐकत नव्हते. आतापर्यंत काँग्रेस हायकमांड आणि वरिष्ठ नेते नानांना गांभीर्याने घेत नाहीत असे ऐकले होते. पण आता एखादा लहान कार्यकर्ता देखील पटोले यांना मोजत नाहीत असेच या सर्व घटनेतून दिसत आहे. अशाच घटना कमी – अधिक फरकाने विविध राज्यांमध्ये घडत असल्याने काँग्रेसचे बुडते जहाज दिवसेंदिवस खोलात चालले आहे असेच म्हणावे लागेल.