
नाशिकमध्ये शिंदे गट आक्रमक; अंधारे विरोधात जोडेमारो आंदोलन
नाशिक : नाशिकच्या (Nashik) ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारे (Suhsma Andhare) यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेल्या आरोपांवरून शिंदे गट आक्रमक झाला आहे. नाशिकमधील शिंदे गटाने रस्त्यावर उतरत सुषमा अंधारे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला. तसेच सुषमा अंधारे यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत नाशिकमध्ये सुषमा अंधारे यांना प्रवेश देणार नाही, असा पवित्रा शिंदे गटाने घेतला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांचा संबंध ड्रग्ज माफियांशी जोडल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर दाद भुसे यांनी देखील अंधारेंनी आपला आरोप सिद्ध करावा, अन्यथा मालेगाव शहरवासीयांची माफी मागावी, असे प्रति आव्हान दिले.
त्यानंतर नाशिकमधील शिंदे गटाने ठाकरे गटातील नेत्यांचे ललित पाटीलशी संबंध असल्याचे फोटो व्हायरल केले. त्यानंतर शिंदे गटाकडून भुसे यांचा संबंध ड्रग्स माफियांशी जोडल्याने सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशेजारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यासोबत ड्रग्स माफिया ललित पाटीलचे असणारे फोटो बॅनरवर झळकावले.