मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकाच दिवशी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बारा नवजात बालकांचा समावेश होता. ही बातमी जशी बाहेर पडली, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधी पक्षनेते, पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार यांच्यासह अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले व घटनेची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. या सर्व प्रकरणात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या मताशी सहमत असणाऱ्यांनी व अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी एकमेकांविरुद्ध दिलेल्या पोलीस तक्रारींचे व त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला वेगळेच वळण मिळाले आहे. मृत्यूच्या तांडवाबरोबरच नंतरच्या राजकारणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.
पूर्वी नांदेडला असलेल्या शासकीय रुग्णालयाचे नाव श्री गुरुगोविंद सिंघजी शासकीय रुग्णालय असे होते. शहराच्या मध्यभागी म्हणजेच रेल्वे स्थानक व बसस्थानकापासून पूर्वीचे रुग्णालय हे केवळ आठ ते दहा मिनिटांच्या अंतरावर होते. अपुरी जागा या कारणावरून ते रुग्णालय गावाच्या बाहेर स्थलांतरित करण्यात आले व त्याचे नाव डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे देण्यात आले. खरे पाहिले तर नांदेडमध्ये दवाखान्यांचे मोठे टोळकेच आहे. रुग्णांची लूट व स्वतःचा गल्ला भरणे एवढेच काम नांदेडच्या खासगी रुग्णालयात केले जाते, असा अनुभव हजारो रुग्णांना आलेला आहे. खासगी रुग्णालयांना मोठे करण्यासाठी तसेच डॉक्टरांच्या मर्जिखातरच शासकीय रुग्णालय गावाबाहेर हलविण्यात आले, असा आरोप काही तज्ज्ञ डॉक्टर मंडळींमधून पूर्वीच झाला होता. पूर्वीचे शासकीय रुग्णालय पन्नास हजार स्क्वेअर फूट एवढ्या जागेत होते. नंतरचे स्थलांतरित केलेले डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे त्यापेक्षा दुप्पट जागेत बांधण्यात आले. प्रत्यक्षात शहरात असलेल्या रुग्णालयात सुरुवातीला डॉक्टर मंडळी तसेच नर्स, ब्रदर व इतर कर्मचाऱ्यांची जेवढी संख्या होती, त्यापेक्षा किमान दुप्पट संख्या नवीन शासकीय रुग्णालयात असणे गरजेचे होते. सरकार कोणाचेही असो, सत्तेवर कोणीही असो; परंतु रुग्णालय म्हटले की, त्या ठिकाणी डॉक्टरांची अपुरी असलेली संख्या तसेच तृतीय व चतुर्थ श्रेणीची कर्मचारी भरती होणे अत्यंत गरजेचे होते. शासनाकडे यासाठीचा पाठपुरावा स्थानिक नेतृत्वाने करणे गरजेचे होते. ज्याप्रमाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या दवाखान्याचे स्थलांतर तसेच मोठ्या प्रमाणात बांधकाम करून घेण्यासाठी ज्या राजकीय पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला त्याच पुढाऱ्यांनी जर दवाखान्यात पुरेसे डॉक्टर तसेच इतर कर्मचारी वर्ग भरून घेण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला असता, तर कदाचित लहान बालकांसह एकाच दिवसात २४ जणांच्या मृत्यूचा दिवस उजाडला नसता, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
नांदेडचेच नव्हे तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात संपूर्ण सुविधा नाहीत. तसेच तेथील स्वच्छतेच्या बाबतीत कोणीही नव्याने सांगण्याची गरज नाही. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ६०० घाटांची मंजुरी आहे तर प्रत्यक्षात रुग्णालयात ९००च्या वर रुग्णांची भरती असते. ‘एका हाताने टाळी वाजत नाही’ ही म्हण मराठीत प्रचलित आहे. त्याचप्रमाणे कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी हा किती इमानेइतबारे सेवा करतो हे तुम्ही-आम्ही सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहतो. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जो मृत्यूच्या तांडवाचा दुर्दैवी प्रकार घडला त्यामुळे त्यानंतर लगेच खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालय परिसराला भेट दिली. त्यावेळी सर्वांचे हृदय हेलावले. त्या ठिकाणी स्वच्छतागृह अतिशय वाईट अवस्थेत होते. तेथील अस्वच्छता पाहून खा. हेमंत पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे व अन्य एका डॉक्टरांकडून तेथील साफसफाई करून घेतली. या कृत्यानंतर जनमानसातून रोष व्यक्त करण्यात आला; परंतु नंतर हे प्रकरण थेट अॅट्रॉसिटी दाखल करण्यापर्यंत गेले. या मध्ये झालेले राजकारण हे काहीसे वेगळेच आहे, अशी चर्चा नांदेडमध्ये होत आहे. खा. हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी पोलीस स्थानकात अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे व अन्य एकाविरुद्ध ‘रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत’ अशी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवाचा प्रकार वेगळाच राहिला; परंतु त्यानंतर झालेल्या अॅट्रॉसिटी व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टर व त्यांच्या संघटना खासदारांच्या कृतीची निंदा करत मोर्चे काढत आहेत. या घटनेमागची एक बाजू ही देखील आहे की, शासकीय रुग्णालयात असलेली अस्वच्छता व त्या ठिकाणी असलेले तृतीय व चतुर्थ श्रेणी गटातील कर्मचारी कामाला बगल देत केवळ शासकीय पगार लाटतात. याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांनी उपस्थित केलेला प्रश्न चुकीचा नव्हता, शेवटी अधिष्ठाता म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेणे शासकीय कर्तव्याचा भाग आहे. खासदार हेमंत पाटील हे मुळात शिवसैनिक आहेत. ते ज्या वेळी रुग्णालयात गेले होते त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला नेते आले म्हणून अनेक नातलगांनी गर्दी केली होती. दुर्दैवी घटनेत कोणाचे बाळ दगावले होते तर कोणाचे घर उघड्यावर आले होते. काहींनी आई-वडिलांना गमावले होते. मृत्यूचे तांडव व झालेला सर्व प्रकार तेथे जमलेले रुग्ण व त्याचे नातलग लोकप्रतिनिधी म्हणून हेमंत पाटील यांच्या कानावर टाकत होते. त्या भावनेतून व तेथील अस्वच्छता पाहून खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठाता व डॉक्टरांकडून साफसफाई करून घेतली.
डॉक्टरांनी साफसफाई केल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः खासदार हेमंत पाटील यांनी हातात पाइप घेऊन ती घाण धुऊन काढली, हे चित्र तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच पाहिले. रुग्णालयात साफसफाई करण्याचे काम अधिष्ठाताचे नाही हे देखील तेवढेच खरे आहे. त्या प्रकाराने संतप्त झालेल्या डॉक्टरांनी ‘स्टंटबाजी’ असे म्हणून या प्रकरणाला वेगळेच वळण दिले. यामध्ये जातीचे राजकारण आणण्यात आले व खासदारांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला, असे मत या प्रकारानंतर व्यक्त होत आहे. ज्या दिवशी मृत्यूचे तांडव झाले त्या घटनेच्या एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून सर्वत्र स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली होती; परंतु ही मोहीम जर रुग्णालयात केली असती तर कदाचित हा प्रकार देखील घडला नसता. एकाच दिवसात २४ रुग्णांचा मृत्यू होणे खूपच वाईट आहे. खरे तर या प्रकरणावर चर्चा होऊन त्यावर तोडगा काढणे गरजेचे होते; परंतु राजकीय मंडळींनी दोन्ही प्रकारांना उचलून धरत मूळ मुद्द्याला बगल दिली. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी यावरून राजकारण करत मूळ मुद्दा बाजूला ठेवला. कोणीही गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून आले नाही, हे विदारक चित्र येथील राजकारणी मंडळींना उघडे पाडणारे आहे.
विशेष म्हणजे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ज्या भागात आहे त्या नांदेड दक्षिणचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे करतात. त्यांच्या घरापासून जवळच हे शासकीय रुग्णालय आहे व तेथून जवळच विष्णूपुरी धरण आहे, ज्यामधून संपूर्ण नांदेडला पाणीपुरवठा होतो; परंतु शासकीय रुग्णालयात कधीही नियमित पाणीसाठा उपलब्ध नसतो व रुग्णांना दुपारी दोनपर्यंत पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती असताना काँग्रेसचे आ. हंबर्डे यांनी किती वेळेस त्या रुग्णालयात जाऊन पाहणी केली हा एक संशोधनाचाच विषय आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या या शासकीय रुग्णालयाची अवस्था त्यांनी किती वेळेस सभागृहात मांडली, हा विषय त्यांनी सभागृहात मांडला असेल तर त्यांचे प्रयत्न कुठे कमी पडले, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करावे, लोकप्रतिनिधी म्हणून सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही यावर चर्चा करणे गरजेचे होते. मृत्यूच्या तांडवानंतर आता सर्वजण या विषयावर लक्ष केंद्रित करत आहेत. काहीही असो नांदेडमध्ये ज्यांचा जीव गेला त्यांच्या कुटुंबीयांना जावून दुःख विचारा. निगरगठ्ठ झालेली ही राजकारणी मंडळी आजपर्यंत झोपली होती काय, असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.