नवी दिल्ली : पश्चिम आशियाई देश पुन्हा एकदा युद्धाच्या झळांमध्ये होरपळून निघत आहेत. शनिवारी सकाळी हमासकडून इस्त्राईलवर(israel) हल्ला केल्यानंतर जगात पुन्हा एकदा नव्या युद्धाची सुरूवात झाली आहे. याचा परिणाम चारही बाजूंना पाहायला मिळत आहे. समोरचे संकट पाहता विमान कंपनी एअर इंडियाने इस्त्राईलची राजधानी तेल अवीवला जाणारी आपली उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत.
कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली ही माहिती
एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी रविवारी दुपारी माहिती दिली की विमान कंपनी तेल अवीवला जाणारी तसेच तेथून येणारी सर्व उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवक्त्यांनी सांगितले की कंपनीने आपल्या चालक दलाचे सदस्य आणि सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांच्याकडे १४ ऑक्टोबरपर्यंतचे कन्फर्म तिकीट आहे त्या सर्व प्रवाशांना कंपनी शक्यतोपरी मदत करणार आहे.
आठवड्यातून पाच वेळा असतात उड्डाणे
टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाकडून तेल अवीव आणि नवी दिल्ली यांच्यात आठवड्यातून पाच वेळा विमानांची ये-जा केली जाते. ही उड्डाणे सोमवार, मंगळवार, गुरूवार, शनिवार आणि रविवारी होतात. कंपनीने शनिवारी पहिल्यांदा उड्डाण रद्द केल्याचे सांगितले.
सकाळीच झाली होती हल्याला सुरूवात
हमासने इस्त्रायलवर शनिवारी सकाळीच हल्ला केला होता. यामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले. इस्त्रायलवर अशा पद्धतीचा हल्ला गेल्या पाच दशकांत पहिल्यांदा पाहायला मिळाला. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली.