काळ तर मोठा कठीण आला...

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर


१९९० नंतरच्या बदललेल्या जगाचा चेहरा मराठी कवितेत स्पष्टपणे उमटला आहे. हे बदललेले जग विविध रंग ल्यायलेले आहे. यात भीती, नैराश्य, वैफल्य, असे रंग आहेत, तर काही रंगांच्या आकारांची एकमेकांत इतकी सरमिसळ झाली आहे की त्यातून वेगळेच आकार तयार झाले आहेत. वसंत डहाके यांच्या कवितेच्या ओळी आहेत :
“काहीतरी विचित्रच आहे...
समीकरणं बदलली शब्दांचे अर्थ बदलले...
शक्य आहे की, मला कीटकांची भाषा समजेल आणि माणसांच्या भाषेपासून माझी सुटका होईल...
काळ तर काळोखाचा आला आहे…...”


जागतिकीकरणाच्या रेट्याने समाज ढवलून काढला. सर्व क्षेत्रांतील स्पर्धेचा अतिरेक, हरवलेला विवेक, बाजाराने कवेत घेतलेला समाज, टोकाला गेलेला चंगळवाद, जगण्याचा आत्मकेंद्री दृष्टिकोन ही या काळाची काही वैशिष्ट्ये. मुख्य म्हणजे मानवी नात्यांवर या बदलांचा परिणाम झाला. नात्यांमधली ओढ हरवली आणि तकलादूपणाला खरेपणाचे स्थान मिळाले. सुहास जेवलीकर म्हणतात,


व्हेलेंटाइन किंवा फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने प्लास्टिकच्या कागदात लपेटलेल्या फुलांनी आणि कृत्रिम रेशमाच्या बँड्सनी प्रेमाला मैत्रीला बांधून ठेवण्याचा नवा अट्टहास! माणसा-माणसांमधले अंतर वाढल्याने ती कशी एकाकी झाली याचा प्रत्यय अरुण काळे यांच्या शब्दांतून साकार होतो.
“रस्ते चौपदरी झाले, माणसं एकपदरी...
सुंंदर वाहतूक बेटे झाली आणि लोक राहू लागले बेटावर…...”


गर्दीत असूनदेखील माणसांच्या वाट्याला एकाकी जगणे आले. आनंद लुटण्याचे हजारो मार्ग, पण दुःख वाटून घेताना आपली माणसे सापडत नाहीत. माणसांची बेटे होणे हे या काळाचे वास्तव आहे. आपल्याला खूप काही सांगायचे असते, तेव्हा मित्राचा फोन ‘बिझी’ येत राहतो किंवा मग फोनवर लगेच शब्दसंदेश ‘आय विल कॉल यू लेटर.’
मनातली सांगायची उर्मी तशीच जिरून जाते. प्रदीप पाटील यांच्या कवितेचा संदर्भ आठवतो.
“कोरड्या विहिरीचा दिसू लागे तळ
ओलाव्याचे बळ कमी झाले.”


माणसा-माणसांतील ओलावा ही ताकद होती. पण तो आता आटत चालला, ही तीव्र जाणीव या ओळी व्यक्त करतात. वातावरणात वाढलेले प्रदूषण, तर आहेच पण दुसऱ्या बाजूने वेगवेगळ्या स्तरांवर प्रदूषण आहे. कुठलीच गोष्ट अस्सल राहिलेली नाही. सुहास जेवलीकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात,
“पर्यावरणात सर्वदूर पसरलेला कर्बवायू शोषून,
विशाल अंत:करणानं प्राणवायू देणारी
खोलवर रुजलेल्या मुळांची विराट झाडं अभावानेच आढळतात आता या महानगरात...”


सखोल असे सापडणे कठीण नि वरवरचे, उथळ मात्र जागोजागी उपलब्ध असे दृश्य आज दिसते. परकीय संस्कृती व परकीय भाषा लादली जाणे हेही या काळानेच आपल्याा दाखवले. आपल्या भाषेवरही याचा मोठा परिणाम झला. इंग्रजी ही विश्वसंपर्काकरता गरजेची हे कुणीच अमान्य करणार नाही. पण अंतर्गत दैनंदिन व्यवहारांकरिता आपल्या प्रादेशिक भाषा मोलाच्या आहेत हे देखील आपण विसरलो. या भाषांमधला संपर्कव्यवहार नि ज्ञानव्यवहार दोन्ही आपण दुबळे ठेवले. आपली भाषिक व सांस्कृतिक एकता ही आपली ताकद आहे हे विसरून चालणार नाही. वर्जेश सोलंकी यांच्या कवितेत त्यांनी हे नेमकेपणाने साकारले आहे.
“इन्फोटेकने वामनासारखी पादाक्रांत केली पृथ्वी...
हरवू लागलोय आता आपण आपली बोलीभाषा...
विसरू पाहतोय परवचे... इडलीच्या पीठासारखे भाषेचे तयार पॅक बाजारात मिळताना... पाटीवर गमभन गिरवलेल्या बोटातून तुटत चाललीय काही लिहिण्याची सवय…...”


आपल्या भाषेतला अनमोल ठेवा, तिची शब्दकला, त्यातून निर्माण झालेले तिचे सौंदर्य हा सगळा आनंद पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. श्वासाइतकी अनमोल मायभाषा ही आपल्या जगण्याची मूलभूत गरज केव्हा होणार?



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

महसूल आयुक्तालयाचा प्रश्न प्रलंबित

प्रशासकीय कामांसाठी होणारी सर्वसामान्यांची फरफट थांबवण्यासाठी नांदेडमध्ये नवीन महसूल आयुक्तालय व्हावे, ही

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार कोण करणार?

शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार एखाद्या शाळेची इमारत बंद झाली, तर त्याची बातमी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर

जनसंवाद

बेस्ट बससेवेची शताब्दी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या 'बेस्ट' बससेवेला १५ जुलै २०२६ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. १५

माफीचा डबल डोस

शेती ही केवळ एक व्यवसाय नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि ग्रामीण संस्कृतीचा आत्मा आहे. मात्र गेल्या

जनआरोग्य योजना व्हेंटिलेटरवर?

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसारख्या उपक्रमाला सध्या गैरव्यवहारांचे गंभीर ग्रहण लागले असून नाशिक

पुरीच्या विशाल पथावर...

श्रीमती द्रौपदी मुर्मू-राष्ट्रपती   महाप्रभू जगन्नाथांची भजने गाताना मला खूपच आनंद व्हायचा. महाप्रभू आपल्या