कपड्याच्या आतला माणूस!

Share

संवाद: गुरुनाथ तेंडुलकर

मी राहतो त्या सोसायटीत वॉचमन म्हणून काम करणारा श्रीहरी नावाचा रात्रपाळीचा वॉचमन आहे. हा श्रीहरी ड्यूटी संपल्यानंतर मेंबर्सच्या गाड्या धुतो. साधारण पंधरा दिवसांपूर्वी तो माझ्या घरी आला. पिशवीतून एक लग्नपत्रिका काढून त्याने माझ्या हातात दिली आणि म्हणाला, “साहेब, माझ्या मुलाचं-सुंदरचं लग्न ठरलंय. पुढच्या रविवारी लग्न आहे. तुम्ही सर्वांनी नक्की यायचं.” त्याच्या आवाजात आर्जव होतं. तळमळ होती. नजरेत आत्मीयता होती. “हो नक्की येईन. बाय द वे, तुझा मुलगा करतो काय?” मी सहजच विचारलं.

“बोरिवलीला एका शाळेत शिपाई म्हणून कामाला आहे. बारावीपर्यंत शिकलाय. पंधरा हजार रुपये पगार आहे. नालासोपाऱ्याला एक रूम बघितलाय. होणारी सून बोरिवलीला एका नर्सिंग होममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला आहे. तिला दहा हजार रुपये पगार आहे.” मी न विचारताच श्रीहरीने इतरही बरीच माहिती पुरवली.श्रीहरीच्या मुलाच्या लग्नाचा वार रविवार होता. त्यामुळे मला सुट्टी होती. संध्याकाळी इतरही कामं फारशी नव्हती. बायको आणि मुलगी नेहमीप्रमाणे “तुम्ही एकटे जाऊन या.” असं म्हणाली. “ठीक आहे. मी जाऊन येतो. जेवायला मात्र थांबणार नाहीये. घरीच येणार आहे.” मी बायकोला जाता जाता सांगितलं. माझ्या उपस्थितीनं श्रीहरीला आनंद होणार होता याची मला पूर्ण जाणीव होती. लग्नही पार्ल्यातच होतं. माझ्या घरापासून जेमतेम पंधरा मिनिटांच्या अंतरावर हॉल होता. मी लग्नाला गेलो.

सुंदर नावाचा श्रीहरीचा तो मुलगा मी पाहिला आणि उडालोच. सूट-बूट-टाय लावलेला. टायला लखलखती टायपिन, मनगटाजवळ शर्टला चकचकीत कफलिंग्ज… पण दिसायला मात्र अगदीच सामान्य. जेमतेम सव्वापाच फूट उंचीचा, काळासावळा किडकिडीत पोरगेलासा तो नवरा आणि त्याच्या शेजारी उभी असलेली त्याला अगदी यथायोग्य साजेसी नवरी. ती नवरीच्या अंगावर देखील भारीतला चनिया-चोलीसारखा सिल्कचा गाऊन. स्वतः श्रीहरीदेखील सुटाबुटात मिरवत होता. “हे आमचे तेंडुलकर साहेब.” श्रीहरीने मला स्टेजवर नेऊन मुलाशी ओळख करून दिली. तो नवरा मुलगा औपचारिकपणे हात जोडून हसला. तो हसला त्यावेळी त्याचे तंबाखू-मावा खाऊन काळपटलेले दात दिसले. ते पाहून मला एकदम शिसारी आली. सुंदर नावाच्या माणसाचं काय ते ध्यान आणि या त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी विसंगत असा त्याच्या अंगावरचा तो भारीतला सूट-बूट-टाय. मी त्या नवविवाहित दांपत्याला शुभेच्छा दिल्या, अहेराचं पाकीट त्या मुलाच्या हातात दिलं आणि तिथून सटकलो.

घरी येताना देखील श्रीहरीचा तो “सुंदर” मुलगा माझ्या डोळ्यांसमोर दिसत होता. परतताना मला इसापनीतीतल्या कुंभाराच्या गाढवाची आठवण झाली. कुंभाराच्या एका गाढवाला सिंहाचं कातडं सापडलं. ते पांघरून त्याने इतर सगळ्या प्राण्यांना घाबरवायला सुरुवात केली. गाई- म्हशी, शेळ्या, बकऱ्या सगळेजण त्याला पाहून टरकले. कुत्रे, मांजरं त्याला पाहून घाबरली. गाढव शेफारला. आपल्याला सगळे प्राणी घाबरतात, कळपातली इतर गाढवं दूरदूर पळतात हे पाहून त्याला अधिकच चेव चढला. त्या मस्तीच्या उन्मादात त्याने सिंहासारखी गर्जना करण्यासाठी तोंड उघडलं आणि जोरात रेकला. वरचं कातडं जरी सिंहाचं पांघरलं तरी आतला गाढव हा गाढवच राहिला होता. तो गर्जना कशी करणार? सिंहाचं कातडं पाघरून देखील गाढवाला शिकार करणं जमणार नाही. तो रेकणार… उकिरड्यावर लोळणार. सुटाबुटातला तो “सुंदर” नवरदेव पाहून मला इसापनीतीतला तो गाढव आठवला.

‘एकनूर आदमी दसनूर कपडा’ ही म्हण कितीही खरी असली तरी केवळ बाह्यात्कारी कपडे घालून शरीर शृंगारलं तरी बाहेरच्या कपड्याहूनही त्या कपड्याच्या आतला देह अधिक महत्त्वाचा असतो. नाही का? बाहेरचा कपडा सुंदर असावा, पण त्याचबरोबर त्या कपड्यांनी झाकलेलं शरीर निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. शरीर बलशाली हवं. सुंदर हवं. त्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार, योगसाधना करावी लागते. पैसे असले की बाजारात जाऊन कपडे कधीही विकत घेता येतात, पण निरोगी सुदृढ शरीर बाजारात जाऊन विकत घेता येत नाही. ते नियमित व्यायामानं कमावावं लागतं. योग्य निगा घेऊन राखावं लागतं. टिकवावं लागतं. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. मेहनत करावी लागते. स्वतःला सर्व प्रकारच्या व्यसनांपासून कटाक्षाने दूर राहावं लागतं.

थोडा अधिक खोलवर विचार केला, तर आपल्याला आढळेल की जी गोष्ट कपड्यांच्या बाबतीत तीच गोष्ट शरीराच्या बाबतीतही सत्य आहे. बाहेरच्या कपड्यापेक्षा, त्या कपड्यांच्या आतलं शरीर जसं महत्त्वाचं, तसंच केवळ शरीरापेक्षा ते शरीर धारण करणारी व्यक्ती अधिक महत्त्वाची. त्या व्यक्तीचं चारित्र्य, त्याचा स्वभाव, त्याची बुद्धी, त्याचं शिक्षण, विचार आणि आचार… जे बाहेरून दिसत नाही अशा अनेक घटकांच्या एकत्रिकरणातून घडलेलं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व हे शरीराहूनही अधिक महत्त्वाचं. म्हणूनच मला वाटतं की, व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या या इतर घटकांची जोपासना जाणीवपूर्वक करायला हवी. एखादी व्यक्ती माणूस कोणत्या प्रकारचे कपडे घालते, यापेक्षा ती व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हे अधिक महत्त्वाचं. म्हणजेच व्यक्तीचं चारित्र्य, स्वभाव, सच्चाई, त्याची बुद्धिमत्ता यांना अंगावरच्या कपड्यापेक्षा अधिक महत्त्व असायला हवं…

व्यक्तीच्या स्वभावाच्या, चारित्र्याच्या, बुद्धीच्या खालोखाल महत्त्व शरीराला आणि शेवटी त्या शरीरावरचं आवरण म्हणून कपड्यांना महत्त्व असा क्रम असायला हवा.पण आपण मात्र उलटा क्रम लावतो. एखाद्या माणसाची त्याच्या अंगावरच्या कपड्यावरून आणि क्षणिक राहणीमानावरून त्याचा मोठेपणा ठरवतो. अंगावरच्या कपड्यांनी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव येतो हे मान्य केलं तरी बाहेरच्या कपड्यांनी आतला माणूस कधीच बदलत नसतो. पैसे खर्च केले की, उंची कपडे विकत घेऊन परिधान करता येतात, पण उंची कपड्यांमुळे त्या व्यक्तीच्या माणूसपणाची उंची वाढत नाही. सासऱ्याने पैसे दिले म्हणून त्या सुंदरने – श्रीहरीच्या मुलाने लग्नात शिवून अंगावर चढवला असेल किंवा भाड्यानेही आणला असेल.

तो सूट-बूट-टाय परिधान करून त्याने एक दिवस हौस भागवून घेतली. पण दुसऱ्या दिवशी सूट घालून तो माणूस शाळेत नोकरीच्या ठिकाणी गेला तरी त्याला कुणी मुख्याध्यापकांच्या खुर्चीत बसवणार नाहीत की, वर्गावर शिकवायलाही पाठवणार नाहीत. त्याला शिपायाचंच काम करावं लागणार.त्याची बायको जी कुठल्याशा छोट्याशा नर्सिंग होममधे रिसेप्शनिस्टचं काम करते ती रेशमी शरारा-गरारा नेसून कामावर गेली तरी तिच्यावर हॉस्पिटलमध्ये पेशंटचं ऑपरेशन करायची कामगिरी कुणी सोपवणार नाही. तिला काऊंटरवर बसूनच काम करावं लागणार आहे. म्हणूनच… ज्या कुणी ‘एकनूर आदमी दसनूर कपडा’ ही म्हण प्रचलित केली त्या माणसाची माफी मागून मी म्हणेन की प्रत्यक्षात विचार केला तर “एकनूर कपडा आणि दसनूर आदमी” हेच खरं असतं. इंग्रजीत एक वचन आहे.

Elegance is when the Inside is as
beautiful as The Outside.

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

25 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

34 minutes ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

43 minutes ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

57 minutes ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago