रवींद्र तांबे
कोकणातील माळरानाचा विचार करता सध्या जिकडे तिकडे पाहिल्यावर हिरवागार चारा दिसतो. मात्र हिरव्या चाऱ्याचा सर्रास वापर केला जात नाही. त्यात पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकरी राजा शहराकडे जात आहे. त्यामुळे एकवेळ गजबजणारे माळरान सध्या ओसाड दिसत आहेत. आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे. त्यामुळे शेतकरी दादांची गुरे असतात. त्याचप्रमाणे दूध-दुभत्या गाई-म्हशीसुद्धा पाळल्या जातात. काही ठिकाणी म्हशीचे तबेले पाहायला मिळतात. तर गाईसाठी मोठ-मोठे गोठे बांधण्यातही आलेले असतात; परंतु चाऱ्याअभावी ते बंद झालेले दिसतात. तसेच शहरामध्येसुद्धा दुभत्या म्हशी व गाई पाळल्या जातात. मात्र त्यांना हिरवा चारा मिळत नाही. मिळाला तरी जादा किंमत देऊन खरेदी करावा लागतो. जरी मिळाला तरी तो तुटपुंजा मिळतो. त्यासाठी कोकणात हिरवा चारा विक्री केंद्र स्थापन केले पाहिजे. विशेष म्हणजे दुभत्या जनावरांना हिरवा चारा पौष्टिक आहार म्हणून उपयुक्त असतो. हिरव्यागार चाऱ्यामुळे दुभती जनावरे अधिक दुध देतात.
कोकणातील हिरवा चारा हा नैसर्गिक असतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बी-बियाणांची पेरणी करावी लागत नाही. पाऊस पडला की, तीन ते चार दिवसांनी ओसाड वाटणारे माळरान हिरवे दिसू लागतात. सध्या हिरव्या चाऱ्याची उंची दोन फुटांपेक्षा जास्त वाढली आहे. हा चारा कोयतीने कापून पेंढ्या बांधू शकतो. अशा पेंढ्या डोक्यावरून विक्रीसाठी घेऊन जाणे सोपे असते. मात्र तशी मागणी असणे गरजेचे असते. तसा आतापर्यंत प्रयत्न झालेला दिसत नाही. तेव्हा असे केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे.
हिरवा चारा म्हणजे, जनावरांसाठी एक उपयुक्त आहार म्हणून मानले जाते. चाऱ्यामुळे जनावरांच्या शरीराची वाढ होते. त्याचप्रमाणे त्यांची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढण्याला मदत होते. ओल्या चाऱ्यामुळे प्राण्यांची पचनक्रिया सुधारते. त्यात ओलावा असल्याने नकळत पाणीसुद्धा जनावरांना मिळते. यातून त्यांना ऊर्जासुद्धा भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे पावसाळ्यात जनावरे ताजीतवानी दिसतात. विशेष म्हणजे दुभत्या जनावरांना हा चारा जास्त उपयुक्त असतो. हिरव्या चाऱ्यामुळे दुभती जनावरे अधिक दूध देऊ शकतात. त्यासाठी पुरेसा हिरवा चारा मिळणे आवश्यक आहे. हिरव्या चाऱ्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी केलेली नसते. महत्त्वाची बाब म्हणजे, कोकण विभागाचा विचार करता हिरवा चारा म्हणजे कोकणची हिरवीगार शान आहे. निसर्गनिर्मित विनामूल्य नैसर्गिक देणगी आहे. सडे, मळे व डोंगर हिरवेगार गालिच्याने सजलेले दिसतात. मात्र याचा वापर केला जात नाही. नंतर हा चारा सुकून जातो. त्यानंतर उन्हाळ्यात वणव्यात पेटून जाते.
तेव्हा असे न होता कोकणातील प्रत्येक गावात शासन स्तरावर हिरवा चारा विक्री केंद्र सुरू करून त्याचे उप-मुख्यालय तालुक्याच्या ठिकाणी ठेवावे, तर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मुख्यालय करावे. म्हणजे चारा वितरण करणे सोपे जाईल. जशी मागणी असेल त्याप्रमाणे चाऱ्यांच्या पेंढ्याचा पुरवठा करावा. असे केल्यास स्थानिक लोकांना रोजगार मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तेव्हा यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. अनुभव पुरेसा असतो त्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करावे लागेल. ज्या ठिकाणी चाऱ्याची आवश्यकता असेल त्याचा सर्वे करावा लागेल. म्हणजे चाऱ्याची विभागणी करणे सोपे जाते. त्यासाठी कोकणातील ग्रामीण भागातील लोक उत्तमप्रकारे काम करू शकतात. हिरवा चारा कापणीसाठी स्थानिक महिला गट तयार करण्यात यावेत.
आज कोकण विभाग सोडून इतर ठिकाणी हिरवा चारा मिळणे कठीण असते. तेव्हा या चाऱ्याचा योग्य वापर करण्यासाठी अशाप्रकारे नियोजन केले तर अशा हिरव्यागार चाऱ्याला योग्य भाव मिळेल. त्यामुळे फुकट जाणाऱ्या चाऱ्याचे महत्त्व सुद्धा कोकणातील लोकांना पटेल. त्यामुळे ते सुद्धा उत्तम प्रकारे चाऱ्याची काळजी घेतील. विशेषत: शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिरवा चारा रोजी-रोटीचे साधन बनेल. तेव्हा प्रत्येकजण आपल्या जमिनीत कुंपण घालून चाऱ्याची काळजी घेतील. जर आपण स्वतंत्रपणे चारा विक्री केंद्राची स्थापना केल्यास प्रथम हिरव्या चाऱ्याचा पुरवठा कुठे करण्यात येईल, याची माहिती गोळा करावी लागेल. या प्रकल्पाला थोडा वेळ जरी लागला तरी जाहिरातीच्या माध्यमातून माहिती पोहोचवू शकतो. म्हणजे पाळीव जनावरे कोण कोण पाळतात याची माहिती मिळेल. तशाप्रकारे पाळीव जनावरांना घरपोच चारा मिळेल त्यासाठी जो खर्च येईल, त्याची माहिती सांगावी लागेल. नक्कीच इतर चाऱ्यापेक्षा या चाऱ्याची किंमत कमी असेल.
त्यामुळे लोक आपल्या जनावरांसाठी आवडीने चारा घेतील. इतकेच नव्हे; तर आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यांत तसेच राज्याबाहेर सुद्धा चारा जावू शकतो. त्यासाठी शासन स्तरावर कोकणातील हिरव्या चाऱ्याचा विचार होणे आवश्यक आहे. असे जर झाले तर ग्रामीण जनता जी शहराकडे जात आहे, ती थांबेल. त्यांच्या रिकाम्या हातांना काम मिळेल. गावातच रोजगार मिळाल्याने इतर खर्चसुद्धा कमी होऊन ते काही पैशाची बचत करू शकतात. यात राज्याच्या अर्थव्यवस्थेला आधार मिळेल. हा चारा इतर राज्यात सुद्धा पाठवू शकतो. यासाठी शासन स्तरावर निर्णय घेऊन जो चारा नैसर्गिकरीत्या तयार होतो, त्याचे नियोजनबद्ध वितरण करण्यासाठी प्रथम हिरवा चारा विक्री केंद्राची स्थापना करावी लागेल. त्याची ध्येय्य-धोरणे ठरवून त्या त्या स्तरावर पारदर्शकपणे काम करावे लागेल. त्यासाठी कोकणात हिरवा चारा विक्री केंद्र स्थापन करावे लागेल. पहिल्या सुरुवातीला लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही, मात्र नक्कीच पुढे लोकांचा प्रतिसाद उत्तम प्रकारे मिळू शकतो. तेव्हा कोकणातील माळरानावरील हिरव्या चाऱ्याला सोनेरी दिवस यायचे असतील, तर महाराष्ट्र सरकारला कोकणात हिरवा चारा विक्री केंद्र सुरू करावे लागेल.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…