‘ओक्के हाय एकदम’ या लोकनाट्याचे निरीक्षण (परीक्षण अथवा समीक्षण नाही) इतर वर्तमानपत्रांतून छापून आल्यानंतरच लिहावे, या हेतूने मुद्दाम थोडी उशिरानेच दखल घेत आहे. तमाशा ही लोककला मुळातच लवचिकता आणि मुक्तनाट्याशी बांधिल असल्याने गण, गौळण, बतावणी आणि वग यांच्या सादरीकरणाची तुफानी एक्स्प्रेस असते; परंतु हे सादरीकरण समाजातल्या बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक लोकनाट्यात सद्यकाळात बदललेले आढळतात आणि कोविडनंतरच्या सद्यकाळात तर ते बदल प्रकर्षाने जाणवताहेत. अखंड कलाजमातीवर कोविडचा पडलेला प्रभाव आपण या अगोदर कित्येक लेखांद्वारे अभ्यासला अथवा वाचला आहे; परंतु त्यावर भाष्य करणारे लोकनाट्य आजवर रंगमंचावर आले नव्हते. कोविड काळात तमाशा फडांची झालेली वाताहात, त्यातील विदारक परीस्थिती राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचावी हा उद्देश ठेवूनच या नाटकाची बांधणी केली गेली असावी, असे मला वाटते.
एका तमाशा फडाची मालकीण चंद्राबाई नारायणगावकर १८९ जणांचा फड सांभाळत असते. लॉकडाऊनमध्ये सारे दळणवळणच थांबल्याने १०० लोकांना आपापल्या घरी पाठवून उरलेल्या ८९ जणांनी जगण्यासाठी केलेला संघर्ष म्हणजे “ओक्के हाय एकदम..!”
लोककलेची पार्श्वभूमी लाभलेली व्यथा लोकनाट्यातूनच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, तर अधिक परिणामकारक ठरेल हा सावित्री मेधातुल यांनी केलेला विचारच महत्त्वाचा वाटतो. एडिनबर्ग स्कॉटलंड येथे दरवर्षी लोककला महोत्सव गेली अनेक वर्षे भरवला जातो. विविध देशांतील लोककलाकार आपली कला सादरकरण्यासाठी स्कॉटलंड येथील वैश्विक मंचावर एकत्र येत असतात. त्यात सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाकडून लोककलेत पारंगत असलेल्या व परंपरा जपणाऱ्या रंगकर्मींची यासाठी निवड होत असते. सावित्री मेधातुल यांची निवड एडिनबर्ग फेस्टिव्हलसाठी भारतातून निवडलेल्या पाच लोककलाकारांमध्ये झाली होती. कोविडच्या हल्ल्यात कलाकारांचं जीवन कशा प्रकारे होरपळून गेलं, हे दाखवण्याची ही नामी संधी होती. एका तमाशा फडाची सत्यकथा घेऊन सावित्री मेधातुल पुढे आल्या आणि ‘ओक्के हाय एकदम’चा जन्म झाला. सुधाकर पोटे यांनी मूळ संहिता जरी लिहिली असली तरी गणेश पंडितने यावर आपला विनोदी कोट्यांचा मॅजिकल हात फिरवला आहे. शिवाय दिग्दर्शकही गणेशच असल्याने ते लोकनाट्य न राहता नाटक झाले आहे.
समाज व्यवस्थेतील सरकारी नियंत्रणच भ्रष्टाचारी बनल्यामुळे रोजच्या जगण्यात कमालीचा ढिसाळपणा आणि अराजकता माजली आहे हे दाखवण्यासाठी पोटे-पंडितानी जो कथा ‘प्लॉट’ निवडलाय त्यामागील वैचारिक मूल्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. एका राज्याचा राजा तमाशा फडात आचारी (महाराज) म्हणून दाखल होतो. तमाशा फडाचे बंद झालेले उत्पन्न त्यामुळे हतबलतेने कवडी मोलाच्या भावात विकायला लागणारी सामुग्री, सोने-नाणे, तसेच तमाशा शौकिनांची बदललेली मनोवृत्ती, बँका-पतसंस्थांनी नाकारलेलं अर्थसहाय्य अशा अनेकानेक समस्या या कलावंतासमोर उभ्या राहिल्या. प्रत्यक्षात समोर या घटना घडत असूनही राजा असमर्थतेशिवाय काहीच करू शकत नाही, ही वस्तुस्थिती जेव्हा चंद्रा कलावंतीण मांडते तेव्हा सर्वच निरुत्तर होतात….
तमाशा हे मुक्तनाट्य असून, मेलोड्रामा, ओव्हर अॅक्ट किंवा द्विअर्थी संवाद व त्यांचे टायमिंग या त्याच्या मूलभूत गरजा आहेत. खेडोपाडीचा प्रेक्षकवर्ग फडावर या गरजा सादर झाल्या की ते नाट्य डोक्यावर घेतो आणि हे लोक कलावंत प्रेक्षकांची हीच नाडी ओळखून आपल्या कलागुणांना उधळत असतात. दिग्दर्शक या नात्याने गणेश पंडितानी मूळ तमाशाबारीतले कलावंत घेतले असल्याकारणाने “ओक्के” ही अस्सल आणि अभिजात निर्मिती वाटते. मॉडर्न थिएटरचे घटक वापरून त्यांनी वगाच्या सादरीकरणाचा वेग सुसाट आहे. व्यथा मांडायची असल्यास प्रथम प्रेक्षकांना पोटभर हसवायचे आणि शेवटाला अचानक दणका द्यायचा ही थिएट्रिकल ट्रिटमेंट इथेही दिसतेच. त्याचा परिणाम एवढा लक्षवेधी असतो की प्रेक्षकवर्ग मांडल्या गेलेल्या समस्येचा विचार करतोच.
सुधाकर पोटे, सीमा पोटे, प्रज्ञा पोटे, भालचंद्र पोटे, पंचू गायकवाड, विक्रम सोनवणे, विनोद अवसरीकर, अभिजीत जाधव आणि चंद्रकांत बारशिंगे आपल्या ताकदीच्या अभिनय सामर्थ्यावर समस्याप्रधान कथाबीजाला खेळवत ठेवतात. विशेष उल्लेख करावा अशी खड्या आवाजाच्या सीमा पोटे प्रत्येक गाण्यात लक्षवेधी ठरतात. तमाशाला लागणारा टिपिकल वरच्या पट्टीच्या आवाजाची देणगी त्यांना लाभलेली असल्याने त्याचा पुरेपूर फायदा त्या करून घेतात. सफारी शाहीर पंचू गायकवाड आणि मुसाच्या भूमिकेतील विक्रम सोनावणे हे नाटक पुढे पुढे सरकवण्याची किमया, कधी प्रेक्षक संवादातून, तर कधी निवेदन शैलीतून, तर कधी परस्पर संवादातून मांडत रहातात. खरं तर वगास एकदा सुरुवात झाली की, तो घटना प्रधान असतो. कथानकातील घटना सादर होण्याची ती एक मालिकाच आपल्या समोर सादर होत असताना पाहत असतो, त्यात निवेदनाला वाव नसतो. शाहीर व झिलकरी, घटना अधोरेखित करीत असतात; परंतु दिग्दर्शकाने मूळ तमाशा लोककलेची चौकट हुषारीने मोडली आहे. खरं सांगायचं, तर दिग्दर्शकाने तमाशा सादरीकरणातला अघळ-पघळपणा काढून टाकून शिस्तबद्ध मूव्हमेंट्स आणि कंपोझिशन्सचा वापर केला आहे.
संगीत भालचंद्र पोटे, प्रकाश सानप व अजित फोंडके तसेच गीते चंदन कांबळे व स्व. संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांची आहेत. वैभव सातपुतेचा राजा नाटकात जान आणतो आणि सरतेशेवटी सावित्री मेधातुल यांच्या धाडसाला दाद ही दिलीच पाहिजे. कोविड काळात लोककलावंतांची जी वाताहात झाली त्यात या नाटकातील जवळपास सर्वांनाच त्याची झळ पोहोचली आहे. त्यात राज्यकर्त्यांनी मदतीच्या नावाने वाजवलेल्या नकारघंटानी नाउमेद न होता, त्यावर मात करण्याच्या धडाडीला सलाम करायलाच हवा. लोकनाट्याच्या दृष्टीने काहीच आलबेल नसलेल्या वातावरणात रंगकर्मी जगत असताना म्हणावं लागतंय “ओक्के हाय एकदम” यासारखा विरोधाभास नाही.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…