
ट्विटद्वारे व्यक्त केला शोक
मुंबई : मुंबईतील गोरेगांवसारख्या गजबजलेल्या ठिकाणी आज पहाटे ३च्या सुमारास आगीची भीषण (Goregaon fire) दुर्घटना घडली. यातील मृतांचा आकडा वाढून ८ वर पोहोचला आहे, तर ५१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ३० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या भीषण आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील काही दुकानेदेखील जळून खाक झाली आहेत. या भीषण आगीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन केंद्र तसेच राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत गोरेगांव आग दुर्घटनेविषयी हळहळ व्यक्त केली. त्यांनी लिहिलं आहे, मुंबईतील गोरेगावमध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांप्रती मला दुःख झालं आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. केंद्र सरकारकडून त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
Pained by the loss of lives due to a fire mishap in Mumbai's Goregaon. Condolences to the bereaved families. I pray that the injured recover soon. Authorities are providing all possible assistance to those affected.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the…
— PMO India (@PMOIndia) October 6, 2023
राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीदेखील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तसंच आपल्या ट्विटमध्ये मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.