Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखक्रिकेटचा महाकुंभमेळा; अर्थव्यवस्थेला गती...

क्रिकेटचा महाकुंभमेळा; अर्थव्यवस्थेला गती…

इंग्लंड हे क्रिकेटचे माहेरघर आहे आणि इंग्रजांनीच आपल्याला क्रिकेट या खेळाची अमूल्य अशी भेट दिली आहे. या विलक्षण खेळाने जणू भारतीयांना झपाटून टाकले आहे, असेच म्हणायला हवे. याचा अर्थ क्रिकेटच्या माहेरघरी जेव्हढे या खेळाचे लाड पुरविले जात नसतील त्याहून कैकपटीने अधिक या क्रिकेटच्या जादूने भारतीयांना मोहात पाडले आहे. मोठ-मोठ्या शहरांबरोबरच गाव-खेड्यांमध्येही या खेळाचे गारूड आपल्याला पाहायला मिळते. मुंबईकरांना कोणत्याही कारणाने म्हणा एखादी सुट्टी मिळाली की लागलीच मैदानांमध्ये अनेक छोटे-मोठे संघ क्रिकेट सामने खेळताना दिसतात. जर एखादा बंद पाळला गेला किंवा आंदोलनामुळे रस्ते मोकळे असतील तर लागलीच तिथे क्रिकेटचा डाव सुरू होतो. अशा जळी – स्थळी क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धा भरवून त्यात रममाण होणाऱ्या आणि आता क्रिकेटचे मुख्य केंद्र बनलेल्या भारतात क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला म्हणजेच एकदिवसीय विश्वचषकाला गुरुवारपासून सुरुवात झाली.

खरं म्हणजे, ट्वेन्टी-२० क्रिकेटची वाढती लोकप्रियता, गेल्या काही काळात कसोटी क्रिकेटला लाभलेली नवसंजीवनी यामुळे एकदिवसीय क्रिकेटचे महत्त्व कमी होत असल्याची भीती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, आजी-माजी खेळाडू आणि काही चाहत्यांमध्ये व्यक्त होत होती. अशा वेळी क्रिकेटवेड्या भारतात विश्वचषक स्पर्धा आयोजित होणे, हे एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरू शकेल. एका बाजूला आशिया चषकावर भारतीय संघाने नाव कोरल्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही भारताचा दबदबा वाढत असतानाच व या स्पर्धा ऐन रंगात आलेल्या असतानाच देशात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होत आहेत. अशा विविध स्पर्धांची रेलचेल सुरू असल्याने यंदा विश्वचषक स्पर्धेबाबत तितकीशी चर्चा झालेली नव्हती. त्यामुळे विश्वचषकासाठीचा माहोल म्हणावा तसा तयार झालेला नाही. मात्र भारतामध्ये क्रिकेट स्पर्धेबाबत चर्चा होण्यासाठी एखादा सामनाही पुरेसा ठरतो. त्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या तुल्यबळ संघांतील पहिला सामना अपेक्षेप्रमाणे चुरशीचा झाला, तर विश्वचषकाबाबत चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता निश्चित वाढेल, हे निश्चित.

विशेष म्हणजे २०११ नंतर प्रथमच भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्यावेळी भारताने सह-यजमानपद भूषवतानाच विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. मात्र, त्यानंतरच्या १२ वर्षांत भारताला ‘आयसीसी’ची केवळ एक (२०१३मध्ये चॅम्पियन्स करंडक) जागतिक स्पर्धा जिंकता आली आहे. २०११मध्ये भारतीय संघ विजयी ठरल्यानंतर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१९मध्ये इंग्लंडने मायदेशात एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. आता यजमान भारताचा संघही या स्पर्धेवर वर्चस्व गाजवणार का आणि गेल्या दशकभरापासूनचा जागतिक जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या २०१९च्या स्पर्धेप्रमाणे यंदाच्या विश्वचषकातही १० संघांचा समावेश असून सर्व संघ एकमेकांविरुद्ध साखळी सामने खेळणार आहेत. साखळी सामन्याअंती गुणतालिकेत अव्वल चार स्थानांवर असणारे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर अंतिम सामनाही अहमदाबाद येथे १९ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच्या सामन्यांत सर्वच संघांमध्ये चुरस असेल हे निश्चित.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय अर्थव्यवस्था सुसाट वाटचाल करत आहे. त्यातच आता आगामी ४६ दिवस भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी चालना देणारे ठरणार आहेत. कारण या ४६ दिवसांत एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपचे सामने रंगणार आहेत व या दिवसांत फार मोठ्या आर्थिक उलाढाली होणार असल्याने जणू पैशांचा पाऊस पडणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर भारतीय खेळपट्ट्यांवर वनडे विश्वचषकाचे आयोजन केले आहे. यावेळी या वर्ल्डकप स्पर्धा फक्त क्रिकेटप्रेमींसाठी मनोरंजनच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देणार आहेत. या तिमाहीत क्रिकेट वर्ल्डकपमुळे फेस्टिव्ह सेलमध्ये लक्षणीय वाढ होईल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. क्रिकेटप्रेमी निवडक वस्तू आणि अनेक सेवांवर मोठा खर्च करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे विकासदर सुमारे ०.१० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तशातच यावेळी वर्ल्डकपसाठी ग्राहकांचा खर्च १८,००० ते २२,००० कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत ७,००० ते ८,००० कोटी रुपयांचे सकल मूल्यवर्धित उत्पन्न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोठे क्रीडा आणि मनोरंजन कार्यक्रमात सामान्यतः ग्राहक खर्चाला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळणार आहे. रोहितची वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून ही पहिलीच वेळ आहे. बाबर आझम पाकिस्तानचे नेतृत्व करेल. अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन बांगलादेशचे कर्णधारपद सांभाळणार आहे. हशमतुल्लाह शाहिदी अफगाणिस्ताची कॅप्टन्सी करेल. दासून शनाका श्रीलंकेला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाची सूत्र पॅट कमिन्स याच्याकडे आहेत.

दक्षिण आफ्रिका टीम टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वात भारतात वर्ल्ड कप खेळेल. न्यूझीलंड गेल्या वेळेस उपविजेता होती. त्यामुळे केन विल्यमसन याचे आपल्या कर्णधारपदात न्यूझीलंडला वर्ल्ड चॅम्पियन करण्याचा प्रयत्न असेल. गतविजेता इंग्लंडसमोर वर्ल्ड कप राखण्याचे आव्हान असेल. हे आव्हान जोस बटलर कसे पेलतो याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल, तर नेदरलँड्स टीम वर्ल्ड कपमध्ये १२ वर्षांनंतर स्कॉट एडवर्ड्स याच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आता या १० संघांपैकी कोणती टीम वर्ल्ड कप उंचावणार हे ४६ व्या दिवशीच स्पष्ट होईल. दरम्यान गेल्या १२ वर्ल्ड कपनंतर यंदा पहिल्यांदाच वेस्ट इंडिज स्पर्धेत नसणार आहे. विंडिजला आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पराभूत व्हावं लागले. तिथेच विंडिजचे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे यंदा निश्चितच क्रिकेट रसिकांना विंडिजची उणीव भासणार इतके निश्चित. एकूणच क्रिकेटवेड्या भारतात महाकुंभमेळ्याचा थरार सुरू झाला असून देशभरातील वातावरण क्रिकेटमय झालेले असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -