कल्याणमध्येही विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत विकास केंद्र विकसित करणार
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) सामाजिक-आर्थिक संरचना मजबूत करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई महानगर प्रदेशात दोन महत्वाची विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) आणि तीन औद्योगिक विकास केंद्रे (इंडस्ट्रियल ग्रोथ सेंटर) विकसित करणार आहे. तसेच कल्याण येथे विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत विकास केंद्र विकसित करणार आहे.
भिवंडी तालुक्यातील भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिके जवळील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी प्रस्तावित खारबाव ग्रोथ सेंटर हे विरार-अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडॉर (MMC) आणि मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (HSR), आणि DFC कॉरिडॉर आदी प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसह गुंतवणूक आकर्षित करणारे केंद्र म्हणून उदयास येत आहे.
अशाच प्रकारे, कल्याण ग्रोथ सेंटर (KGC) हे व्यावसायिक आणि निवासी संकुल, शैक्षणिक संस्था आदींसाठीचे केंद्र म्हणून बहरण्याची अपेक्षा आहे, ज्यासाठी एमएमआरडीए हे विशेष नियोजन प्राधिकरण आहे.
जवळपास पूर्ण झालेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) आणि विरार-अलिबाग मल्टी मोडल कॉरिडॉर (MMC) आणि दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे, अलिबाग तालुक्यातील पोयनाड ग्रोथ सेंटर एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून विकसित होईल यात शंका नाही.
जेएनपीटीसारखे बंदर आणि मुंबईतील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असल्याने स्थानिक क्षेत्रांना नवसंजीवनी, विशेषत: पर्यटन, बांधकाम, रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमध्ये नवीन संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
औद्योगिक विकास केंद्रे
आणगाव IGC, सापे IGC, आणि अंबा IGC त्यांच्या संबंधित सूक्ष्म-क्षेत्रातील आर्थिक वाढीसाठी, रोजगार आणि कनेक्टिवीटी वाढविण्यासाठी आणि औद्योगिक विकासात विशेषत: उत्पादन क्षेत्रात आणि उच्च दर्जाच्या उद्योगात योगदान देणारी ठरतील.
विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत असलेल्या कल्याण ग्रोथ सेंटर, आणि MMRDA चे ठाणे येथील उप-प्रादेशिक कार्यालय या अंतर्गत, कल्याण तालुक्यातील १० गावांचा समावेश असलेल्या सुमारे १०८९ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या टाऊनशिप प्रकल्पांचे नियोजन आहे. ग्रोथ सेंटरच्या या समुहाचे मुंबई महानगर प्रदेशांतर्गत सर्वसमावेशक, शाश्वत आणि मजबूत विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे आर्थिक विकासाला चालना तर मिळेलच, त्याशिवाय मोठ्या समुदायांच्या जगण्याचा दर्जादेखील उंचावेल. हा उपक्रम बहुकेंद्री विकास, विविध क्षेत्रांत नोकरीच्या संधी, परवडणारी घरे आणि मुबलक मोकळ्या जागा असलेल्या एकात्मिक आरोग्य आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या भविष्यासाठी आश्वस्त करतो.
“मुंबई महानगर प्रदेश, महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणारा प्रदेश आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या प्रदेशाचे सुमारे ४ टक्क्यांचे योगदान आहे. मुंबई महानगर प्रदेशाने सन २०२८ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत ०.३५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे योगदान देण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा उपक्रम पर्यावरणीय जागरुकतेसह आपल्याला उत्कृष्ट संधी आणि पायाभूत सुविधांनी समृद्ध भविष्याकडे नेण्यासाठी सज्ज होतोय. या प्रदेशातील प्रस्तावित विकास केंद्रांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला शासनाने औपचारिक मान्यता दिल्यानंतर, निवडलेल्या प्रदेशांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर विकास केंद्रे विकसित करताना आम्हाला आनंद होईल.” असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी सांगितले.
विकासात्मक प्रगतीच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल पर्यावरणीय शाश्वततेशी सुसंगत संरेखित आहे याची खात्री करून, पर्यावरणीय सजगतेसह पुढे जाण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वचनबद्ध आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra