स्ट्रेट ड्राइव्ह: ज्योत्स्ना कोट-बाबडे
क्रिकेटचा महाकुंभमेळा किंवा लोकसभा निवडणूक म्हणा हवे तर… अर्थात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा थरार गुरुवारपासून भारत भूमीवर रंगणार आहे. त्यामुळे कॅरेबियन बेटापासून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह जगाच्या कानाकोपऱ्यांत वर्ल्ड कपचा फिव्हर चढला आहे. क्रीडा वाहिन्यांवर स्पर्धेच्या जाहिरातींचा भडीमार होत आहे. सध्या सुरू असलेले सराव सामनेही आवर्जून पाहिले जात आहेत. खेळाडू, संघांबाबत चर्चा रंगत आहेत. त्यामुळे वर्ल्डकपची हवा चांगलीच तापली आहे. आजी-माजी दिग्गजांनी अमुक तमुक खेळाडू, संघ यांना प्रबळ दावेदार असल्याचे सांगून त्या संघ आणि खेळाडूंवर दबाव टाकून मैदानाबाहेरच्या ‘माइंड गेम’ने जोर पकडला आहे. यात खासकरून पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, इंडिया हे संघ दोन्ही बाजूंनी आघाडीवर आहेत. स्पर्धेआधीचा दबावाचा खेळ चांगलाच रंगात आला आहे. या खेळात तगड्या, फॉर्मात असलेल्या खेळाडूंना स्पर्धक संघाकडून जाणीवपूर्वक टार्गेट करून त्यांच्यावर दडपण आणले जात आहे. जेणेकरून ते खेळाडू दबावात येऊन कच खातील. इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या संघांना जाणकारांकडून प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे याच संघातील खेळाडू खासकरून रडारवर आहेत. अलीकडच्या वर्षांत हे नित्याचेच झालेले असल्याने यावर उपाय म्हणून या खेळाडूंना मीडिया, टीव्हीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात असल्याचे ऐकिवात येते.
नुकतेच एका प्रतिष्ठित टीव्ही चॅनलने विश्वचषकात १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान उपांत्य फेरीचे पूर्वावलोकन केले होते. त्यादरम्यान चाहत्यांच्या प्रतिक्रिया ऐकून जाणवले की, भारतीय संघ हरण्याची शक्यता स्टुडिओत उपस्थित असलेल्या कोणालाही मान्य करायची नव्हती. जेव्हा श्रोत्यांमधील एकाने असे म्हटले की, भारत हरला तर काय, “आयुष्य थोडी थांबणार आहे ते तर चालूच राहील!” त्यावर “नो, नो, नो!” असा मोठा आवाज श्रोत्यांमधून आला. तेव्हा माझ्याही मनाला स्पर्शून गेले ‘हरणे’ हा शब्द मुळात मुखातून काढायचाय कशाला. आपण जिंकणारच असेच म्हणायला हवे ना! सर्वसाधारणपणे प्रत्येक संघाच्या चाहत्यांची प्रतिक्रिया अशीच असते. इतकेच काय भारतीय संघच जेतेपदाचा योग्य दावेदार आहे हा विश्वास आणि तो अजिंक्य आहे ही धारणा भारतीय माध्यमांमध्येही दिसून येते. पण हे ‘अपेक्षांचे ओझे’ केवळ भारतीय खेळाडूंनाच लागू होत नाही. जितके खेळाडू, संघ या विश्वचषकात सामील होत आहेत, त्या त्या खेळाडू अन् संघांना आपापल्या देशवासीयांच्या तितक्याच अपेक्षांचे ओझे, दडपण घेऊन खेळायचे आहे.
त्यातही गंमत अशी की, काही असेही लोक या खेळाडूंना सल्ला देत असतात ज्यांनी कधी स्वतः खेळ खेळलेला नसतो. खरे तर आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारचा खेळ खेळला नसल्यामुळे, आपण खेळाच्या स्वरूपाबद्दल म्हणजेच जिंकणे-हरणे यातील अनिश्चितता व खेळाडूंंवरील दबाव याबद्द्ल अनभिज्ञ असतो. त्यामुळे कदाचित आपल्याला माहीत नसते की, आपणा सर्वांचा “आपणच जिंकायला हवे” हा अतिरेक खेळाडूंना कोणत्या प्रकारे त्रासदायक ठरत असेल. अपेक्षांचे हे जड ओझे पेलणारे सारे खेळाडू त्यातही तो भारतीय क्रिकेटपटू म्हणून कमालीचा दबाव असतो.
क्रिकेट म्हणजे जीव की प्राण समजणाऱ्या चाहत्यांकडून आपापल्या संघावर अपेक्षांचे ओझे आहे. आपलाच देश यंदा विश्वविजेता व्हावा असा त्यांचा मनोदय आहे. भारताने पाकिस्तानला धूळ चारावी आणि विजेतेपदाला गवसणी घालावी ही कायम तमाम भारतीय चाहत्यांची अपेक्षा असते. पाकिस्तानी फॅन्सही आपल्या देशाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. इंग्लंडच्या चाहत्यांना गतविजयाच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडचे क्रिकेटरसिक यंदा तरी देवा आम्हाला पावशील का? अशी साद घालत आहेत. पाकिस्तानने १९९२ नंतर आणि श्रीलंकेने १९९६ नंतरची कोंडी यंदा फोडावी असे त्यांच्या चाहत्यांना वाटते. यंदा ऑसींचा पत्ता सर व्हावा ही ऑस्ट्रेलियन चाहत्यांची मनीषा. असे सारेच जण आपापल्या संघांच्या विजयासाठी देव पाण्यात ठेवून आहेत. अन् हे एवढे जड अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन १० संघ जेतेपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत.
चांगले खेळाडू असण्याबरोबरच हा दबाव झुगारण्याची मानसिकताही या खेळाडूंना बाळगावी लागेल. त्यात त्यांचा कस लागणार आहे. ज्या संघाला त्यात यश येईल तोच मैदान मारेल. पण त्या आधी ‘Give me Freedome’ अशी आर्त हाक या खेळाडूंकडून मारली जाईल. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, त्यातही विश्वचषकाचे सामने खेळाडूंसाठी सर्वात कठीण परीक्षेचे असतात. धैर्य, मनाची ताकद यावेळी त्यांच्या कामी येते. हजारो लोक तुमच्या नावाचा जयजयकार करत असताना आम्ही क्रिकेट स्टेडियमच्या मधोमध अपेक्षापूर्ती करताना काय मानसिक दबाव ते झेलत असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्यात हरल्यावर ‘ये लोग पैसे के लिए कुछ भी कर सकते हैं’ असे जेव्हा त्यांचे चाहतेच म्हणतात तेव्हा काय बरे वाटत असेल त्यांना? कारण प्रत्येक देशाचा खेळाडू हा चषक जिंकण्यासाठीच खेळणार आहे. फक्त आपण चाहत्यांनी अपेक्षांचे ओझे जरासे हलके करून त्यांना थोडे स्वातंत्र्य देऊ या. कारण भारताचीच काय तर सहभागी सर्व देशांची विश्वचषकातील कामगिरी या सर्व बाजूंच्या अपेक्षांच्या दबावाला ते कसे सामोरे जातात यावर अवलंबून असेल.
jyotsnakotb@gmail. com