गुरूंमुळे आपले आयुष्य सोपे होऊ शकते. अशाच एक गुरू भारतीताई या अनेक वर्षे अनेकांना भगवद्गीता अतिशय सोप्या भाषेतून सांगत, माणसाने आयुष्यात कसे वागायला हवे, हे शिकवत आहेत.
आपल्या अध्यात्मिक प्रवासात आपण एकटेच असतो. जीवनाच्या प्रवासात अनेकदा आपल्यावर कठीण प्रसंग येतात, तेव्हा आपल्याला कुणाचा तरी आधार, मार्गदर्शन हवे असते. दिशादर्शक गुरूंमुळे आपले आयुष्य सोपे होऊ शकते. कठीण परिस्थितीत मार्गदर्शन करणारे असे अनेक गुरू कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात.
भारतीताई पोळ यांनी अनेक वर्षे अनेकांना भगवद्गीता शिकवली, असे मला कळले होते. काळाच्या प्रसंगांनी मला भगवद्गगीता शिकण्याची इच्छा होऊ लागली व मी ही त्यात स्वेच्छेने ओढली गेले आणि आमचा गुरू-शिष्याचा प्रवास सुरू झाला. सामाजिक प्रबोधनासाठी भारतीताई हे काम विनामूल्य करीत आहेत. मी भारतीताईंचा भगवद्गीतेचा क्लास अंदाजे दीड वर्षे या कालावधीत पूर्ण केला. भगवद्गीतेतील अध्याय, त्यांची निरूपणं, अर्थ-विश्लेषण, श्लोक-वाचन यात आम्हा विद्यार्थिनींचे मन गुंतून जात असे.
दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांकडे साक्षेप भावनेने पहाणे, षडरिपूंवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, सुखदुःखांकडे तटस्थपणे पाहता येणे या सर्व गोष्टी भारतीताई भगवद्गीतेच्या माध्यमातून अतिशय सोप्या, सुलभ भाषेतून, विविध उदाहरणांतून सर्वांसमोर स्पष्ट करतात. माणसाने आयुष्यात कसे वागायला हवे हे त्यातून समजते.
भारतीताईंशी बातचीत करताना विविध गोष्टींचा सुंदर पद्धतीने उलगडा झाला. भारतीताईंना सुरुवातीला भगवद्गीतेचे मार्गदर्शन केले ते त्यांच्या गुरू ज्योत्स्नाताई गंधे यांनी. तेव्हा रविवारी ज्योत्स्नाताई कौटुंबिक गीता क्लास घ्यायच्या. त्यात त्यांनी भारतीताईंना समाविष्टं करून घेतलं. मग श्लोक वाचन, अर्थ असा अभ्यास सुरू झाला. ज्योत्स्नाताई आपल्या मधुर आवाजात भगवद्गीतेच्या दोन-दोन श्लोकांचं पूर्ण उच्चारण करण्याचा ऑडिओ भारतीताईंना पाठवितात व भारतीताई आपल्या विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवून झाल्यावर हा ऑडिओ प्रसारित करतात. त्या सर्व सरावाने विद्यार्थी हळूहळू भगवद्गीता आत्मसात करू लागतात. भारतीताई सांगतात, “मी एक अतिशय सामान्य गृहिणी. गीतेच्या माध्यमातून मी खूप काही शिकले, ते सर्वांना सांगू इच्छिते. जीवनात आहार, विहार, विश्राम, विकार, विचार आणि विवेक ही सहा तत्त्व सांभाळा. प्रामाणिकपणे या जगात आपला आवाका ओळखून पुढे पाऊल टाका. अध्यात्माच्या मार्गाने जगात कसं वागायचं, आहे त्या परिस्थितीत राहून आपलं जीवन अधिक शहाणपणानं कसं जगावं हे शिकता येते. भक्ती आणि योगाभ्यासाचा आश्रय घेऊन कृतार्थ जीवन जगण्याच्या पद्धती भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत जे सिद्धांत सांगितले आहेत, ते आपल्या जीवनात उतरवण्याच्या काही सोप्या पद्धती सुद्धा सांगितल्या आहेत. या सिद्धांताच्या अभ्यासाने आपले आजचे पळापळीचे, धकाधकीचे, ताण-तणावाचे जीवन आपण जास्त आनंदी व स्थिर करू शकतो. यातून आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो.”
भारतीताई सांगतात की, “आपल्या आजूबाजूची माणसं, प्रसंग, परिस्थिती तीच राहणार आहे, पण जर आपण बदलायला तयार आहोत, तर परमात्मा आपल्याला मदत करायला तयार आहे. याची गीता आपल्याला ओळख करून देते.” भारतीताईंच्या सोप्या, ओघवत्या भाषेतील भगवद्गीतेच्या निरूपणांची प्रचिती त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना आली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात कशा प्रकारे सकारात्मक बदल झाला हे त्यांचे विद्यार्थी त्यांना कळवितात. भारतीताईंचा आध्यात्मिक प्रवास खरं तरं वयाच्या अठराव्या वर्षी सुरू झाला, फक्त अभिव्यक्ती वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी एका दु:खद आघाताने दृष्टीस पडली. त्याच वेळी भारतीताईंना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला; परंतु त्यांना ऑपरेशन करून घ्यायचे नव्हते, तेव्हा भारतीताईंना आत्मविश्वासपूर्ण उभे राहण्यासाठी हात दिले ते ज्योत्स्नाताई गंधे यांनी. ते कधीही न सोडण्यासाठी. दासबोध, ज्ञानेश्वरी, रामचरितमानस अशा इतर महान ग्रंथातूनही त्यांचे व त्यांच्या सहकारी मैत्रिणींचे सामाजिक प्रबोधनाचे कार्य चालू आहे. भगवद्गीतेचे कार्य भारतीताईंच्या शब्दांत सांगायचे, तर “भगवद्गीता संस्कृतमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली देववाणी आहे. ज्ञानयोग, सांख्ययोग, कर्मयोग व भक्तियोग यांचे विवेचन आहे. यातील ज्ञानयोग व कर्मयोग त्यांनी एका उदाहरणाने स्पष्ट केलं आहे. शिक्षणात पारंगत होण्यासाठी त्यातले मर्म व वर्म बारकाईने समजावून घेणे हा ज्ञानयोग. असलेल्या अभ्यासाची उत्तम रीतीने तयारी करून, त्याची चिंता न करता आपल्या निष्ठा व कर्मावर सोडून देणे हा कर्मयोग. कर्मयोगामध्ये कर्मापासून समाजाला आदर्श मिळतो. बाबा आमटे, ए. पी. जे. अब्दुल कलाम, पांडुरंगशास्री आठवले यांनी तर कर्मातच आनंद मानला.
कर्मावर निष्ठा ठेवा व फळाची अपेक्षा करू नका असे भगवद्गीता सांगते. राग, द्वेष, काम, क्रोध यांची संगत टाळा. सेवा, कर्म करा. तेव्हा कोमल दयाभाव ठेवा. कोविडच्या काळात या रूपाने कर्मयोग आपल्या सगळ्यांमध्ये उतरलेला होता. भगवद्गीता ही जाती-धर्माच्या पलीकडील आहे. त्यातून मिळणारी शांतता व भव्यता अतुलनीय आहे. ताण-तणावांमध्ये संयमाचे महत्त्व ही काळाची गरज आहे. कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे हेही गीतेमधूनच शिकायला मिळते. आत्म्याची अखंडता, अमरत्व, देहाची नश्वरता, स्वधर्माची अपरिहार्यता ही सत्ये गीता प्रखरतेने दाखवून देते. कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका हे सांगताना कामही उत्कृष्ट झाले पाहिजे हे गीता सांगते.
भारतीताई गीतेच्या माध्यमातून सांगतात, “स्वत:च्या आयुष्यातील काही समस्यांकडे साक्षी भावनेने बघणे जमलेच पाहिजे, नाहीतर यशा-अपयशाची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते व मानसिक तणावांना सामोरे जावे लागते. कोणत्याही वयात त्या त्या वयातील समोर येणाऱ्या समस्येवर उत्तर हे भगवद्गीतेत मिळतच. भगवान श्रीकृष्णांची थोर शिकवण व ते ऐकणारा भक्त अर्जुन यामध्ये अत्यंत समरस झालाय. अर्जुन त्याचे क्षत्रियाचे कर्तव्य टाळू पाहत होता. गीतेची या मोहावरच पहिली गदा आहे. तो मोह व ती आसक्ती दूर करणे हे गीतेचे मुख्य काम आहे. अर्जुन भगवंताला शरण गेला व मनातले विचार त्याने मोकळेपणाने मांडले.”
परमेश्वरावर श्रद्धा ठेवून काया, वाचा, मन, ज्यासाठी आपल्याला अहोरात्र झगडावे लागते, त्यासाठी नामस्मरण अतिशय आवश्यक आहे. सगळ्या संतांनी हेच सांगितले आहे. भारतीताई आपल्या निरूपणात अनेक छोटे-छोटे प्रसंग सांगतात, त्या प्रसंगातून एक निर्भयता येते, जर तुम्ही खरे असाल, तर जीवनातील प्रसंगांना निर्भयतेने सामोरे जा.
भारतीताई सांगतात की, “जोपर्यंत सदगुरूंची इच्छा आहे, तोपर्यंत माझे काम अखंड चालू राहणार आहे.” भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायातील शेवटचा श्लोक –
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:|
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||
जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत व जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथेच श्री विजय, विभूती व अचल नीती आहे, असे माझे मत आहे.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यू. के.चे पंतप्रधान ऋषी सुनक, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती ओबामा तसेच जपानचे माजी पंतप्रधान सिंझो आबे यांना वेगवेगळ्या प्रसंगात भगवद्गीता प्रदान केली. मनुष्यजातीसाठी ही सर्वोत्तम अनमोल भेट आहे. भारतीताई या माध्यमातून अनेक व्यक्तींना मार्गदर्शन करीत आहेत.
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…