स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानवाद्याच्या हत्येनंतर भारत-कॅनडा यांच्यात संबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचे सांगून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने निज्जर हत्येप्रकरणी झालेले आरोप फेटाळून लावले, पण कॅनडाचे पंतप्रधान आपली भूमिका बदलण्यास तयार नाहीत.
भारत-कॅनडा यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असल्याने दोन्ही देशांतील व्यापार-उद्योग व देवाण-घेवाणीवर परिणाम होऊ शकतो. काही भारतीय कंपन्या कॅनडातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा तसेच जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्या वातावरण शांत होण्याची वाट पाहात आहेत. कॅनडात अनेक भारतीय कंपन्या कार्यरत आहेत. टीसीएस, इन्फोसेस, विप्रो अशी नावे सांगता येतील. जवळपास तीस भारतीय कंपन्यांनी कोट्यवधींची गुंतवणूक कॅनडात केली आहे. याशिवाय भारतातून कॅनडाला कपडे, औषधे, ऑरगॅनिक रसायने, लोखंड, पोलाद, वैमानिक उपकरणे निर्यात होत असतात. दोन्ही देशांचा आयात-निर्यात व्यापार जवळपास समान आहे. गेल्या वर्षी भारताने कॅनडाला ३४ हजार कोटींचे सामान निर्यात केले, तर भारताने कॅनडाकडून ३५ हजार कोटींची सामग्री आयात केली.
कॅनडाकडून भारताला मसूर डाळ मोठ्या प्रमाणावर येत असते. भारत हा मसूर डाळीचा मोठा आयातदार आहे. मागणीच्या मानाने भारतात मसूर डाळीचे उत्पादन कमी होते. साधारणत: कॅनडाकडून भारत ६ लाख टन मसूर डाळीची आयात करतो. संबंध बिघडल्याने मसूर डाळीचे भाव भडकण्याची शक्यता आहे. भारत सरकारने रशियातून मसूर डाळ आयात करायला दोन वर्षांपूर्वीच परवानगी दिली आहे. स्वस्त दरात अन्य कोणत्या देशांतून डाळ आयात करता येईल, याची सध्या चाचपणी चालू आहे.
कॅनडामध्ये झालेल्या ताज्या जनगणनेत एकूण लोकसंख्येच्या २.१ टक्के शीख समुदाय तिथे वास्तव्याला आहे. कॅनडात राहणाऱ्या शिखांची संख्या ८ लाख असावी. कॅनडात हा चौथ्या क्रमांकाचा हा समुदाय आहे. रोजगार व उद्योगासाठी शीख कॅनडात आले व त्याची आता निर्णायक व्होट बँक बनली आहे. लिबरल पार्टीने शिखांना कॅनडात राहण्यासाठी अनेक नियम शिथिल केले. कॅनडात टोरांटो, ओटावा, वॉटरलू, ब्रैम्टन इथे भारतीय लोक मोठ्या संख्येने राहात आहेत. कॅनडात शीख समाजाचे १५ संसदेत प्रतिनिधी (खासदार) आहेत. जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारमध्ये शीख समाजाचे मंत्रीही आहेत. २०१६ मध्ये ४ शीख मंत्री होते. २०१८ नंतर कॅनडात शिक्षणासाठी येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत राहिले. भारतातून विशेषत: पंजाबमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी कॅनडात शिक्षणासाठी येत आहेत. कॅनडाची अर्थव्यवस्था समृद्ध करण्यात तेथील शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना दीर्घकाळासाठी भारताशी पंगा घेणे हे कॅनडाला परवडणारे नाही. त्याचा परिणाम तेथील अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. गेल्या दोन दशकांत अन्य देशांतून कॅनडामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढली. या घडीला ४ लाख २० हजार विदेशी विद्यार्थी कॅनडात शिकत आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणी भारताच्या विरोधात का भूमिका मांडत आहे, ते एवढे का आक्रमक झाले आहेत, हा कळीचा मुद्दा आहे. त्यांनी खलिस्तानवाद्यांची पाठराखण करण्याची जी भूमिका घेतली आहे, त्यामुळेच भारताची नाराजी त्यांनी अंगावर ओढवून घेतली. ते भारतात जी-२० परिषदेसाठी आले होते, त्यांच्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राखीव असलेला प्रेसिडेंशिअल सूट त्यांनी नाकारला व नेहमीच्या खोलीत राहणे पंसत केले. हे सुद्धा एक गूढ होते. त्यांना भारत भेटीत विशेष महत्त्व मिळाले नाही. कॅनडात महागाई प्रचंड वाढली आहे. तसेच कॅनडाची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशने वाटचाल करीत आहे. त्यांच्या लिबरल पार्टीच्या विरोधात त्या देशात अँटी इन्कबन्सी लाट असल्याचे बोलले जात आहे.
निज्जर हत्येप्रकरणात भारताचा हात आहे, असा गुप्तचर खात्याचा अहवाल अमेरिकेनेच कॅनडाला दिल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केले. ते जर वृत्त खरे असेल, तर भारताला हा विषय अधिक गांभीर्याने घ्यावा लागेल. कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड अशा पाच देशात फाइव्ह आईज इंटेलिजन्स असा जो समझोता झाला आहे, त्यानुसार हे देश एकमेकांना मिळालेल्या माहितीची देवाण-घेवाण करीत असतात. निज्जर हत्या प्रकरणात चौकशीच्या कामात भारताने कॅनडाला सहकार्य करावे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
निज्जरची हत्या झाल्यावर देशातील खलिस्तानवादी, गँगस्टर्स, दहशतवादी व फुटीरतावादी यांच्याविरोधात एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी)ने भारतभर मोहीमच सुरू केली. एनआयएने शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत पन्नू याची अमृतसर व चंदिगडमधील मालमत्ता जप्त केली. भरसिंगपुरा येथील घरावर नोटीस चिकटवली. पंजाब पोलिसांनी गँगस्टर गोल्डी बराडला पकडण्यासाठी मोहीम उघडली आहे. स्पेशल ऑपरेशन टीमने एकाच दिवशी ११५९ छापे मारले. गुरपतवंत पन्नूचे चंदिगड सेक्टर १५ मधील घर पोलिसांनी जप्त केले. अमृतसरमधील शेतीही जप्त केली. पन्नू सध्या अमेरिकेत राहतो. याच पन्नूने २५ सप्टेंबरला व्हँकूवर, ओटावा व टोरांटो येथील भारतीय दूतावास बंद करावेत, अशी धमकी दिली होती. तसेच शीख फॉर जस्टिसने डेथ ऑफ इंडिया अशी मोहीम चालविणार असल्याची घोषणा केली होती. पन्नू म्हणतो, “कॅनडाची भूमी खलिस्तानवाद्यांसाठी आहे. खलिस्तानी नेहमी कॅनडाबरोबर राहिले आहेत. हिंदूंचा देश भारत आहे. त्यांना कॅनडात राहायचे असेल, तर त्यांना धर्म बदलावा लागेल…”
खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख म्हणून वावरणारा निज्जर हा भारतातून १९९७ मध्ये कॅनडाला पळून गेला. आपण सामाजिक संघटनेशी संबंधित आहोत, असे सांगून त्यांने कॅनडात आश्रय मागितला. कॅनडा सरकारने त्याचा अर्ज सुरुवातीला फेटाळला, पण नंतर त्याला नागरिकत्व मिळाले. नोव्हेंबर २०१४ मध्येच निज्जर विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्यावर भारतात डझनभर फौजदारी गुन्हे नोंदवलेले होते. भारतात त्याचा दहशतवादी कारवायांत सहभाग होता, असा सविस्तर अहवाल भारताने कॅनडा सरकारला दिला होता. पण तेथील सरकारने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. कॅनडा सरकारने हरदीप सिंह निज्जरचे नाव नो फ्लाय लिस्टमध्ये नोंदवले. पण यापलीकडे काही केले नाही.
गेल्या ५ वर्षांत कॅनडाने कोणत्याही दहशतवाद्यावर कारवाई केलेली नाही. १३ खतरनाक दहशतवादी कॅनडात मोकाट आहेत. भारताने खलिस्तानवादी – दहशतवादी यांच्यावर कारवाई करावी, असे किमान २० वेळा तरी कॅनडाला आवाहन केले असावे. पण कॅनडाने प्रतिसाद दिला नाही.
निज्जर हत्या प्रकरणी कॅनडाकडे भारताच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. ४५ वर्षांच्या निज्जरची हत्या १८ जून रोजी झाली. साडे तीन महिने उलटले तरी कॅनडाच्या चौकशी यंत्रणांना यश लाभलेले नाही. भारतातील ४० टॉप दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव होते. विशेष म्हणजे निज्जर हा गुरुनानक शीख गुरुद्वाराचा अध्यक्ष होता. त्याचे गाव जालंदरमधील भरतसिंहपूर. त्याला हुडकून काढण्यासाठी भारत सरकारने १० लाखांचे इनाम घोषित केले होते. एनआयएने त्याला २०२२ मध्ये फरार म्हणून घोषित केले.
भारत व कॅनडा हे दोन्ही लोकशाही देश आहेत. पण त्या देशात दहशतवाद्यांना संरक्षण का दिले जाते हे आकलनापलीकडचे आहे. व्होट बँक म्हणून शिखांविषयी राजकीय सहानुभूती असेल, पण खलिस्तानवाद्यांना तेथील सरकार का पाठबळ देत आहे, हे समजत नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर मोठ्या संख्यने शीख कॅनडाला गेले व नंतर ओघ चालूच राहिला. टोरांटो व अन्य शहरातील गुरुद्वारांवर खलिस्तानची मागणी करणारे फलक उघडपणे झळकतात पण तेथे पोलीस प्रशासन कोणीही दखल घेत नाही, अशाने दहशतवाद्यांची हिम्मत वाढते. त्यातूनच भारत व कॅनडा यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे.
[email protected]
[email protected]