शटडाऊनची आजपासून सुरुवात?
न्यूयॉर्क : महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये शटडाऊनचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. दरम्यान जो बायडेन यांच्या सरकारला ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती मुदत आता संपली सल्याने १ ऑक्टोबरपासून अमेरिका बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या शटडाऊनच्या काळामध्ये सर्व प्रकारची सरकारी कामे ठप्प होण्याची शक्यता आहे.
सध्या अमेरिकेत निवडणुकांचे वार वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक प्रकारची राजकीय खलबते देखील होत असल्याचे चित्र सध्या अमेरिकेमध्ये आहे. त्यातच अमेरिकेतील सरकारला निधी देणारे फेडरल आर्थिक वर्ष हे ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे याआधी सरकारला निधीची मंजुरी मिळवण्यासाठी विरोधकांची संमती घ्यावी लागेल. पण जर विरोधकांनी या निधी योजनेला संमती दिली नाही तर मात्र १ ऑक्टोबरपासून अमेरिका शटडाऊन होऊ शकते. यामुळे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत मोठं आर्थिक संकट उभं राहण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील सरकार हे आपल्या महत्त्वाच्या योजना राबवण्यासाठी आवश्यक असणारा निधी हा कर्जाच्या स्वरुपात घेत असते. पण ही निधी कर्जाच्या स्वरुपात घेण्यासाठी त्यांना संसंदेची म्हणजेच अमेरिकेतील काँग्रेसची मंजुरी आवश्यक असते. दरम्यान यंदाच्या आर्थिक वर्षात अमेरिकेच्या आर्थिक गणितात २ लाख कोटी डॉलरची तफावत आली आहे. ही खूप मोठी महसूल तूट असल्याचे सांगण्यात येत आहे. ही तफावत म्हणजेच सरकारची कमाई आणि खर्चात आलेली तफावत आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत ही तफावत मोठी असल्याचेही सांगण्यात येत आहे.
यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की सरकारच्या कमाईपेक्षा सरकारचा खर्च अधिक होत असल्याचे यामधून स्पष्ट झाले आहे. त्यातच इतकी तूट ही कोरोना पूर्व काळात देखील आली नव्हती. तसेच त्या काळात जी महसूल होता, तोच मागील तीन वर्षांमध्ये कायम ठेवण्यात अमेरिकेच्या सरकारला यश आलं होतं. पण यंदाच्या वर्षात मात्र ही तूट जाणवली. यामुळे सरकारला कर्जावर अतिरिक्त व्याज द्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारची आर्थिक गती मंदावली असून हे संकट ओढावल्याचं सांगण्यात येत आहे.