सर्वोच्च न्यायालयाने दिली पुढची तारीख
नवी दिल्ली : राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णयाची सूचना करताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी ठेवली होती. आता सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी ६ तारखेला सुनिश्चित केली आहे.
शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेबाबत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टान यावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय घेण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. याबद्दल ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवेसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानंतर आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग आला. यावेळी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावणीचा रोडमॅप सादर करण्यासाठी २ आठवड्यांचा वेळ दिला होता. तसेच सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी सुनावणी निश्चित केली होती. परंतु, आता ही सुनावणी ३ ऐवजी ६ ऑक्टोबरला घेतली जाणार आहे.