
५ कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू... त्यामुळे आधीच घेणार खबरदारी
नवी दिल्ली : साल २०२० मध्ये कोरोना (Cororna Virus) महामारीमुळे अख्खं जग थांबलं होतं. कोविड-१९ (Covid-19) या भयंकर व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. लॉकडाऊन मध्ये अनेकांनी आपल्या नोकऱ्यादेखील गमावल्या. सध्या कोरोनावर प्रभावी अशी लस आपल्याकडे उपलब्ध असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. या धक्क्यातून जग सावरत असतानाच एका नवीन व्हायरसमुळे पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी वर्तवली. किंबहुना या व्हायरसमुळे कोरोनापेक्षाही सात पटीने अधिक महाभयंकर परिस्थिती उद्भवू शकते असा दावा त्यांनी केला.
युके वॅक्सीन टास्कफोर्सचे अध्यक्ष डेम केंट बिंघम आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार या व्हायरसमुळे ५ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या व्हायरसचं नाव 'डिसीज एक्स' (Disease X) असं आहे. या नवीन विषाणूचा प्रभाव १९१८-१९२०च्या विनाशकारी स्पॅनिश फ्लूसारखा असू शकतो, असा दावाही करण्यात आला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या वैद्यकीय तज्ज्ञांनीदेखील भविष्यातील महामारीचं कारण ठरु शकणाऱ्या या आजाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
यूकेच्या लस टास्क फोर्सचे अध्यक्ष असलेल्या डेम केट बिंघम यांनी सांगितलं की, शास्त्रज्ञांचं पथक विविध २५ विषाणूंचं निरीक्षण करीत आहेत, त्यापैकी प्रत्येकामध्ये हजारो वैयक्तिक व्हायरस आहेत. यापैकी कोणताही विषाणू गंभीर महामारीमध्ये बदलू शकतो. 'डिसीज एक्स' हा भविष्यात पसरणारा धोकादायक आजार ठरू शकतो. अद्याप या आजाराचा एकही रुग्ण अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, हा आजार नेमक्या कोणत्या विषाणूमुळे पसरेल, हे ही अजून स्पष्ट नाही. त्यामुळे, सध्या वैज्ञानिक रोगाच्या एक पाऊल पुढे जात डिसीज एक्स रोग पसरण्यापूर्वीच त्याचा विषाणू शोधून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करत आहेत.
डिसीज एक्स रोगाची लस तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न
युकेच्या शास्त्रज्ञांनी 'डिसीज एक्स' हा रोग टाळण्यासाठी लस तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. विल्टशायर येथील उच्च-सुरक्षा असलेल्या पोर्टन डाउन प्रयोगशाळेत युकेचे शास्त्रज्ञ डिसीज एक्स रोगावरील लस तयार करण्याचं काम करत आहेत. २०० हून अधिक शास्त्रज्ञांचं पथक लस बनवण्याच्या कामात गुंतलेलं आहे. दरम्यान, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे (UKHS) प्रमुख प्रोफेसर डेम जेनी हॅरी यांनी सांगितलं की, हवामान बदल आणि लोकसंख्येतील बदल यासारख्या घटकांमुळे भविष्यात साथीच्या रोगांची शक्यता वाढत आहे.