Share

विशेष: डॉ. मिलिंद दामले

सिनेमाच्या पडद्यावर जो कोणी एकदा अवतीर्ण झाला की, त्याला आपोआपच अमरत्व प्राप्त होते! सिनेमेच्या उण्यापुऱ्या १३० वर्षांच्या इतिहासात असे कित्येक जण असतील ज्यांना हे चंदेरी चिरंजीवितेच वरदान प्राप्त झालेलं असेल; परंतु त्यांच्यात असे काही मोजकेच तारे असतील, जे इहलोकीची यात्रा संपवून परलोकातील रसिकांचे मनोरंजन करण्याकरिता गेले असले तरी त्यांचं या पृथ्वीतलावरचं अमरत्व आणि कवित्वही अबाधित आहे. २६ सप्टेंबर १९२३ रोजी जन्माला आलेल्या, धरमदेव पिशोरीमल आनंद हे मूळ नाव असलेल्या आणि त्यातलं फक्त ‘देव आणि आनंद’ इतकच घेऊन पडद्यावर पदार्पण केलेल्या, त्या तरुणाचा म्हणजेच ‘देव साहेबांचा’ जन्मशताब्दी उत्सव खरंतर २६ सप्टेंबर २०२३ च्या तीन दिवस आधीच सुरू होत आहे. २३ आणि २४ सप्टेंबरला संपूर्ण देशभरातल्या ३० शहरांमध्ये देव साहेबांच्या चित्रपटांचे खेळ या निमित्ताने आयोजित केले गेले आहेत. देव साहेबांच्या चाहत्यांकरिता हे वर्ष म्हणजे एक मोठा उत्सव असणार आहे.

१९४६ साली ‘प्रभात फिल्म कंपनी’पासून सुरू झालेला देव साहेबांचा चित्रपट प्रवास हा अखंडित २०११ पर्यंत सुरू होता, विशेषतः १९४९ सालानंतर, म्हणजेच नवकेतनच्या स्थापनेनंतर त्यांची चित्रपट निर्मिती निरंतर सुरू राहिली अगदी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत. ‘चिरतरुण’ हे विशेषण सार्थ ठरवणारा हा चॉकलेट हिरो म्हणजेच देव आनंद, आपले लाडके देव साहेब! देव साहेबांना मी कधीच तो देव आनंद असं म्हटलं नाही, कारण माहिती नाही! पण ते नेहमीच मला ‘एक मोठा माणूस’ वाटत आले. मी मोठा होत असताना आमचं सिनेविश्व बच्चन साहेबांनी व्यापलेलं होतं, त्यामुळे देव साहेबांशी तशी जवळीक नव्हती. तरीही नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की केशवजी नाईकांच्या दोन चाळींच्या मध्ये सुमारे पंधरा वर्षांनंतर दाखवल्या गेलेल्या ‘जॉनी मेरा नाम’ची पब्लिकवरची जादू मी अनुभवली होती. तसा अमरजीतच्या ‘गॅम्बलर’मधला मोठी मिशी लावलेला देव साहेबांचा ‘राजा’ मला फारसा भावला नव्हता, पण तो अनुभव छोट्या पडद्यावरचा होता. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मेन थिएटरमध्ये जेव्हा २००१ साली ‘गाईड’ बघितला, तेव्हा हा ‘दिशादर्शक’ चित्रपट का आहे ते उलगडायला हळूहळू सुरुवात झाली.

देव साहेबांची माझी खरी जवळीक झाली ती मी गोल्डी साहेबांच्या गाण्यावरती संशोधन करायला सुरुवात केल्यानंतर. ती ओळख दिवसेंदिवस वाढतच गेली त्याचं कारण म्हणजे संशोधनच्या आनुषंगाने घेतलेल्या प्रत्येक मुलाखतीमध्ये काही ना काही कारणाने विषय देव साहेबांच्याकडे अगदी साहजिक वळत असे. अनेक मोठ्या माणसांच्या अनुभवातून, बोलण्यातून आणि नजरेतून एक नट, निर्माता, दिग्दर्शक म्हणून देव साहेबांकडे अगदी अलीकडच्या काळात बारकाईने बघायची संधी मला लाभली.

एक दिवस सकाळीच एका अनोळखी नंबरवरून फोन आला. “नमस्कार, मी हेमा मालिनी बोलतेय. तुम्ही गोल्डी साहेबांच्या गाण्यांवर काम करत आहात असं कळलं. तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे आहेत? आपण कधी बोलूया?” इतकं सहज बोलणं झालं की, आपण एका मोठ्या व्यक्तीशी बोलत आहोत असं जाणवायची संधीच हेमाजींनी मला दिली नाही. दुसऱ्या दिवशीची वेळ ठरली आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली. ‘जॉनी मेरा नाम’ देवसाहेबांबरोबर केलेला माझा पहिला चित्रपट! देव आनंद या मोठ्या स्टारसोबत काम करायची ही खूप मोठी संधी मला ‘जॉनी मेरा नाम’ने दिली. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. तेव्हा आणि त्याच्यापुढे प्रत्येक चित्रपटाच्या निमित्ताने देव साहेबांमधला कुटुंब वत्सल माणूस मला अनुभवायला मिळाला. विशेषतः बाहेर चित्रीकरण असताना आपल्या घरातल्या व्यक्तीची काळजी घ्यावी, तशी काळजी देव साहेब घेत असत. अगदी घरच्यासारखे वातावरण ठेवण्यात ते वाकबगार होते. या मुलाखतीत हेमाजींनी देव साहेबांबद्दल जे सांगितलं, ते खूप महत्त्वाचं होतं. सिनेमाच्या आभासी जगात एका ‘खऱ्या’ माणसाबद्दल त्या बोलत होत्या.

‘सीआयडी’, ‘सोलवा साल’, ‘बात एक रात की’, ‘काला बाजार’, ‘गाईड’, ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटांमध्ये देव साहेबांसोबत काम केलेल्या वहिदाजींनी ठरलेल्या तारखेच्या एक आठवडा आधीच दुपारी तीन वाजता मला फोन केला. “आपण आज भेटतोय ना? किती वेळात याल?” या त्यांच्या प्रश्नांनी मी घाबरलो, म्हटलं, “वहिदाजी, तुम्ही मला पुढच्या आठवड्यात वेळ दिली आहे.” “अरे हो! खरच, आज नाही भेटायचंय! तुम्ही गोल्डीच्या गाण्यांचा अभ्यास करताय, काय प्रश्न विचाराल? या आनुषंगाने मी तयारी करत होते आणि अचानक वाटलं की, तुम्ही आजच येणार आहात. आम्ही एकत्र खूप काम केले; परंतु गोल्डी किंवा देवबद्दल बोलायचं तर तयारी व्यवस्थित असायला हवी. एक मोठा दिग्दर्शक आणि एक मोठा अभिनेता, निर्माता” असं म्हणून वहिदाजी हसल्या. वयाची ऐंशी पार केलेल्या आणि एक विचारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या वहिदाजींनी एका छोट्या मुलाखतीसाठी इतकी तयारी करावी, याचं मला अप्रूप वाटलं, माझ्यावरचे दडपण अधिकच वाढले. बरोबर एक आठवड्यानंतर ठरल्या वेळेला वहिदाजींनी मला तीन तास वेळ दिला. खूप आठवणी सांगितल्या. “Dev! He was a Star, we used to address him as Dev Saab but he liked to be addressed as Dev, only Dev!’ He knew his plus points.” वहिदाजी आठवणीत रमून गेल्या, “गाईडचे कालाबाजारचे किंबहुना कुठल्याही चित्रपटातले देव साहेबांचे पल्लेदार संवाद ऐका. भाषेवरची आणि भावनांवरची पकड ही एकत्र एका नटात आपल्याला बघायला मिळते. हिंदी भाषेतले लांबलचक संवाद सुद्धा लीलया पेलणारा नट म्हणजे देव आनंद!”

“मौत एक खयाल हैं, जैसे जिंदगी एक खयाल है! ना सुख है ना दुख हैं, ना दिन हैं ना दुनिया, ना इंसान, ना भगवान…… सिर्फ मै हुं, मै हुं, मै हुं… मै!” हा देव साहेबांचा ‘गाईड’ मधला संवाद मला त्या क्षणी आठवला.
एकीकडे हिंदी सिनेमातला अग्रणी नट, निर्माता आणि काही कालांतराने दिग्दर्शक म्हणून काम करणारा हा अवलिया प्रत्यक्ष आयुष्यात लफ्फेदार इंग्रजी बोलत असे. (यासाठी इंग्रजी Guide जरुर बघावा) देव साहेबांच्या खूप साऱ्या सिनेमांचं कला दिग्दर्शन टी. के. देसाई यांनी केलं आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाचे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक सुबोध गुरुजी हे टी. के. देसाई यांचे सहाय्यक होते आणि त्यांनी देव साहेबांना खूप जवळून बघितले आहे. गुरुजींनी त्यांच्या मुलाखतीमधून देवसाहेबांच्या ‘इंग्रजी’वर प्रकाश टाकला. “देव साहेबांची स्टुडिओमधली एन्ट्री म्हणजे सर्व कामगार वर्ग आणि विशेषतः देसाईंची पळापळ. त्याच्यात मी सुद्धा असे,” हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. “पळापळ का?” असं विचारलं असता खूप वेळ हसून म्हणाले की, “अरे देव साहेब यायचे आणि माणसांची तर सोडूनच दे सेटची सुद्धा चौकशी इंग्रजीत करायचे! सेट बद्दलच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे असलं तरी प्रश्न काय आहे हे तर कळायला हवं ना!” माझ्या चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह बघून गुरुजी हसत हसत पुढे म्हणाले, “देव साहेब फाडफाड इंग्रजी बोलायचे… त्यातल एक अक्षरही आम्हाला कळत नसे.” नवकेतनच्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या सेट उभारणीच्या आठवणीत रमत असताना गुरुजी म्हणाले, “देव साहेबांसारखा दुसरा निर्माता होणे नाही.”

त्यांच्यासोबत काम केलेल्या वेगवेगळ्या कलाकारांना ते वेगवेगळे वाटतात त्यांची वैशिष्ट्ये त्यांना जाणवतात त्याच बरोबर त्यांच्या चाहत्यांना देवसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा कुठला पैलू आवडतो? काहींना ते स्टाईल आयकॉन वाटतात, काहींना त्यांचा फक्त काळा सूट आवडतो, काहींना त्यांच्या चालण्याची लकब आवडते, काहींना केसांचा कोंबडा, काहींना त्यांचा पडलेला दात ‘चमकवायची’ पद्धत आवडत असावी, तर काहींना त्यांचं निरागस किंवा कधीकधी खट्याळ हसू आवडत असावं! ‘देव’ हे नाव असतानाही माणसासारखा वागणारा आणि सतत चित्रपट निर्मितीचा ध्यास घेऊन मेहनतीत ‘आनंद’ मानणारा हा माणूस मला आवडतो! ‘देव आणि आनंद’ या दोन शब्दांतच सर्व काही आहे, असं वाटू लागतं!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Shah Rukh Khan Wife Troll : शाहरूख खानच्या पत्नीच्या कपड्यांना बघून भडकले चाहते

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…

1 hour ago

Gaurav More: ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेचं स्वप्न पूर्ण; ही महागडी गाडी घेतली

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…

1 hour ago

Breaking News : मुख्यमंत्र्यांना जायचं होतं दिल्लीला पण उतरले…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…

2 hours ago

आईस्क्रीम कारखान्यातील धक्कादायक घटना, कामगारांना दिली अशी वागणूक की प्राणीही घाबरावेत !

छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…

3 hours ago

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

4 hours ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

4 hours ago