मोहाली: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेला २२ सप्टेंबरपासून सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदा गोलंदाजी करताना कांगारूंना २७६ धावांवर रोखले. आशिया चषकातील सामन्यांमध्ये प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आलेल्या अनुभवी मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त खेळ केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकत गोलंदाजी निवडली. मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवताना संघाला शानदार सुरूवात करून दिली. भारताचे गोलंदाज पाहुण्या संघावर तुटून पडले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव २७६ धावांवर आटोपला.
१९ महिन्यानंतर एकदिवसीय सामना खेळत असलेल्या आर अश्विननेही एक विकेट मिळवला. जसप्रीत बुमराहआणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या नावे केला. खरा जलवा तर शमीने दाखवला त्याने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत धाडला.
आशिया चषकादरम्यान मोहम्मद शमीला कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांनी प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. जसप्रीत बुमराह खासगी कारणामुळे श्रीलंकेवरून भारतात परतला तेव्हा त्याची जागा शमीला देण्यात आली. मात्र जसे बुमराह परतला तसे शमीला बाहेर करण्यात आले. शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १० ओव्हरमध्ये ५१ धावा देत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ विकेट मिळवल्या.
यासोबतच त्याने नवा इतिहास रचला. भारतात खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत ५ विकेट घेणारा शमी पहिला भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. याआधी कोणत्याही भारतीयाला ही कामगिरी करता आलेली नाही.