महाराष्ट्राची तीन दैवते आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे पंढरीचे विठूराया आणि तिसरा अर्थातच महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीगणेश. यापैकी गणेशाचे आगमन आज होत आहे. श्री गणरायाची महती सर्वांना वेगळी सांगण्याची गरज नाही. भारतात काय पण जगात असा एकही देव नाही की, ज्याचा उत्सव तब्बल दहा दिवस चालतो. इतका प्रदीर्घ काळ उत्सव चालणारे हेच एकमेव दैवत. हिंदू धर्मात गणेशाला प्रथम वंदनाचे स्थान दिले आहे. हिंदूंचे कोणतेही उपक्रम हे गणेशाला वंदन केल्याशिवाय सुरू होत नाहीत. गणेशाचे अधिष्ठान असल्याशिवाय ते चांगले पार पडतील, असे कुणा सच्च्या हिंदूला वाटत नाही. साऱ्या शक्तिशाली दैवतांनीही गणेशाला अग्रक्रम देऊन त्याचा गौरव केला आहे. ‘आधी वंदू तुज मोरया’ असे म्हटल्याशिवाय आपल्याकडे कोणताही कार्यक्रम सुरूच होत नाही. गणेशाची महती वेगळी ती आणखी काय सांगायची. गणेशोत्सव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य. चैतन्याने भारलेला हा उत्सव सर्व भारतवर्षात साजरा केला जातो. गणेश देवता ही निरलस आहे आणि तिला गरिबी, श्रीमंती, काळा की गोरा वगैरे कोणताही भेदभाव नाही. सारेच गणेशोत्सव साजरा करतात. गरिबातील गरीब असो की धनाढ्य उद्योगपती, गणेशोत्सव सारख्याच भक्तिभावाने साजरा करतात. दहा दिवस सारा भारत नुसता चैतन्याने ओसंडून वाहत असतो. गणेशोत्सव म्हणजे केवळ आनंदाचा उत्सव असतो. कोकणात तर हा उत्सव फारच थाटामाटात साजरा केला जातो. देशावर म्हणजे घाटावर तो तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो.
गणेशाचे अधिष्ठान हे अत्यंत पूज्य मानले जाते. गणेश ही काही उग्र देवता नव्हे. शंकर महादेव ही उग्र देवता मानली जाते. तसे गणेशाचे नाही. तो अगदी साधाही आहे आणि प्रसंगी अगदी भक्ताची परिस्थिती पाहून जे काही असेल, ते गोड मानून घेणाराही आहे. म्हणूनच तर सामान्यांना तो आपला वाटतो. गणेश म्हणजे आपल्यातीलच एक वाटणारी देवता आहे. गणेश लोकप्रिय होण्याचे हेच एक कारण आहे. गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू करून ब्रिटिशांविरोधात जनजागृती केली, हे आता साऱ्यांना ठाऊक असते. नंतर त्या गणेशोत्सवात अनेक विकृतीही शिरल्या आणि उत्सवाला पूर्वीचे शुद्ध स्वरूप राहिले नाही, हेही साऱ्यांना ठाऊक असते, पण तो आपला विषय नाही. गणेश आणि सामान्यजन यांच्यात एक सामाजिक नाते निर्माण झाले आहे, तसे ते दुसऱ्या कोणत्याही देवतेशी निर्माण झालेले नाही. गणेशाचे अधिष्ठान हे स्वराज्यालाही होते. म्हणून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधताना गणेशाचीच पूजा केली होती. गणेश ही देवता सर्व वर्गांची, सर्व जातींची आणि सर्व वर्णांची आहे. विशिष्ट वर्गाने त्याची पूजा केली आहे, असे कधीच झाले नाही. कोणतेही कार्य सुरू करायचे असले म्हणजे गणेशाचे अधिष्ठान ठेवले जाते. त्याची पूजा करूनच कोणतेही कार्य सुरू केले जाते. हा मान गणेश देवतेला दिला जातो. बाकी कोणत्याही देवतेला हा मान नाही.
गणेशोत्सवाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्वही आगळेच आहे. गणेशोत्सव दहा दिवस चालतो, म्हणून दहा दिवस आर्थिक स्थिती चैतन्यदायी असते. दहा दिवस अर्थव्यवस्था चैतन्यशील असते, त्यामुळे व्यवसाय जोरात चालतो. मंडपवाले, ध्वनिक्षेपक, हॉटेलवाले, केटरर्स, मंदिरांतील रोषणाई करणारे वगैरे लहान व्यावसायिकांना या दहा दिवसांत चांगला रोजगार मिळतो. अर्थव्यवस्थेत चैतन्य आलेले असते ते हेच. कोणताही सण इतके चैतन्य महाराष्ट्रात आणत नाही. गणेशोत्सव हा महाराष्ट्रासाठी नवीन उमेद, उत्साह आणि अर्थव्यवस्था घेऊन येतो. निवडणूक आणि गणेशोत्सव हेच दोन विषय असे आहेत की, देशात त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेला चैतन्य येते. सारी विक्री वाढलेली असते आणि व्यावसायिकांची चांदी झालेली असते. गणेशाचे धार्मिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहेच, तसे ते आर्थिकही आहे. असा सर्वांगपरिपूर्ण असा हा उत्सव असतो. माणूस कुणीही असो, तो गणेशोत्सव साजरा करणारच. त्याला अपवाद नाही. जिकडे-तिकडे गणेशाचे चैतन्याने भारलेले वातावरण असते. महाराष्ट्रात तर गणेशमूर्ती कितीतरी उंच असतात आणि त्यांच्या बनवणाऱ्यांनाही चांगले दिवस आलेले असतात. रायगड जिल्ह्यात हजारो लोक गणेशमूर्ती बनवून आपली उपजीविका चालवतात. पेणच्या मूर्ती तर आता परदेशांतही जातात, हा किस्सा जुना झाला. त्यात नावीन्य असे काही राहिले नाही.
चैतन्य असल्यामुळेच हा सण लोकांचा इतका लाडका झाला असावा. शिवाय त्यात सोवळेओवळे, शिवाशिव वगैरे काहीही अवडंबर नाही. अगदी साध्या माणसांचा असा हा साधा सण आहे. त्यामुळेही तो सर्वमान्य झाला असावा. बाकीच्या सणांना एक गंभीर असे वलय असते. पण सर्वसामान्यांच्या या गणेशोत्सवाला त्यातील असे काहीही नाही. वेशभूषेचे अवडंबर नाही किंवा मंत्रतंत्र, फुले, पाने यांचेही अवडंबर नाही. तरीही गणेशाला लाल रंगाची म्हणजे जास्वंदीची फुले आवडतात. पण बाकी त्याचे काहीही हट्ट नसतात. असा हा गणेशोत्सव अवघ्या महाराष्ट्राने स्वीकारला आहे. गणेशोत्सव हा इतका सर्वमान्य होऊ शकतो, हे ओळखूनच टिळकांनी त्याच्यानिमित्ताने ब्रिटिशांविरोधात जनजागृती करण्यासाठी याची निवड केली असावी. कारण कसलेही अवडंबर या देवाला नाही. तरीही ही विद्येची देवता आहे. विद्या ही नेहमीच साधेपणानेच ग्रहण करायची असते, हाच संदेश गणेशाने मानवजातीला दिला आहे. त्याचे आपण अर्थ समजून घेत नाही, हे आपले दुर्दैव आहे. पण आता गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि सर्वांच्या या लाडक्या बाप्पाचे स्वागत करायला हवे. गणरायाचे स्वागत आपणही तितक्याच हर्षोल्हासात करायला हवे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…