Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजIndian Scientists : उंच भरारी

Indian Scientists : उंच भरारी

  • ओंजळ : पल्लवी अष्टेकर

श्रीहरिकोटातून जेव्हा चांद्रयान-३ अवकाशात झेपावलं, तेव्हा संपूर्ण देशभरातून शास्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. या मोहिमेत अतिशय साध्या व बुद्धिमान अशा काही महिलांचा समावेश आहे. यातील दोन हिरे डॉ. रितू करिधाल आणि डाॅ. टेसी थॉमस यांच्याविषयी आपण या लेखातून जाणण्याचा प्रयत्न करूया.

भारताच्या चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या लँडिंग केले. चांद्रयान-३ विविध प्रकारच्या संशोधनाला दिशा देण्याचे काम करणार आहे. चांद्रयान-३ च्या लँडरचे नाव विक्रम व रोव्हरचे नाव ‘प्रज्ञान’ असे आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताने इतिहास रचला, कारण २३ ऑगस्टपूर्वी जगातील तीन देश अमेरिका, रशिया व चीन या देशांनीच चंद्रावर आपला झेंडा फडकविला होता. मात्र भारताचे यश यापेक्षा महत्त्वपूर्ण आहे कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा एकमेव देश आहे.

भारताचा विक्रम लँडर आता चंद्रावर उभा असून प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर हालचाल सुरू केली आहे. ‘प्रज्ञान’ने या ध्रुवावरून तिथले फोटोज व महत्त्वपूर्ण माहिती पृथ्वीवर पाठविली. प्रज्ञान रोव्हरने तिथल्या ऑक्सिजन व सल्फरचा असल्याचा शोध घेतला. श्रीहरिकोटातून जेव्हा हे यान अवकाशात झेपावलं, तेव्हा संपूर्ण देशभरातून शास्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. मुख्य म्हणजे चांद्रयान-३ या मोहिमेत अतिशय साध्या व बुद्धिमान महिलांचा समावेश आहे. यातील दोन हिऱ्यांविषयी आपण या लेखात
जाणून घेऊया.

डॉ. रितू करिधाल

चांद्रयान-३ मधील महत्त्वाच्या शास्त्रज्ञ डॉ. रितू करिधाल, या भारतातील प्रतिष्ठित रॉकेट वुमन म्हणून ओळखल्या जातात. त्या इस्रोमध्ये एरोस्पेस अभियंता व वैज्ञानिक या पदांवर कार्यरत आहेत. मंगळयान या नावाने प्रसिद्ध असलेल्या भारताच्या मंगळ परिभ्रमण मोहिमेसाठी उप ऑपरेशन डायरेक्टरच्या भूमिकेचा समावेश त्यांच्या कारकिर्दीत होतो. डाॅ. रितू करिधाल या चांद्रयान-३च्या मिशन डायरेक्टर आहेत. त्या इस्रोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी डॉक्टर रितू यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहेत.

मूळच्या लखनऊ येथील रितू करिधाल या मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या. लहानपणापासूनच त्यांना चंद्र-तारे, अवकाश यांचे विशेष आकर्षण व कुतूहल होते. त्यामुळे याच क्षेत्रात त्यांनी करिअर करण्याचा निश्चय केला. मात्र त्या काळी या क्षेत्रात मार्गदर्शन करणारे क्लासेस अथवा संस्था नव्हत्या. त्यामुळे रितू यांनी स्वतःची वाट तयार केली.

गडद काळ्या आकाशामागे, चमचमणाऱ्या ताऱ्यांमागे, चंद्र व त्याच्या बदलत्या कळांमागे नेमकी कोणती रहस्य, गुपीतं दडली असतील याचं त्यांना नेहमी कुतूहल वाटत असे व अनेकदा रात्रभर त्या आकाशातल्या ताऱ्यांचं निरीक्षण करत असत. या प्रश्नांची उत्तरं त्या स्वतः शोधण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांनी लखनऊमधून फिजिक्समध्ये एम.एस्सी. ही पदवी मिळवली व त्याच डिपार्टमेंटमध्ये त्यांनी सहा महिने अध्यापन केलं. त्यानंतर बंगळूरुच्या इंडियन सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. डॉ. रितू यांनी बंगळूरु येथील आयआयएससीमध्ये एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये उच्च शिक्षण घेतलं. त्यांना इस्रो, नासा या संस्थांबद्दल, अवकाश मोहिमांंबद्दल जी काही माहिती व फोटो मिळत, ते कात्रणांच्या स्वरूपात जपून ठेवण्याचा छंद लागला. १९९७ मध्ये त्या इस्रोमध्ये दाखल झाल्या.

डॉ. रितू यांची अफाट बुद्धिमत्ता, नेतृत्वगुण, प्रचंड परिश्रम या जोरावर त्यांनी अवकाश विज्ञानात भरीव योगदान दिले आहे. त्या इस्रोच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी झाल्या आहेत. यात मंगळयान मोहीम, चांद्रयान १ मोहीम, चांद्रयान २ मोहीम, जीएसएटी-६ ए मोहीम आणि जीएसएटी-७ ए मोहीम अशा यशस्वी मोहिमांचा समावेश आहे.

त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात उल्लेखनीय म्हणजे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे कलाम यांच्या हस्ते मिळालेला ‘युवा शास्त्रज्ञ पुरस्कार.’ २०१५ मध्ये मंगळयान मोहिमेबद्दल ‘इस्रो टीम’ पुरस्काराचा सन्मान त्यांना देण्यात आला. अवकाश विज्ञानात विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांना २०१७ मध्ये वुमन ॲचिव्हर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी रितू या एक आदर्श आहेत.

डॉ. टेसी थॉमस

देशाच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा, विकासाचा टप्पा म्हणजे अग्नी मिसाईल! अग्नी मिसाईल हे एक इंटरकॉन्टिनेंटल ब्लॅस्टिक मिसाईल आहे जेणेकरून त्याची मारा करण्याची क्षमता अतिशय मोठी, पाच-साडे पाच हजार कि.मी. इतकी मोठी आहे. हे मिसाईल अतिशय घातक व मोठे आहे. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी या मिसाईलचा विकास व संशोधन होणं गरजेचं होतं. या मिसाईलच्या विकासाच्या मागे अजून कोणी नसून आपल्या देशातील टेसी थॉमस आहे. डाॅ. टेसी थॉमस यांना ‘भारताची अग्नीपुत्री’ म्हणून संबोधले जाते. डॉ. टेसी थॉमस यांनी चांद्रयान-३ मध्ये अग्नी-३ व अग्नी- ५ मध्ये विकसित केलेले तंत्रज्ञान तर वापरलेच, शिवाय चांद्रयान-३च्या अनेक तांत्रिक बाबीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

टेसींचे शिक्षण सेंट माईकेल्स हायर सेकंडरी स्कूल व सेंट जोसेफ गर्ल्स हायर सेकंडरी स्कूल, अल्लेपी येथे झाले. त्यांचा ओढा नैसर्गिकपणे गणित व विज्ञानाकडे होता. अकरावी व बारावीमध्ये त्यांना गणितात शंभर टक्के गुण मिळाले होते. त्याच वर्षात विज्ञानात त्यांना ९५ टक्के गूण मिळाले होते. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून महिना शैक्षणिक कर्ज काढले, कारण त्यांना अभियांत्रिकी शाखेचा अभ्यास, शासकीय अभियांत्रिकी विद्यालयातून करायचा होता. नेहमी नंबरात असल्यामुळे त्यांना तेथील स्कॉलरशिपदेखील मिळाली. त्यातून शिकवणीची फी निघाली. शैक्षणिक कर्जामुळे त्यांना B.Tech करण्यासाठी धाडस मिळाले.

शाळा व कॉलेजमध्ये टेसी असंख्य गोष्टीमध्ये सहभागी व्हायच्या. त्या खेळात विशेषतः बॅडमिंटनमध्ये चमकल्या, त्यामुळे त्यांना एक विशेष नाव प्राप्त झाले. तरुणाईला एक सुंदर, महत्त्वपूर्ण संदेश डाॅ. टेसी यांनी दिला आहे. त्या म्हणतात, “येणाऱ्या पिढीने ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा सोडू नये. अपयशासाठी सुद्धा मनाची तयारी हवी.” डाॅ. टेसी यांना एक अपत्य आहे.

देशाप्रति त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. २०२२ मध्ये त्यांना ‘लोकमान्य टिळक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चांद्रयान-३ या मोहिमेत ज्या महिला शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण वाटा उचलला, त्यांची नावे, अनुराधा टी. के., एन. वलारमती, मंगला मनी, मोमिता दास, नंदिनी हरिनाथ, मीनाक्षी संपूर्णेश्वरी, कीर्ती फौजदार त्याचप्रमाणे असे हजारो हात या पाठीमागे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -