शैलेश पालकर
पोलादपूर : गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांची कोकणाकडे जाण्याची ‘वन वे’ सुविधा आता ‘जशी असेल तशी’ वापरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र, वनवे सुविधेचा बोजवारा उडाला असताना पोलादपूर तालुक्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील (Mumbai Goa Road) कशेडी घाटाला पर्यायी वनवे भुयारी मार्गातील गैरसोयींकडे कशेडी घाटातील प्रवासाच्या वेळेची बचत होणार असल्याचे कारण देत केवळ ९-१० मिनीटांमध्ये भुयारातून खेडकडे जाणार असा अवधान विभाजनाचा खेळ करण्यात येणार आहे. मात्र, गैरसोयींचा पाढा वाचता गणेशोत्सव काळामध्ये गणेशभक्तांना या भुयारी मार्गामध्येही मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. दरम्यान, भुयारी मार्गाचे काम अपूर्ण असताना कोकणाकडे जाणाऱ्या भुयाराची लांबी ही मुंबईकडे जाणाऱ्या भुयाराच्या तुलनेमध्ये कमी असल्याने काँक्रीटच्या अर्धवर्तुळाकार भुयाराची जोड दिली जात आहे.
कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग आणि केवळ ९ ते १० मिनीटांमध्ये सुस्साट जाण्याची संधी अशी चर्चा वृत्तवाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात घडवून आणताना भुयारी मार्गातील गैरसोयींकडे मात्र सपशेल दूर्लक्ष करण्यात आले असल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने तीन पदरी भुयारी मार्गांपैकी एकपदरी काँक्रीटीकरण अपूर्ण राहिल्याने सहा इंटरकनेक्टीव्हिटीच्या भुयारांतून दुसऱ्या कोकणाकडे जाणाऱ्या समांतर भुयाराशी संलग्नता झालेली नाही. परिणामी, सध्या कोकणात जाण्यासाठी वनवे असलेल्या मुंबईकडे जाणाऱ्या भुयाराच्या डाव्या बाजूचा काँक्रीटीकरणाचा एक पदर अपूर्ण असल्यामुळे भुयारातील वाहनांचा वेग ३० कि.मी. प्रतितास पेक्षा कमी ठेवावा लागत आहे. या मंद वेगमर्यादेमुळे २ किमी १०० मीटर लांबीच्या या भुयारामध्ये दुपदरी काँक्रीटकरणाच्या ‘वनवे’ रस्त्यावर गणेशोत्सवापूर्वीच्या दोन दिवसांमध्ये वाहनांची गर्दी मोठ्या संख्येने होऊन एखादे वाहन एक पदर अपूर्ण असलेल्या खोल भागात उतरल्यास डाव्या बाजूच्या भुयाराच्या कातळावर आदळून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या कातळाला काँक्रीटीकरणाची पिचिंग देण्यासाठी स्टीलचे बार उभारण्यात आले असून या बारमध्ये एखादे वाहन अपघातग्रस्त झाल्यास या स्टीलच्या सळ्या वाहनात आरपार घुसण्याची शक्यता पाहता मोठ्या जीवघेण्या अपघाताचे निमंत्रण ठरणारी आहे.
याशिवाय, या भुयारी मार्गामध्ये छप्परावरील कातळाला केलेल्या काँक्रीटच्या पिचिंगमधून पाण्याचे लोट मोठ्या प्रमाणात गळत असल्याने वाहनांवर मोठ्या आवाजासह २० मीटर्स उंचावरून आदळत असल्याने वाहनांचे छप्पर दणाणत असल्याचे अनुभव येत आहेत. याखेरिज, भुयारामध्ये वायुविजन म्हणजेच व्हेंटीलेशनची सुविधा नसल्याने दुचाकी व तीन चाकी वाहने आणि नॉन एसी वाहनांतील प्रवाशांना गुदमरल्यासारखी भावना निर्माण होत असल्याचे अनुभव अनेकांनी सांगितला आहे. या २ कि.मी. १०० मीटर्स लांबीच्या भुयारी मार्गातील प्रवासादरम्यान कोणताही भयंकर अपघात झाल्यास जोपर्यंत वाहने भुयाराबाहेर येणार नाहीत तोपर्यंत मोबाईलची रेंज मिळणार नसल्याने अपघातप्रसंगी तातडीची मदत होण्यास प्रचंड विलंब होण्याचा धोका दिसून येत आहे.
कशेडी घाटातील भुयार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविताना तीन पदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. यातील करारानुसार 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित असून या रस्त्याचे कामदेखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच करीत आहे. या कंपनीने शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या पोटठेकेदारांमार्फत हे काम पूर्ण करण्याचा करार केला असून या पोटठेकेदार कंपनीकडून भुयाराच्या आणि भुयारापर्यंत जाणाऱ्या रस्ते व पुलांच्या कामात प्रचंड दिरंगाई होऊन विलंब झाला असल्याने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने भरलेल्या निविदेची तुलनात्मक किंमत वाढून या कामावरील खर्च देखील वाढणार आहे.
कशेडी घाटामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पध्दतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घाटातील प्रस्तावित 3.44 किलोमीटर लांबीचा भुयार तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा मंजूर झाल्याने स्विकारले असून 441 कोटी रुपयांचा खर्च याकामी होणे अपेक्षित आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील खवटी येथून 2019च्या पावसाळ्यापूर्वीच भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. सह्याद्री पर्वतराजींचा कातळ फोडून कोकण रेल्वेचा करबुडे लोहमार्ग ज्याप्रमाणे बोगद्यातून नेण्यात आला; त्याप्रमाणेच खेड आणि पोलादपूर या दरम्यान हे दोन तीन पदरी भुयारीमार्ग निर्माण करण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत एनएडीपी 4 मंत्रालयाच्या अंतर्गत आयोगाने हा प्रकल्प 30 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे सूचित केले आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…