कोलंबो: आशिया चषक २०२३च्या(asia cup 2023) फायनलचे दोन संघ अखेर ठरले आहेत. भारत(india) आणि श्रीलंका(srilanka) हे दोन संघ फायनलमध्ये आमनेसामने भिडणार आहेत. येत्या १७ सप्टेंबरला आशिया चषकाची फायनल रंगणार आहे. गुरूवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला दोन विकेटनी हरवत फायनल गाठली.
पावसामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ४२ षटकांचा ठेवण्यात आला होता. पाकिस्तानने ४२ षटकांत पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५२ धावा केल्या. तर श्रीलंकेने हे आव्हान ८ विकेट गमावत पूर्ण केले आणि दोन विकेट राखत विजय मिळवला.
पाकिस्तानकडून फलंदाजी करताना सलामीवीर चांगली सलामी करू शकले नाहीत. फखर झमान ४ धावा करून बाद झाला तर कर्णधार बाबर आझम २९ धावा करू शकला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मोहम्मद रिझवानने या सामन्यात नाबाद ८६ धावांची खेळी केली. तर इफ्तिखार अहमदने ४७ धावांची खेळी केली.
त्यानंतर श्रीलंकेने डावाला सुरूवात करताना त्यांची सुरूवात बरी झाली. श्रीलंकेचा यष्टिरक्षक कुशल मेंडिसने ९१ धावांची खेळी केली. तर सदीरा समरविक्रमाने ४८ धावा करत त्याला चांगली साथ दिली. चरिथ अस्लांकाने ४९ धावा ठोकल्या. यामुळे श्रीलंकेला हे आव्हान पार करता आले. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगला होता. पाकिस्तानने श्रीलंकेला विजयासाठी झुंजवले.