
अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे (Ram Mandir) बांधकाम (Ram Janmabhoomi) सुरू असताना त्या ठिकाणी अनेक पुरातन मूर्ती आणि स्तंभ सापडले आहेत. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्स (ट्विटर) वर याबाबत माहिती दिली आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असतानाच या मूर्ती आणि प्राचीन अवशेष आढळून आल्याचे राय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
चंपत राय यांनी फोटोही शेअर केला आहे. मात्र याबाबत आणखी माहिती त्यांनी दिली नाही. राय यांनी शेअर केलेल्या फोटोत मूर्ती, दगड, शिलालेख दिसून येत आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांना याचे दर्शनही घेता येणार आहे. राम मंदिराचे (Ram Mandir) काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी महिन्यात प्राणप्रतिष्ठेआधी कामे पूर्ण होतील असा अंदाज आहे. जानेवारी महिन्यात होणारा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम जागतिक पातळीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषदेने या कार्यक्रमाला यशस्वी करण्याची जबाबदारी घेतली आहे.
रामभक्तांना दर्शन घेता यावे म्हणून हे अवशेष गॅलरीत ठेवले आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांना याबाबत माहितीही दिली जात आहे. या अवशेषांवर नक्षीकाम केलेले दिसत आहे. तसेच देवांच्या मूर्तींवरही नक्षीकाम दिसून येत आहे.