अकोला शहरात श्री गजानन महाराजांचे अनेक भक्त होते. या भक्तांकडे महाराज कधीकधी अवचित येत असत. असेच एकदा महाराज अकोल्याला आले आणि खटाऊच्या गिरणीत त्यांनी मुक्काम ठेवला. त्यावेळी मलकापूर येथील महाराजांचा विष्णूसा नामे भक्त तिथे आला होता. त्याला असे वाटले की, महाराजांना आपल्या घरी मलकापूर येथे न्यावे. त्याने भास्कर या महाराजांच्या सेवाव्रती शिष्याकरवी वशिला लावला. भास्कर हेच महाराजांची सर्व व्यवस्था पाहात असत.
भास्कर महाराजांना म्हणाला, “महाराज मलकापूर येथे विष्णूसा भक्ताच्या घरी चला. तो बोलावण्याकरिता आला आहे. इथल्या लोकांचे मनोरथ आपण पूर्ण केले. त्याचप्रमाणे मलकापूरचे लोक आपली वाट पाहत आहेत.” यावर महाराज भास्करास बोलले, “सध्या मी काही मलकापुरास येत नाही. तू काही आग्रह करू नकोस. फार आग्रह करशील, तर फजिती पावशील यावर खोल विचार कर. मी उगीच काहीतरी बोलत नाही. दोरीला फार ताण दिला, तर ती तुटते. त्यामुळे तू काही या फंदात पडू नको.” पण महाराजांचे हे बोलणे भास्कराने मनावर घेतले नाही. तो महाराजांना म्हणाला, “काही असो, आपण मलकापूर येथे विष्णूसाचे घरी चलावे. मी तुमचा लाडका असल्यामुळे माझे म्हणणे नाकारू नका. मी विष्णूसाला तसा शब्द दिला आहे. ती माझी प्रतिज्ञा तुम्ही पूर्ण करावी. चला आता स्टेशनवर मलकरपूरला जाण्याकरिता.” अशा प्रकारे आग्रह करून भास्कर हा गजानन महाराजांना घेऊन स्टेशनवर आला.
भास्कराने स्टेशन मास्तरला सांगून बाराजण बसू शकतील, एवढा एक डबा रिकामा करवून घेतला. महाराज तसेच काही न बोलता बसून राहिले. गाडी सुटेस्तोवर जागेवरून उठले नाही. गाडी सुटण्याची घंटा झाली आणि महाराजांनी लीला केली. भास्कराचा डोळा चुकवून, जो डबा त्यांना बसण्याकरिता रिकामा करवून घेतला होता, तो त्यांनी सोडून दिला आणि महाराज स्त्रियांच्या डब्यात जाऊन बसले. महाराज दिगंबर अवस्थेतच राहत असत. त्यामुळे स्त्रिया घाबरून गेल्या. अखेर त्यांनी पोलिसाला वर्दी दिली. पोलीस अधिकारी तेथे आला व महाराजांच्या हाताला धरून खाली ओढू लागला तसेच अद्वातद्वा बोलू लागला. महाराजांनी त्याच्या हाताला हिसडा दिला व तेथेच बसून राहिले. त्यांना त्या पोलीस अधिकाऱ्याची भीती मुळीसुद्धा वाटली नाही. तो अधिकारी स्टेशन मास्तरकडे गेला व त्यांना त्यांना डब्यापाशी घेऊन आला. स्टेशन मास्तर तिथे आले. त्यांनी योगीराज डब्यात बसले आहेत असे पहिले. ते पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले, “हा माणूस संत सत्पुरुष आहे. याला तुम्ही याच डब्यात बसून जाऊ द्यावे. याचे हाताने कधीच गुन्हा होणार नाही. असे स्टेशनमास्तरचे बोलणे ऐकून तो पोलीस अधिकारी म्हणाला, “मी वरिष्ठांना याविषयी तार दिली आहे. आता माझ्या हातात काही राहिले नाही. मी तुम्हाला पण वर्दी दिली आहे. तुम्ही वाटेल ते करा.” यावर स्टेशनमास्तरने आपली टोपी काढून बहुत आदरपूर्वक महाराजांना विनंती केली की, “आपण खाली उतरावे. माझे एवढे ऐकावे. कायद्याचे प्रयोजन मनी आणावे.” महाराज डब्यातून खाली उतरले. पुढे त्यांच्यावर कायद्याप्रमाणे जठार साहेबांचे कोर्टात खटला भरण्यात आला.
त्यांनी फिर्याद घेतली. त्याची चौकशीची तारीख नेमली. चौकशी शेगाव येथे होणार होती. बापूसाहेब जठार शेगाव येथे येऊन डाक बंगल्यावर चौकशी करण्याकरिता हजर झाले. त्याच दिवशी काही कामानिमित्त अकोला येथील महाराजांचे एक भक्त व्यंकटराव देसाई हे देखील तेथे आले होते. महाराजांवर खटला आज आहे अशी माहिती गावातील मंडळींना होतीच. त्यामुळे शेगाव येथील पुष्कळ लोक त्याकरिता डाक बंगल्यावर जमले होते. गर्दी पाहून व्यंकटराव देसाई जठार साहेबांस म्हणाले, “इतकी गर्दी कशाची? आज आपणापुढे काही विशेष खटला आहे का?”
यावर जठार म्हणाले, “मला आश्चर्य वाटते की, तुम्हाला कसे माहीत नाही. तुमचे स्वामी गजानन नग्न फिरतात म्हणून पोलिसांनी हा खटला भरून पाठविला आहे. त्या खटल्याची चौकशी आज दिवशी होणार आहे म्हणून हे लोक जमले असावे असे मला वाटते.” हे जठारांचे बोलणे ऐकून महाराजांचे भक्त असणाऱ्या व्यंकटरावांचे मन अतिशय खिन्न झाले. त्यांनी जठारांना हात जोडून हा खटला न चलविण्याबद्दल विनंती केली. ते जठारांना म्हणाले :
श्रीगजाननसाधूची।
योग्यता आहे थोर साची।
ती मूर्ति भगवंताची।
आहे पाहा प्रत्यक्ष॥५१॥
तो विदेही पुरुष जाणा।
बंधन त्याला कष्याचे ना।
तो योग्यांचा योगिराणा।
वंदनीय अवघ्यांते॥५२॥
खटला भरला हीच केली।
पोलिसांनी चूक भली।
ती पाहिजे दुरुस्त झाली।
आज आपुल्या कराने॥५३॥
यावर जठार बोलले की, याचा विचार पोलिसांनी आधीच करावयास पाहिजे होता.
(क्रमशः)
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…