Sant Dnyaneshwar : ज्ञानदेवांची लेखणी; अमृताची पुरवणी


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव जिवंत, चित्रमय संवाद रेखाटतात याची अनेक उदाहरणे सापडतात. अर्जुनातील गुणांचं, स्वभावाचं अतिशय साजेसं वर्णन ज्ञानेश्वरीत श्रीकृष्णांच्या तोंडी येतं. ते वाचताना वाटतं, जणू श्रीकृष्ण आणि अर्जुन खरंच आता बोलत आहेत. या साऱ्या दाखल्यांतून ज्ञानदेवांची लेखणी ही अमृताची पुरवणीच असल्याचे प्रतीत होत राहते आणि वाचक माऊलींच्या लेखणीत गुंतून जात असतो.


हे (कौरव) म्हणतील “गेला रे गेला! अर्जुन आम्हांस भिऊन पळून गेला!” अरे, असा हा दोष तुझ्यावर आलेला चांगला का?
‘हे म्हणती गेला रे गेला। अर्जुन आम्हां बिहाला।
हा सांगे बोलु उरला। निका कायी॥ ओवी क्र. २०८


अर्जुनाला समजावताना आलेला हा श्रीकृष्णांचा संवाद! ज्ञानदेव किती जिवंत, चित्रमय संवाद रेखाटतात याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण! ‘ज्ञानेश्वरी’च्या दुसऱ्या अध्यायात आलेली ही नाट्यमय ओवी आहे.


कौरवांची दया येऊन रणांगणावरून माघारी फिरू पाहणारा अर्जुन! त्याचं समुपदेशन (counselling) करणारे श्रीकृष्ण! अर्जुनाला त्यांच्या लढण्यासाठी प्रवृत्त करताना त्यांच्या तोंडी ज्ञानदेवांनी जे संवाद दिले आहेत, ते लाजवाब!


श्रीकृष्ण सांगतात - ‘अर्जुना, तुझी अपकीर्ती होईल’ हे सांगताना ते अर्जुनाच्या बुद्धीला आणि हृदयाला साद घालतात. अर्जुनासारख्या महाबलाढ्य वीराला स्वतःविषयी ‘गेला रे गेला। अर्जुन आम्हां बिहाला।’ हे ऐकून साहजिकच वाईट वाटेल, त्याच्यातील स्वाभिमान जागृत होईल. ‘मी लढतो’ असे तो म्हणेल, अशी ताकद देणारी ही ओवी आहे.


ज्ञानदेव दाखवून देतात की श्रीकृष्ण नाना प्रकारे अर्जुनाला लढाईसाठी तयार करतात. त्यातील हा एक प्रभावी मार्ग की त्याच्यातील ‘स्व’ आणि पराक्रमाला जाग आणणं, न लढल्यास त्याची अपकीर्ती होईल हे त्याला ऐकवणं. पुढे दुसरा मार्ग म्हणजे त्याच्या पराक्रमाचं वर्णन करणं, ती आठवण करून देणं. श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाच्या वीरतेचं वर्णन येतं. ते ज्ञानेश्वरांमधील कवीची प्रतिभा दाखवणारं!


श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘देशांतरीचे राजेरजवाडे, स्तुतिपाठक होऊन तुझी कीर्ती गातात, ती ऐकून यमादिकदेखील तुला भितात!’


‘त्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मल व गहन आहे आणि तो ऐकून जगातील मोठमोठे योद्धेही स्तब्ध होतात.’
ती ओवी अशी -
दिगंतींचे भूपती। भाट होऊनि वाखाणिती।
ऐकिलिया दचकती। कृतांतादिक॥ ओवी क्र. २१२
किती दिव्य कल्पना आहे ज्ञानदेवांची! ‘दिगंतीचे भूपती’ या शब्दाचा अर्थ ‘देशोदेशींचे राजे.


माऊली मात्र ‘दिगंतीचे भूपती’ असा खास शब्द योजतात. यात ‘त’ या अक्षराच्या पुन्हा येण्यातून एक लय लागते! पुन्हा ‘दिगंत’ या शब्दातून अर्थही व्यापक झाला आहे. या शब्दाद्वारे दिव्यता, भव्यता साकारते. तसेच भूपती हा शब्दही खास! ‘भू’चा पती यातून राजांची स्वामित्व भावना जाणवते. असे बलाढ्य ‘भूपती’ तुला (अर्जुनाला) वाखाणिती. या ‘वाखाणिती’मध्येही ‘त’ची नादमयता आहेच! पुढे येतं - ‘ज्या यमराजाला सर्व जग घाबरतं, तो यमराजदेखील तुला घाबरतो, असा अर्जुना तुझा महिमा!’ या दाखल्यातून ज्ञानदेव, अर्जुनाचा प्रचंड पराक्रम नेमक्या उंचीवर नेतात. याच दृष्टीतून पुढचा दाखला देखील पाहता येतो. अर्जुन कीर्तिमान आहेच. विशेष म्हणजे ती कीर्ती सरळ मार्गाने जाऊन मिळालेली आहे, म्हणून विशेषण येतं ‘गंगेप्रमाणे निर्मल व गहन असा कीर्तीचा महिमा!’अर्जुनातील गुणांचं, स्वभावाचं असं साजेसं वर्णन ‘ज्ञानेश्वरी’त श्रीकृष्णांच्या तोंडी येतं. ते वाचताना वाटतं, जणू श्रीकृष्ण आणि अर्जुन खरंच आता बोलत आहेत. असे भगवान मग आपलेही आधार होतात. ज्ञानेश्वरी लेखनाला सातशे पंचवीसपेक्षा अधिक वर्षं लोटली, तरी आजही ते आपले दीपस्तंभ होतात! या दीपस्तंभांना साष्टांग नमन!


(manisharaorane196@gmail.com)



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

ठरलं तर ! इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात होणार 'या' महाराजांचे कीर्तन

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार

श्रद्धा की अंधश्रद्धा?

आत्मज्ञान : प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनाच्या घडणीत ‘श्रद्धा’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

आत्मतेजाचा निनाद अंतरी सद्गुरूंचा नाद

ऋतुराज : ऋतुजा केळकर “वाऱ्याच्या लयीसंगे विवेक जागतो... स्मरणातल्या सुरांनी मन शुद्ध होतं... सद्गुरूंच्या कृपेने

मनुष्य जन्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आपण सध्या प्रबोधनासाठी घेतलेला विषय म्हटला तर अत्यंत कठीण आहे. म्हटले तर खूप

ज्ञानाचा सोपान

भारतीय संत : डॉ. अनुराधा कुलकर्णी निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या नावाची संगती

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि