Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीRajashri Katake : श्रावणसरीच्या सातव्या पुष्पात प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजश्री कटके

Rajashri Katake : श्रावणसरीच्या सातव्या पुष्पात प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजश्री कटके

माजी अधिक्षिका व प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजश्री कटके म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे जणू काही भांडारच. दैनिक प्रहारने श्रावणानिमित्त आयोजित केलेल्या ‘श्रावणसरी’ कार्यक्रमाच्या सातव्या पुष्पात प्रशासन, वैद्यकीय अध्यापिका आणि स्त्री रोगतज्ज्ञ अशा तीन आघाड्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. राजश्री कटके भरभरून बोलल्या. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत केलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, कोरोनादरम्यानचा वैद्यकीय क्षेत्रातील संघर्ष त्या कथन करताना उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला. दैनिक ‘प्रहार’चे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी डॉ. राजश्री कटके यांचे स्वागत केले.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा

तेजस वाघमारे

“माझं मूळ गाव उमरगा. माझे वडील माध्यमिक शाळेचे विज्ञानाचे शिक्षक होते. ते पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांनी कधी मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही. आजही माझे भाऊ घरी अधिक काम करतात. औरंगाबादमध्ये माझे एमबीबीएस, एमडी झाले. तिथून पुढे एमपीएससीची लेक्चरर म्हणून नेमणूक झाली. या प्रवासातून माझी जे. जे. रुग्णालयात अधिव्याख्याता म्हणून पोस्टिंग झाली. मला पहिली पोस्टिंग सेंट जॉर्जमध्ये मिळाली. त्यानंतर सहयोगी प्राध्यापक झाले. कामा रुग्णालयात जीव झोकून काम केले, तिथले किचन सुधरवले, असे डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रिया या पुरुष डॉक्टरांकडे जायच्या नाहीत, तेव्हा स्त्रियांचे मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे पिस्टनजी कामा यांनी उदात्त विचाराने कामा रुग्णालयाची जागा दान दिली. त्या ठिकाणी महिलांचे रुग्णालय काढले. या रुग्णालयात मी झोकून देऊन काम केले. त्यामुळे रुग्णालयात रुग्णसंख्या वाढली. शस्त्रक्रिया होऊ लागल्या. त्यानंतर कॅन्सरची केमोथेरपी सुरू केली. रुग्णालयाला भेट देण्यासाठी विधानमंडळाच्या शिष्टमंडळाने अचानक भेट दिली होती. या भेटीत शिष्टमंडळ खूश झाले, त्यांना मी किचन दाखवले. तेथील स्वच्छता पाहून त्यांनी कौतुक केले. मी एक स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने अनेक गुंतागुंतीचे रुग्ण, बऱ्याच डॉक्टरांनी उपचार नाकारलेले अशा ७० ते ८० टक्के रुग्णांवर उपचार केले. तो माझ्या आयुष्यात खूप समाधानाचा भाग आहे. आम्ही कामा हॉस्पिटलमध्ये तुळजापूर येथून आलेल्या एका महिलेच्या पोटातून २० किलोचा ट्युमर काढला होता. त्या महिलेचे वजन ४५ किलो होते आणि विविध आजार असल्याने शस्त्रक्रिया खूप कठीण होती. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. आम्ही ते ऑपरेशन केले आणि यशस्वीही झाले. अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील.

ग्रामीण भागात शासनाच्या वतीने अनेक शिबिरे घेतली. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ आहे. आपण तर परमेश्वर कुठे असतो, काय असतो ते बघितलेले नाही. ही आपली मानलेली संकल्पना आहे. रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच समाधान देत असतो. आपण चांगले काम करत राहावे, कुठलेही काम छोटे आणि मोठे नसते. ज्याने कुणाचे चांगले होत असेल, ते काम आपल्याकडून झाल्यास आनंद नक्कीच असतो आणि त्याचसाठी आपण आहोत, असे मला वाटते.

मला लहानपणापासून वाचनाची आवड आहे. मी खूप वाचन केले आहे आणि आजही करते. त्यावेळी टीव्ही नव्हते, आमच्याकडे खूप वाचनालये होती. तीन-तीन वाचनालयात माझी मेंबरशिप असायची. आई जेवायला वाढायला लागली तरी वाचणे संपत नसे. असे करता करता माझे पुस्तक वाचून पूर्ण व्हायचे. संत साहित्य ते शेक्सपिअरची अनेक पुस्तके मी वाचली आहेत. माझ्या खुर्ची, बेडच्या बाजूला पुस्तक असते म्हणजे असतेच. चांगले साहित्य माणसाने जरूर वाचावे. त्यामुळे आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ होतो. मला वाटते की नवीन पिढीने पुस्तकांवर प्रेम करावे आणि चांगली-चांगली पुस्तके वाचावीत. डिजिटल युग असले तरी वाचन फार महत्त्वाचे आहे.

गुंतागुंतीच्या डिलिव्हरी आणि शस्त्रक्रिया यामध्ये प्रदीर्घ अनुभव असल्याने एक सांगू इच्छिते की, गरोदर मातेने, स्त्रियांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी सकस आहार घेतला पाहिजे. पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. आपल्याला ज्या काही धोक्याच्या सूचना आपल्या शरीरात येतात, जसे की, खूप वजन वाढणे, अंगावर सूज येणे, रक्त कमी होणे किंवा डोळे पांढरे पडणे, बीपीचा त्रास वाढणे अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे जावे. तसेच डायबेटीस होण्यापूर्वी डॉक्टरांकडे जाऊन निदान करून घ्यायला हवे, असे डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले.

आश्वासक डॉक्टर

वैष्णवी भोगले

डॉक्टर म्हटले की, माझ्या नजरेसमोर इंजेक्शनची सुईच येते. त्यामुळे डॉक्टर या व्यक्तीपासून मी शक्य तेवढे लांब राहते. अशातच प्रहारच्या श्रावणसरीच्या सातव्या पर्वात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि कामा रुग्णालयाच्या माजी अधिक्षिका डॉ. राजश्री कटके येणार असल्याचे मला समजले तेव्हा वाटले की, आता इंजेक्शन नाही पण उपदेशाचे डोस नक्कीच मिळणार. डॉ. राजश्री या प्रहारच्या कार्यालयात येताच, ‘अरे यामध्ये तर बरेच चेहरे ओळखीचे आहेत,’ असे म्हणाल्या आणि क्षणातच वातावरण हलके-फुलके झाले. त्यामुळे माझ्याही मनावरचे दडपण दूर झाले.

आजच्या काळात शारीरिक स्वास्थ्य जितके महत्त्वाचे आहे तितकेच मानसिक स्थैर्यसुद्धा आवश्यक आहे. डॉ. राजश्री या दोन्हींवर अलवारपणे आणि दिलखुलासपणे बोलतात. त्यांच्या वक्तव्यात समोरच्या व्यक्तीला ‘ऑल इज वेल’ असे सांगत आश्वस्त करण्याची खुबी आहे.

आयुष्य एकदाच मिळते त्यातून सवड काढून आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे. आपल्या आवडीच्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. शरीर सुदृढ होण्यासाठी जसे आपल्याला सकस अन्नाची गरज असते, तसेच मेंदू तल्लख करण्यासाठी वाचनाची आवश्यकता असते. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे. एखाद्या गोष्टीचा राग मनात धरणे म्हणजे आपल्या हातात जळता कोळसा धरण्यासारखे असते, त्यामुळे आपल्यालाच त्रास होतो. आपण गरजू व्यक्तींना मदत करून, शक्य तेवढे चांगले काम करून माणसे जोडता येतात. त्यांचे असे आश्वासक शब्द जसजसे कानावर पडत होते, तसतसे माझ्या मनातही त्याचे चिंतन सुरू झाले होते. हा ठेवा आयुष्यभराचा आहे, एवढे नक्की.

आरोग्यं परमं भाग्यं। स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥

सायली वंजारे

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।
मनुष्य हा तेव्हाच निरोगी असतो, जेव्हा त्याचे मन व शरीर दोन्ही सुदृढ असतात. शरीर सुदृढ असेल, तर त्याला सुखाची प्राप्ती होऊन कोणत्याही दुःखाला सामोरे जावे लागत नाही. मानसिक संपन्नता, सुदृढ शरीर, उत्तम रोगप्रतिकारशक्ती हीच दीर्घायुष्याची गुरुकिल्ली होय. श्रावणसरीच्या सातव्या पुष्पात स्वास्थ्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेलं स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्त्व म्हणजे स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके. २३ वर्षे अविरतपणे जे.जे., कामा, सेंट जॉर्ज रुग्णालयात अधीक्षक, एमपीएससी लेक्चरर, सहयोगी प्राध्यापक पदांची धुरा सांभाळत स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहजरीत्या पार पाडणाऱ्या, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या डॉ. राजश्री या एकाच वेळी दोन जीवांना सांभाळत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आपल्या कार्याला आध्यात्मिकतेची जोड देत ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ असे व्रत मानून एखाद्याला त्याच्या त्रासातून, दुःखातून शारीरिकरीत्या, मानसिकरीत्या बाहेर काढणे हेच आपल्या जन्माचे उद्दिष्ट असून वेगळ्या अनुभूतीचा मार्ग आहे, असे त्या प्रांजळपणे म्हणतात. लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड असणाऱ्या डॉ. राजश्री नव्या पिढीला संदेश देताना म्हणतात, चांगले साहित्य माणसाने जरूर वाचावे, त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मकरीत्या विकसित होतो. आपल्या विचारांमध्ये प्रगल्भता येऊन चांगली सामाजिक पिढी घडली जाते. जीवनाला शांततेकडे आणि आनंदाकडे नेणे हाच आयुष्याचा उद्देश आहे.

आजच्या पिढीला स्तनपानाचे महत्त्व सांगताना त्या आपले विचार मांडतात की, “स्तनपान हे बाळासाठी अमृतासमान असून तो त्याचा अधिकार आहे. जेव्हा बाळ स्तनपान करते, त्यामुळे आईचा बांधा पूर्ववत होतोच. पण त्याचबरोबर बाळाची बौद्धिक क्षमता वाढली जाऊन त्याचा सर्वांगीण विकास होतो.” आजच्या धकाधकीच्या जीवनात शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांनी, किशोरवयीन मुलींना घ्यावयाच्या काळजीबद्दल त्यांनी मार्गदर्शन करत सर्वत्र सकारात्मकता आणली. चांगल्या वक्तेपणासोबतच आध्यात्मिक ज्ञान मुखोद्गत असल्याने अनुभवांवर आधारित पुस्तक लिहिण्याचा अनेकांचा आग्रह असल्याने भविष्यात याबाबत नक्कीच विचार करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रचिती दिव्यत्वाची!

रुपाली केळस्कर

श्रावण महिन्यातील उत्सवांच्या दिमतीला येणाऱ्या श्रावणसरी रुसल्या आहेत. अशा वातावरणात ‘दै. प्रहार’चा श्रावणसरी हा कार्यक्रम पार पडला. मात्र या वातावरणातही ज्ञानरूपी प्रकाशाची किरणे डोळ्यांसमोर चमकली, ती डॉ. राजश्री कटके यांच्या आगमनाने. या भेटीत डॉ. राजश्री यांनी जीवन-मरणाच्या रहस्याचे अनेक कंगोरे नकळतपणे उलगडले. प्रहारच्या श्रावणसरीच्या कार्यक्रमातील ही सातवी सर आयुष्याच्या तत्त्वज्ञानाची सांगड घालणारी होती. दिव्यत्वाची प्रचिती देणारी होती.

एका डॉक्टरकडून आध्यात्मिक तत्त्वज्ञान ऐकणे हे तसे दुर्मीळच. मात्र त्यांच्या भेटीनंतर तप्त श्रावणातही शांता शेळकेंच्या कवितेच्या ओळी आठवल्या. ‘भिजूनी उन्हे चमचमती… क्षण दीपती, क्षण लपती… नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा…’ डॉक्टर म्हणजे जन्म आणि मृत्यूचा क्षणभंगूर बाजार पाहणारा एक साक्षीदार असतो. मधला बेधुंद प्रवास आपला आपणच करायचा असतो. डॉक्टर या खडतर प्रवासाची खरी अनुभूती घेतात. या प्रवासातले अनेक अनुभव डॉ. राजश्री यांनी आपल्या भेटीमध्ये कथन केले. त्यांनी निभावलेल्या भूमिका म्हणजे, प्राध्यापक, शल्यविशारद, प्रशासकीय अधिकारी अशा आहेत. त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या, अनेक अडलेल्या गर्भवतींची सुटका केली. कॅन्सरच्या दुर्धर आजारांच्या शस्त्रक्रिया केल्या. जे.जे., सेंट जॉर्ज, कामा अशा मुंबईतील मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा बजावताना अनेक आव्हाने समोर आली. कामा रुग्णालयातील २६/११ चा दहशतवादी हल्ला त्यांनी अनुभवला.

जन्म आणि मृत्यूच्या सीमारेषेवर रुग्ण आणि संवेदनशील डॉक्टर यांच्यात एक मोठी मानसिक उलथापालथ सुरू असते. रुग्णाच्या वेदना झेलून त्याला नवसंजीवनी देण्याची ताकद त्यांना अाध्यात्मातून मिळाली. मुळात त्यांचा पिंडच आध्यमिक असल्याने त्यांचे मनोबल उंचावत गेले आणि त्यांच्या हाताला यश मिळत गेले. डॉ. राजश्री यांनी संवादाची कला उत्तमपणे अवगत केली. संतांच्या आणि विचारवंतांच्या साहित्यातून त्यांना जगण्याची दिशा सापडली. कोरोना काळातील आव्हाने त्यांनी लीलया पेलली. प्रत्येकाने शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी ध्यानधारणा केली पाहिजे, तसेच आठवड्यात किमान १५० मिनिटे चालले पाहिजेत. मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत, घरात शिजवलेले चांगले अन्न खाल्ले पाहिजे. आवडी जपल्या पाहिजेत. चांगले वाचन केले पाहिजे. सकारात्मक असले पाहिजे, रागावर नियंत्रण मिळवले पाहिजे. त्यांचे हे शब्द ऐकून त्यांनीच सांगितल्याप्रमाणे आयुष्य खूप सुंदर वाटू लागले. अगदी श्रावणसरीत भिजून चमचमणाऱ्या उन्हासारखं!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -