Sunday, June 22, 2025

राजस्थानमध्ये महिलेला विवस्त्र करुन मारहाण, व्हिडिओही बनवला!

राजस्थानमध्ये महिलेला विवस्त्र करुन मारहाण, व्हिडिओही बनवला!

प्रतापगढ : मणिपूरप्रमाणेच राजस्थानमध्ये देखील माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पीडित महिला तिच्या पतीला सोडून दुसऱ्या कोणाकडे तरी पळून गेली होती. या घटनेमुळे पतीला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या पत्नीला नग्न करून मारहाण केली. महिलेचा ठावठिकाणा पतीला कळताच त्याने कुटुंबीयांसह जाऊन तिचे अपहरण केले. यानंतर पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेची नग्नावस्थेत गावात धिंड काढली. पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या पतीसह तीन आरोपींना अटक केली आहे.


राजस्थानमधील प्रतापगढ जिल्ह्यात ही घटना घडली. येथील धारियावाडमध्ये या महिलेला सासरच्यांनी विवस्त्र केले. तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.





डीजीपी उमेश मिश्रा यांनी सांगितले की, पीडित आणि आरोपी दोघेही आदिवासी समाजाचे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. याप्रकरणी आठ जणांची ओळख पटली आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.


मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत पोलीस याप्रकरणी कडक कारवाई करत असल्याचे म्हटले आहे. सुसंस्कृत समाजात अशा लोकांना स्थान नाही. अशा गुन्हेगारांना अटक केली जाईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात पाठवून शिक्षा होईल.





त्याचवेळी भाजपच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मुख्यमंत्री महोदय, अशी कोणती मजबुरी आहे की तुमच्या काँग्रेसला राजस्थानातील इज्जत लुटणे आणि मुलींच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत.


मणिपूर प्रकरणी विरोधक भाजपवर टीका करत असताना आता भाजपनेही काँग्रेसला धारेवर धरले आहे. दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष काँग्रेस सरकारला सातत्याने घेराव घालत आहे. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा मुद्दा मिळाला आहे.

Comments
Add Comment