
मुंबई : मुंबईमध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीचा (INDIA Alliance) आज दुसरा दिवस आहे. या बैठकीसाठी २८ पक्षांचे ६३ नेते उपस्थित आहेत. मात्र त्या प्रत्येकाची वेगवेगळी मतमतांतरे असल्याने आणि त्यांच्यात एकमत होत नसल्याने इंडिया (I.N.D.I.A.) आघाडीच्या लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आता या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्षांच्या ११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. मात्र तेथेही एकमत होत नसून कोणाची निवड करावी यावरुन त्यांच्यात जोरदार खळ सुरू आहे. या बैठकीत त्या त्या पक्षाचे प्रत्येकी एक प्रमुख नेता समितीचा सदस्य असेल आणि इंडिया आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तसेच या आघाडीत काही पक्ष नव्याने आलेले आहेत त्यांनाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, त्यानंतरच लोगो फायनल केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तूर्तास आज तरी लोगोचे अनावरण होणार नाही.
दरम्यान, लोगोसाठी एकूण नऊ पर्याय आहेत, हे सर्व लोगो नव्याने आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील. त्यानंतर यावरती अंतिम निर्णय होईल. त्यामुळे तूर्तास आज लोगोचे अनावरण होणार नाही.
तर दुसरीकडे प्रत्येक पक्षाला आपले निवडणूक चिन्ह असताना लोगोचे महत्व एवढे का? याबद्दल मतमतांतरे आहेत. लोगो करायचाच असेल तर हा संपूर्ण आघाडीचा असल्याने त्यावर सगळ्यांचे मत लक्षात घेऊनच निर्णय करावा अशी हालचाल सुरू आहे. काल काही नेते उशिरा पोहोचल्यामुळे सगळ्यांशी याबाबत चर्चा झालेली नाही.
इंडिया आघाडीच्या लोगोसाठी तयार केलेल्या नऊ डिझाईन पैकी एका डिझाईनला महत्त्वाच्या काही प्रमुख पक्षांनी संमती दिली आहे अंतिम झालेल्या लोगोची डिझाईन इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना दाखवून त्यांची संमती घेतली जात आहे. या आघाडीला इंडिया नाव असल्याने या लोगोमध्ये राष्ट्रध्वजाचे तिरंगाची झलकही दिसणार आहे.
इंडिया आघाडीची एक कॉमन सोशल मीडिया टीम
सोशल माध्यमांवरच्या लढाईत इंडिया आघाडी एकजूट दाखवणार आहे. इंडिया आघाडीची एक कॉमन सोशल मीडिया टीम बनवली जाणार आहे. सोशल माध्यमांवर भूमिकेमध्ये समानता असावी आणि सर्व पक्षांना समान भाव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवक्त्यांमध्ये समन्वयासाठी सुद्धा एक विशेष समिती बनवली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर दुपारी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.