
घरातल्यांनी भांडी घासायला सांगितल्याचा राग आल्याने घरातून गेली होती निघून
पेण : कासारभट येथील प्रियंका रघुपती तांडेल ही १९ वर्षीय तरुणी २३ ऑगस्ट रोजी कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. आठ दिवस प्रियंकाचा शोध सुरू होता. मात्र आज दादर सागरी पोलिसांना आलेल्या फोनमुळे तपास केला असता वशेणी-केळवणे खाडीत तरंगत असताना तिचा मृतदेह सापडला. परंतु सदर मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यास होडीची मदत न मिळाल्यामुळे पोलिसांना बराच वेळ लागला. आता किमान सागरी पोलिसांना तरी स्पीडबोट अगर अत्याधुनिक होडी द्या, अशी मागणी उपस्थित नागरिकांकडून शासनाकडे होत आहे.
सविस्तर घटना अशी की, पनवेल तालुक्यातील कासारभट येथे राहणारी प्रियांका रघुपती तांडेल हिस घरातल्यांनी भांडी घासायला सांगितल्याचा राग आल्याने २३ ऑगस्ट रोजी घरातून निघून गेली. बराच वेळ ती घरी न आल्याने नातेवाईकांसह गावकऱ्यांनी तिचा शोध सुरू केला. पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंग केस ही दाखल करण्यात आली. बऱ्याच वेळाने तिने पायात घातलेल्या सँडल कासारभट येथील सिडकोच्या पुलावर सापडल्या, दुसऱ्या दिवशी तिच्या नातेवाईकांनी रावे-कासारभट खाडीत बोटीतुन प्रियांका ला शोधण्याचा प्रयत्नही केला. मात्र प्रियांका सापडली नव्हती. आज दादर सागरी पोलिसांना एका मच्छीमाराकडून वशेणी खाडीत अनोळखी मृतदेह वाहून आल्याचा फोन करण्यात आला. त्या नुसार दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे हे आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र मृतदेह खाडीतील पाण्यात असल्याने व तो किनाऱ्याला आणण्यासाठी अजित गोळे यांनी होडी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर पोलिसांचा ससेमिरा आपल्या पाठी नको म्हणून अनेकांनी वेगवेगळी कारणे देत मदत करण्याचे टाळले. अखेर खूप प्रयत्न केल्यानंतर महाराज नावाचा मच्छीमार होडी घेऊन पोलिसांच्या मदतीस आला. दादर सागरी पोलीसांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर, द्रोणागिरी अग्निशामक दलाचे कर्मचारी यांच्या मदतीने रात्री २ वाजताच्या सुमारास सदर मृतदेह किनाऱ्याला आणला. यावेळी नातेवाईकांना घटनास्थळी बोलविले असता, गेली आठ दिवस नापता असलेल्या व कुजलेल्या अवस्थेत असलेल्या प्रियंकाच्या कपड्यांवरून नातेवाईकांनी तिचा मृतदेह ओळखला.
अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालय पेण येथे दाखल केला. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांनी शासनाकडे मागणी करून किमान समुद्र किंवा खाडी किनारी असलेल्या सागरी पोलिसांना तरी लवकरात लवकर स्पीडबोट अगर अत्याधुनिक होडी द्यावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे.